Skip to content

काहीवेळेस काहीही न बोलणं चांगलं असतं.

काहीवेळेस काहीही न बोलणं चांगलं असतं.


हर्षदा पिंपळे


तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं ?

मला तरी वाटतं की यामध्ये खरचं काहीतरी तथ्य नक्कीच आहे. काहीवेळेस काहीही न बोलणं खरचं चांगलं असतं.अनेकदा आपण बोलतो की,”न बोलून, शांत राहून काही प्रश्न सुटणार नाहीत.किती काळ गप्प रहायचं? नाही बोललं तर लोकं गैरवापर करून घेतात.

गप्प राहण्यापेक्षा बोललेलं केव्हाही चांगलच.”

खरं तर यामध्येही नाकारण्यासारखं काहीच नाही.

परंतु एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात तसाच विचार दोन्ही बाजूंनी केला तर तुमच्या नक्की लक्षात येईल.कधी कधी बोलणं आणि कधी कधी न बोलणं याही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही.

आता बोलण्याचे फायदे किंवा परिणाम तर तुम्हाला माहितच असावेत म्हणून एकदा न बोलण्याचे परिणाम किंवा फायदे काय असतात हेही आपण पाहूयात.

मित्रांनो, मला सांगा भांडणं कुणाच्या आयुष्यात होत नाहीत? कुणाच्या घराघरात वाद नसतात?सगळ्यांचच एकमेकांशी व्यवस्थित जमतं का?

तर , भांडणं, वाद हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. आणि सगळ्यांचच एकमेकांशी जमतं असं नाही. आणि नाही पटत कधी कधी काही गोष्टी. होतात कोणत्या ना कोणत्या कारणावरून छोटे मोठे वाद.पण मग बऱ्याचदा आपण अशावेळेस काय करतो तर आपल्या तोंडाचा पट्टा सातत्याने चालूच ठेवतो.

समोरचा एक बोलला तर आपण लगेच दुसरा शब्द बोलतो.असं एकापाठोपाठ एक आपण बोलतच राहतो.आणि मुळातच त्यावेळी तो संवाद नसतो तर वाद असतो.शब्दाने शब्द वाढत राहतो याची कल्पना प्रत्येकाला असेलच.म्हणून कधी बोलायला हवं याचही भान असणं गरजेचं आहे. नाहीतर बोलत राहिलो की , भांडणं टोकाला जाऊ शकतात, घाईघाईने चुकीचा निर्णय घेतला जाऊ शकतो,ओघाओघामध्ये आपल्याकडून चुकीचे शब्द वापरले जाऊ शकतात.अशा अनेक गोष्टी बोलल्यामुळे होऊ शकतात.पण नंतर मात्र याच गोष्टींमुळे पश्चाताप करण्याची वेळही नक्कीच येऊ शकते.

म्हणून कधी कधी बोलण्यापेक्षा न बोलणही तितकच महत्त्वाचं असतं.विचार करा,बोलून जसे प्रश्न सुटू शकतात तसेच प्रश्न न बोलूनही सुटू शकतात. कारण कधी कधी बोलण्यापेक्षा शांत राहणं गरजेचं असतं.एखादा वाद टोकाला जात असेल तर त्यावेळी गप्प बसणच महत्वाचं असतं.कारण आपण शांत राहिलो तर शब्दाने शब्द वाढत नाही. मानसिक आणि शारीरिक ऊर्जा खर्च होत नाही. गोष्टी सांभाळण्यासाठी थोडा वेळ मिळतो.शांत राहून पुढचा विचार नक्कीच करता येतो.समोरचाही अशावेळेस शांत व्हायचा प्रयत्न नक्कीच करू शकतो.

थोडक्यात सांगायचे झालं तर येणारं वादळ आधीच शमु शकतं.क्रोधाच्या, द्वेषाच्या भावना वाढीस न लागता कुठेतरी मन स्थिर होण्याचे चान्सेस वाढू शकतात.म्हणून मानसिक शांतता भंग न होण्यासाठी आपण एवढं तर नक्कीच करू शकतो.

आणि नेहमीच बोलण्यापेक्षा, कधीतरी शांत राहून पाहूयात नं ? एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू वापरून बघायला काही हरकत नाही. खरं तर कधीतरी न बोलून बघाच एकदा काय होतय ते.स्वतःच असा अनुभव घेऊन पहा.दोन्ही गोष्टींचे तोटे आणि फायदेही लक्षात येतील.

दोन्हींमध्ये काय बेटर आहे याचीही कल्पना येईल. केव्हा शांत बसायला हवं आणि केव्हा बोलायला हवं याचाही एक अंदाज आल्याशिवाय राहणार नाही. शेवटी अनुभवाशिवाय दुसरा चांगला कोणता पर्याय असेन असं वाटत नाही. काय आहे बोलण्याने जसे प्रश्न सुटतात नं तसेच प्रश्न कधी कधी काहीही न बोलण्यानेही सुटतात यावर थोडा विश्वास ठेवा.आयुष्यातील काही प्रसंग आठवून पहा.बोलण्यामुळे काय झालं होतं आणि काय नाही?

आणि काही प्रश्न हे शांततेने सुटतात हे तर प्रत्येक जण जाणतच असेल.म्हणून वेळ,काळ या सगळ्याचं भान ठेवून बोलायचं की नाही बोलायचं हे मनाशी ठरवून घ्या.एकदा असाही अनुभव घेऊन पहा.कधी कधी न बोलणही चांगलं असतं याची प्रचिती एकदा जरूर घ्या.

नेहमी एकाच पद्धतीने काय आयुष्य जगायचं? जरा दुसऱ्या पद्धतीनेही आयुष्य जगायला शिका.काहीतरी चांगलं नक्कीच सापडेल.

पटतय नं..?


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!