Skip to content

काही व्यक्तींना वेळीच निरोप द्या,तरच मनातील काही ओरखडे वाचवता येतील.

काही व्यक्तींना वेळीच निरोप द्या,तरच मनातील काही ओरखडे वाचवता येतील.


हर्षदा पिंपळे


पाय अडखळतो,मन हळहळतं,नयनी अश्रु दाटतात.निरोप घेताना असं काहीसं होतं.पण निरोप घेणं गरजेचच असतं

त्याशिवाय आयुष्याला नवी सुरुवात नसते.एखाद्या व्यक्तीला भेटताना जी आनंदाची भावना आपल्या मनात असते त्या भावनेला शब्दात मांडणं कठीण असतं.अगदी असच निरोपाचं आहे. निरोप घेताना/देताना जी भावना मनात असते त्या भावनेपेक्षा दुसरं भयंकर काही वाटत नाही.निरोप देताना/घेताना ज्या काही वेदना होतात त्या वेदनांना एक्स्प्रेस करणही अवघडच ! थोडक्यात सांगायच झालं तर, निरोप म्हणजे एकप्रकारची वेदनाच!

निरोप हा शब्द जरी कानावर पडला तरी नकोनकोसं होतं. इतका त्रासदायक आहे हा शब्द ! एखाद्या ठिकाणी फिरायला गेलो तर तिथून पुन्हा परतीचा प्रवास करायचा म्हंटला तरी मन कचरतं.सगळं काही सोपं वाटत राहतं.पण निरोपाची वेळ आली की सगळं अवघड वाटत राहतं.कधी चांगल्या गोष्टींना निरोप द्यावा लागतो तर कधी वाईट, नकोनकोशा असणाऱ्या गोष्टींना. गोष्ट कोणतीही असो,निरोप देणं महत्त्वाचं असतं.त्याशिवाय पुढच्या आयुष्याची सुरुवात होत नसते.

पण..निरोप म्हणजे नक्की कुणाला आणि कधी द्यायला हवा हेही समजणं आवश्यक आहे.आयुष्यात केवळ एकाच व्यक्तीला आपण भेटत नाही.पावलापावलावर आपल्या आयुष्यात वेगवेगळी माणसं येत राहतात.कुणी क्षणभरासाठी आयुष्यात येतात तर कुणी दीर्घकाळासाठी आयुष्यात येतात.कुणाचा स्वभाव आपल्याला रूचतो तर कुणाचा स्वभाव आपल्याला कणभरही पटत नाही. एखाद्याचं असणही अनेकदा आपल्याला अडचणीचं वाटतं.

तर एखाद्या व्यक्तीशी खरं तर खूप भावनिक जवळीक निर्माण होते.त्या व्यक्तीशिवाय आपल्या मनात दुसरं काहीही नसतं.ती ती ठराविक व्यक्ती आपल्याला हवीहवीशी वाटते. आपण हळुहळू त्या व्यक्तीमध्ये गुंतायला लागतो.

इतकी सवय होते की त्यांच्या नसण्याने त्रास होतो.

तर दुसरीकडे अशा व्यक्ती आयुष्यात येतात ज्यांना आपण जीव लावतो. ज्यांच्यासाठी आपण आपल्या जीवाची पर्वा न करता धडपडत असतो. पण याविषयी त्या लोकांना काहीही देणं-घेणं नसतं.स्वतःच्या स्वार्थासाठी ही लोकं आपल्या आयुष्यात आलेली असतात.पण आपण मात्र डोळ्यावर झापडं लावून फिरत असतो.पण ज्यावेळेस आपल्या लक्षात येतं “आपण आपली म्हणवणारी माणसच आपल्याला नकळतपणे त्रास देतात” तेव्हा मात्र खूप त्रास होतो.मग तरीही आपण तिथे गुंतायला हवं का..?

तर नाही… एखाद्या गोष्टीत फार काळ गुंतून राहू नये.गुंतलं की गुंतत जातो जीव आणि नंतर मात्र त्रास होतो.काही व्यक्तींना काही गोष्टींना वेळीच निरोप द्यायला हवा.कारण,आधीच असताना मनावर वेगवेगळे चरे पडतात. त्यात जर एखाद्याच्या दीर्घकाळ असण्यामुळे जर काही त्रास होणार असेन तर त्याचा हात वेळीच सोडणं गरजेचं आहे.

मनावर असंख्य जखमा होण्याआधी काही व्यक्तींना निरोप देणं गरजेचच असतं.आपल्यासाठी आणि समोरच्यासाठीसुद्धा !

यामुळे निरोप देणं दोन्ही बाजूने किती महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्यायला हवं. मित्रांनो कधी कधी निरोप दिल्यामुळे भविष्यात होणारा त्रास कमी होण्याची शक्यता असते.निरोप दिला की काही नाती एका विशिष्ट मर्यादेत राहून किमान जपली तरी जातात. एकमेकांविषयी असलेली ओढ कमी होण्यापेक्षा वाढत जाते.एकमेकांविषयी तोच आदर कायम टिकून राहतो. मनात कोणत्या अडी राहत नाही.मुळातच आपण एका विशिष्ट झोनमध्ये अडकून राहत नाही.आपल्याला असंख्य वाटा मोकळ्या असतात.

आणि आयुष्यातील पुढची पानं वाचायची असतील तर काही पानांचा निरोप हा घ्यावाच लागतो.

चांगली वाईट दोन्ही प्रकारची माणसं आयुष्यात येतात.त्रास तर दोन्हींमुळे होतो.कधी attachment मुळे तर कधी समोरचा स्वार्थी ,कपटी वृत्तीचा निघाला तर.त्यामुळे दोन्ही ठिकाणी वेळीच निरोप देणं आवश्यक असतं.अशा काही व्यक्तींना वेळीच निरोप दिला नाही तर आपलच जगणं अवघड होऊन बसतं.मनावरच्या ओरखड्यांची तर आपल्याला कल्पनाही नसते.कधी कधी माणसं ओळखण्यात चुक होते.माणसं ओळखायला आपल्याला जमत नाही. आपत सहजपणे आंधळा विश्वास ठेवतो आणि नंतर मात्र त्याचाच त्रास सहन करत राहतो. म्हणून वेळीच काही लोकांना निरोप दिलेला केव्हाही चांगला.

सो..वेळीच निरोप द्या….आणि पुढच्या नौकेतून प्रवास करायला सुरुवात करा.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!