Skip to content

काही व्यक्ती आनंदी दिसतात, पण ते आतून आनंदी असल्याचं जाणवत नाही.

काही व्यक्ती आनंदी दिसतात,पण ते आतून आनंदी असल्याचं जाणवत नाही.


हर्षदा पिंपळे


“तृषा इतकी आनंदात दिसत होती की काही विचारूच नको.ती किती खळखळून हसत होती त्यादिवशी. आणि किती गप्पा मारल्या तिने.बापरे ! मीच दमले होते तिच्या गप्पा ऐकून. अरे यार आणि ती इतकी आनंदी कशी काय वाटत होती ? म्हणजे इतका आनंदी तर मीही नसतो.माझं तोंड तर दिवसातून दहावेळा तरी पडलेलचं असतं.आत एक आणि बाहेर एक असं मला तरी जमत नाही. तृषा नेमकी कोणत्या गटात मोडते देवच जाणे.” लतिका राघवला म्हणाली.

“अगं,तुला वाटतं तसं खरं तर काही नाही. तृषा इतकी आनंदी असणं शक्यच नाही.ती वरवर हसत असते गं.मनाने हळवी असली तरी आतून तशी ती स्ट्रॉंग आहे.स्वतःचं दुःखं तिला कुणापुढे मांडायला कधीच आवडत नाही.अगं तिच्या घरी सतत काही ना काही प्रॉब्लेम चालू असतात. आणि तिला तर जरा म्हणून कसलच स्वातंत्र्य नाही. कोणताच निर्णय तिचा तीला घेता येत नाही.आणि सगळं करूनही तिला नेहमी घरचे काही ना काही बोलत राहतात.पण ती कधीच कुणाला काही सांगत नाही.कधीतरी सहज पटकन बोलता बोलता बोलून जाते कधी कधी ती.घरी रडत असेल म्हणून बाहेर येऊन हसत असेल ती.कदाचित! पण खरच ति हसते तेच बरं आहे. खोटं खोटं का होईना ती हसतेय यातच समाधान मानायचं आपण.” राघव लतिकाला म्हणाला.

तर राघव आणि लतिका त्यांच्या तृषा नावाच्या मैत्रिणीविषयी बोलत होते.तृषा अत्यंत हुशार आणि गुणी मुलगी.सर्वांच चांगलं व्हावं यासाठी ती नेहमी धडपड करायची. सगळे आनंदी आणि सुखात रहावे म्हणून ती नेहमीच प्रयत्नशील असायची. परंतु स्वतःच्या बाबतीत मात्र ती वेडेपणा करायची.स्वतःची काळजी सगळ्यात शेवटी.आपल्यामुळे कुणाला त्रास होऊ नये म्हणून स्वतःचं रडगाणं कुठेतरी दडवून ठेवायची तिला सवयच होती.

तिला वाटायचं कुणाला काही कळत नाही. परंतु तिचे काही जिवाभावाचे मित्र होते त्यांना तृषाच्या सगळ्या गोष्टींचा अंदाज होता.आणि म्हणूनच नंतर नंतर त्यांनी तृषाला खूप समजून घेण्याचा प्रयत्न केला.तिच्या खोट्या आनंदाचा मुखवटा हळुहळू त्यांनी दूर केला.तिला खऱ्या आनंदाची त्यांनी जाणीव करून दिली.कालांतराने तृषा आतून आनंदी राहू लागली.तिलाही आतून आनंदी असणं किती महत्त्वाचं असतं हे लक्षात आलं.

तिच्या लक्षात आलं पण तुमचं काय ?

तर मित्रांनो,आनंदी रहायला कुणाला आवडत नाही ?

खरं तर प्रश्न सोपा आहे हं ! आनंदी रहायला सगळ्यानांच आवडतं.दिवसभर पडलेला चेहरा घेऊन बसायला कुणाला आवडत असेल बरं ? खरं तर कुणालाच नाही.पण आपल्या अवतीभवती असे काही चेहरे असतात जे केवळ वरवर हसत असतात. पण आतून मात्र ते अक्षरशः रडत असतात.वरवर आनंदी असणाऱ्या या व्यक्ती आतून आनंदी असतात असं मात्र जाणवत नाही.खरचं,किती धडपडतात नं लोकं आपलं दुःख लपवण्यासाठी !

काही लोकं आपल्या दुःखाचा बाजार कधीच मांडत नाही.दुःखाला कधी कुणासमोर मोकळं करणं यांना जमत नाही. आणि आवडतही नाही.कदाचित आपल्यामुळे अवतीभवतीचं वातावरण निरस ,गढूळ होऊ नये म्हणून ही माणसं स्वतःचं दुःखं मनामध्ये कायमस्वरूपी साठवून ठेवत असावीत.प्रत्येक गोष्टीची सल मनात ठेवून जगणं इतकं सोपं नसतं.मनात आसू आणि ओठांवर हासू ठेवणं फार क्वचित कुणाला जमतं.खरचं कधी कधी प्रश्न पडतो.की कसं जमतं असेल यांना मनात दुःखं साठवून बिंधास्त मोकळेपणाने आनंदी जगायला ?यांच्या चेहऱ्यावर निराशेचा, दुःखाचा साधा लवलेशही लवकर दिसत नाही.कसं कळणार ही माणसं आनंदात आहे की दुःखात?

येणारा जाणारा प्रत्येकजण हसतो याचा अर्थ प्रत्येकजण आनंदी असतोच असं नाही.त्यातील काही व्यक्ती या केवळ वरवर हसत असतात.तर काही व्यक्तीच अशा असतात ज्या आतून आणि बाहेरून खऱ्या अर्थाने आनंदी असतात.नाहीतर आनंदी असण्याचा खोटा मुखवटा धारण करून वावरणारे हल्ली कमी नाहीत. हल्ली लोकं केवळ जगाला भासवण्यासाठी सगळा प्रयत्न करतात.काही असतात जे जगाला भासवण्यासाठी नाही तर जगामध्ये निराशेचा,निरूत्साहाचा अंधार पसरू नये यासाठी स्वतःचं दुःख आतल्या आत लपवून ठेवून वरवर हसत असतात.

पण असं आनंदी राहून काय होणार आहे? काहीच नाही. वरवर आनंदी जगण्याला काहीच अर्थ नाही.आनंदी रहायचं असेल तर आतून आनंदी असणं गरजेचं आहे.कारण मुळातच आनंदी राहणं हे आपल्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याशी निगडीत आहे. आणि आपणच जर आनंदी नसू तर निश्चितच आपलं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडू शकते.

मनापासून, आतून आनंदी राहणं आपल्या जगण्याला नवा अर्थ देऊ शकते. मुळातच आनंदी असणं हा आपला स्वभाव असायला हवा.आनंदी असण्याचे सकारात्मक परिणाम आपण समजून घ्यायला हवे.आनंदी असणं दाखवणं आणि खरोखरच आनंदी असणं यात फरक आहे. आणि तो कधी कधी समोरच्या व्यक्तीला जाणवतही असतो.त्यामुळेच नेहमी प्रामाणिकपणे आनंदी राहण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजे.

सो..आनंदी रहा,आणि इतरांनाही आनंदी रहायला शिकवा.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!