Skip to content

काहीही चूक नसताना मिळालेल्या शिक्षेतून स्वतःला कसे सावरावे??

काहीही चूक नसताना मिळालेल्या शिक्षेतून स्वतःला कसे सावरावे??


हर्षदा पिंपळे


क्षणोक्षणी चुका घडतात,
आणि श्रेय हरवून बसतात.
आपल्याच रिकाम्या ओंजळी
आपल्याला फार काही
शिकवत असतात.
कणभर चुकीलाही
आभाळाएवढी सजा असते,
चुक आणि शिक्षा यांची कधी
ताळेबंदी मांडायची नसते.
एक कृती, एक शब्द
एकच निमिष हुकतं
हुतं उभ्या जन्माच्या चुकामुकीला
तेवढं एक निमित्त पुरतं
अखेर हे सारं घडतं केवळ
आपण काही शिकण्यासाठी
आपण मात्र शिकत असतो
पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी!

( – कवी – सुधीर मोघे )

कवी सुधीर मोघे यांनी ही लिहलेली माणसांच्या आयुष्यातील चुकांविषयीची कविता कधी कधी आपल्याला अगदी तंतोतंत लागू होते.या चुकांच्या बाबतीत आपल्या आयुष्यात असच काहीसं घडत असतं.”मी आयुष्यात फार चुका केल्या, माझ्या आयुष्यात माझ्याकडून नको नको त्या चुका घडल्या. त्या एका चुकीमुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि त्या एका चुकीमुळेच माझं पूर्ण आयुष्य बदलून गेलं.त्या चुकांमधूनच मी बरच काही शिकलो.आयुष्यभरासाठी मी त्या चुकांकडून वेगवेगळे धडे घेतले.” असं प्रत्येकजण म्हणतो.

पण हेही तितकच खरं की कधी कधी अशी वेळ येते की आपली काहीही चुक नसताना आपल्याला त्या चुकीची शिक्षा भोगावी लागते. काहीही चुक नसताना आपल्याला शिक्षा मिळते.अशावेळेस खरं तर काय करावं नी काय नाही काहीही कळत नाही.न केलेल्या चुकीची शिक्षा मिळणं म्हणजे फारच कठीण.अशी काही माणसं असतात जी क्षणाक्षणाला आपल्या हातून काही चुकीच घडू नये याचा विचार करत असतात. प्रत्येक वेळी एखादी गोष्ट करण्यापूर्वी काही लोकं जाणीवपूर्वक विचार करतात.

नेहमीच चुका होऊ नये म्हणून ते प्रयत्नशील असतात.एखादा माणूस कधीच चुकत नाही असं नाही. पण जेव्हा माणूस खरच चुकीचा नसतो तेव्हा का त्याला त्याने न केलेल्या चुकीची शिक्षा मिळते तेव्हा त्याची अवस्था मात्र खूप बिकट होते.चोर सोडून सन्यासाला सुळी देणे म्हणतात नं ते हेच.खरं तर अशावेळी माणसाकडे पर्यायच कमी असतात किंवा ते नसतातही.

त्यावेळेस माणूस एकतर स्वतःलाच दोष देत बसतो नाहीतर मग “असच का झालं..?आणि माझ्यासोबतच हे का झालं..?” असा विचार करण्यातच संपूर्ण वेळ घालवतो.त्याला स्वतःला खोटा आळ आणि ती शिक्षा सहन होत नाही. स्वतःला त्या स्थितीत सावरता येत नाही. तर अशावेळी काय करायच हे आपण पाहूयात…..

*सर्वप्रथम स्वतःवर विश्वास ठेवावा.

*आपण खरच काहीही चुकीच केलेलं नाहीये यावर ठाम रहा.

*या शिक्षेतून आपण आयुष्यभरासाठी धडा शिकतोय हे लक्षात घेऊन मन शांत ठेवायचा प्रयत्न करा.

*कितीही काहीही झालं तरी मनावरील नियंत्रण सुटू देऊ नका.

*संयम ठेवा. सगळं काही संयमाने हाताळायचा प्रयत्न करा.

*कधी वेळ पडल्यास स्वतःची बाजू परखड शब्दात मांडायला विसरू नका.

*अशावेळी टोचून बोलणारी काही लोकं असतील तर त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा.कारण आपण प्रामाणिक आहोत हे आपल्याला माहित असतं.त्यामुळे लोकांनी कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला तर सरळ सरळ दुर्लक्ष करा.

*स्वतःला दोष देणं थांबवा.

*मिळालेल्या शिक्षेमुळे अडकल्यासारखं वाटत असेल तर ते वाटणं अगदी साहजिक आहे.परंतु कायमस्वरूपी तिथेच तोच विचार करण्यात काही अर्थ नाही हे लक्षात घेऊन पुढे जा.move on करा.कारण तुम्ही पुढे गेलात तर काहीतरी मार्ग तुम्हाला सापडेल अन्यथा जिथे आहे तिथे जखडल्यासारखच वाटेल. सो रडण्यापेक्षा, दोष देण्यापेक्षा पुढे चालत रहा.अंधारातून उजेडाची वाट नक्कीच सापडेल.

*आपला प्रामाणिकपणा एक ना एक दिवस सिद्ध होईल यावर विश्वास ठेवा. गरज पडल्यास तो सिद्ध करायची तयारी ठेवा.(हल्ली जगातील प्रत्येक गोष्ट पुराव्यांवर आ़धारित असते.)

*भावनेच्या भरात काहीही चुकीच बोलू नका.(कारण एखाद्याला रागा रागात “हो ,मीच केलय हे ” असं पटकन बोलण्याची फार सवय असते.आणि माणूस अनेकदा इथेच फसतो,अडकतो.)म्हणून शांत रहा.

*सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. कारण सकारात्मक दृष्टिकोन हा या सगळ्यामधून सावरण्यासाठी खूप सहकार्य करेल यात शंकाच नाही. सकारात्मकतेकडे आकर्षित व्हायचा प्रयत्न करा.

*”मी चुकीचा नव्हतो/नव्हते.” हे आपल्या कोणत्या ना कोणत्या कृतीतून दाखवून द्या. लोकांना त्याची जाणीव करून द्या.

*जे आहे ते स्विकारून पुढे जायचा विचार करा.आयुष्यात मिळणाऱ्या अशा लेसन्सकडून नक्की काहीतरी शिका.अशी वेळ कधी ना कधी येऊच शकते हाही विचार मनाशी पक्का करा.पुढे आयुष्यात पुन्हा अशी वेळ आली तर न डगमगता कसं सामोरं जायचा याचा विचार करा.आपल्याला सावरणारे आपणच असतो हा विचार करून मनाला खंबीर रहायला शिकवा.

*चांगल्या लोकांच चांगलच होतं त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत स्वतःवरचा आत्मविश्वास कोलमडू देऊ नका.”ही वेळही जाईन” असा विश्वास ठेवा.

असे प्रसंग आयुष्यात येतातच पण बाकी आयुष्य सुंदर आहे. कोणत्याही परिस्थितीत ते जगणं विसरू नका.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!