काही प्रसंग खूप शांत करतात, नाहीतर एकवेळ अशी होती की लोकं आपण खुश असण्याचे कारण विचारायचे.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
“अरे निलेश, किती वर्षांनी भेटलास! संध्या काकू जवळ जवळ ओरडुनच बोलल्या.” या लग्नाच्या निमित्ताने खरच कितीतरी आठवणी, प्रसंग आज परत जिवंत होत होते. “किती मोठा झालास रे? आणि एकदम शांत वाटतोस. लहान असताना पाहिलेला तुला. सारखा खेळत, हिंडत फिरत असायचास.” अस म्हणून काकू हसू लागल्या. बोलण काही थांबतच नव्हत. “आई, बाबा, नीलांबरी वगैरे कशी आहेत रे? तु काय करतोस सध्या?” काकू प्रश्न विचारत होत्या पण उत्तर ऐकण्याची उसंत नव्हती त्यांच्याकडे.
शेवटी मी त्यांना थांबवत म्हणालो, “हो काकू सर्व छान आहेत. नीलूच लग्न झालं. आई पण छान आहे. तुमची आठवण काढते.” “आणि बाबा ते कसे आहेत? तुला आठवत की नाही माहित नाही. तुझ्या लहानपणी न चुकता आमच्या घरी यायचे संध्याकाळी. मस्त गप्पा चालत त्यांच्या.” बाबांचं नाव काढल्यावर मी शांत झालो. त्यावर काकू म्हणाल्या, “का रे शांत झालास? सर्व ठीक आहे ना?” “हो काकू सर्व ठीक आहे.
बाबा वारले काही वर्षांपूर्वीच.” मी अस म्हटल्यावर काकू एकदम स्तब्ध झाल्या. “काय सांगतो आहेस? काय झालं अचानक, चांगला धडधाकट माणूस होता.” त्यांना काय आणि किती सांगणार होतो, जे काही झालं त्याने आम्हाला पूर्ण बदलून टाकलं. संध्या काकू अजून बोलत होत्या पण तेवढ्यात त्यांना कोणीतरी बोलावू लागलं म्हणून त्या गेल्या. जाताना पाठीवर थोपटून, काळजी घे, भेटू परत अस म्हणून गेल्या.
त्या भेटल्या मात्र, जुन्या सर्व आठवणी डोळ्यासमोर पुन्हा उभ्या राहिल्या. आमचं लहानपण कोकणात गेलं. खूप छान दिवस होते ते. आम्ही चाळीत राहायचो. पण त्याला मजले नव्हते. बैठी चाळ होती ती. माझ्या वयाची खूप मुल होती. त्यामुळे आमचा दिवस छान खेळण्या बागडण्यात जायचा. शाळा जवळ, वाटेत आंब्याची, चिंचेची झाड. येताना कैऱ्या तोड, चिंचा पाड असे उद्योग करीत आम्ही यायचो. त्यावेळी कसली चिंता म्हणून नव्हती.
मुळात चिंता हा शब्दच माहीत नव्हता. असली तरी आई बाबांनी त्याची कधी झळ लागू दिली नाही. खूपच सुंदर दिवस होते ते. त्यात माझा स्वभाव असा बोलक्या होता की गप्प बसलेला माणूस पण वैतागून बोलू लागेल. मी बोलून बोलून समोरच्याला पण बोलायला भाग पाडायचो. सर्वांना एकत्र जमवण, त्यांना मस्त जोक सांगणं, एखादा मजेदार किस्सा रंगवून सांगणं, नकला करण यात मी पटाईत होतो.
त्यामुळे माझ्या कंपू मध्ये मी फेमस होतो. सारखा काही ना काही करत बसणार. आजूबाजूच्या काकू आश्चर्याने विचारयाच्या, अरे तुला काही दम वगैरे लागतो का नाही? नुसता बागडत असतोस. आणि चेहऱ्यावर आनंदी भाव असायचा त्याच पण लोकांना कुतुहुल. येता जाता मला विचारणार, कसला आनंद झालाय रे नील. हसतोस इतका ते! तेव्हा मी म्हणत असे, हसायला कुठे पैसे लागतात? ते कितीही मिळू शकत. माझा हा स्वभाव वातावरणाला जिवंत ठेवायचा. चाळीत कोणताही कार्यक्रम असुदे, सण असुदे सर्वांना गोळा करून मी त्या तयारी करत असे. आम्ही नाटक बसवू, वेगवेगळे
खेळ खेळत असू. असेच दिवस चालले होते. अचानक एक दिवस आई म्हणाली, आपण आता इथे राहणार नाही. आपण दुसरीकडे राहायला जायचं. तो माझ्या आयुष्यातला पहिला धक्का होता. काहीही माहीत नाही फक्त आता इथे राहायचं नाही इतकंच सांगितल गेलं. मी आई बाबांना खूप विचारलं, नीलूला विचारलं. पण तिला देखील काही माहीत नव्हत. चाळीतल्या सर्व दोस्तांचा मी निरोप घेतला. दुःखाची जाणिव काय असते ते यावेळी जाणवलं.
नवीन घरात आल्यावर पण किती तरी दिवस चाळीचे दिवस आठवायचे. स्थळ सोडता येतात, आठवणी, त्या कश्या सोडता येतील? खूप दिवस गेले नवीन ठिकाणी स्थिर व्हायला. मी पुन्हा हळू हळू पहिल्यासारखा झालो. इथे नवीन मित्र मिळाले, त्यांच्यामध्ये रमलो. शेवटी मुळ स्वभाव कसा जाईल? परत तेच हास्य चेहऱ्यावर येऊ लागलं. आईला पण बर वाटलं.
पण यानंतर जे काही झालं त्यानंतर मात्र माझा अवखळपणा पूर्ण बंद झाला. बाबा अचानक आजारी पडले. अस वाटत होत त्यांनी कसलातरी धसका घेतला. कोणतच औषध त्यांना लागू होईना. आमची परिस्थिती पण काही फार चांगली नव्हती की बाबांना महागातले उपचार देता येतील.
उलट ते दिलेल्या औषधांना पण नीट प्रतिसाद देत नव्हते. एकटेच बोलत बसायचे. त्यांना कसल तरी दुःख होत हे नक्की. मला आणि नीलाला याबद्दल काहीही माहीत नव्हत. शेवटी आम्ही दोघांनी एक दिवस आईला खोदून खोदून विचारल, तिला आमच्या शपथा घातल्या तेव्हा कुठे ती बोलू लागली, बाबांनी आम्ही चाळीत असतानाच कर्ज घेतलं होत. त्यांनी जसे हिशोब घातले होते त्यानुसार त्यांना ते फेडता आलं असत आणि म्हणूनच त्यांनी काढलं होत.
पण अंदाज कुठेतरी चुकला. त्यावेळी नोकरीतून तरी कुठे जास्त पैसे मिळायचे. शिवाय घर चालवणं, आमचं शिक्षण होत. सतत चिंतेत असायचे की हे कर्ज फेडता कस येईल? चाळ सोडण्याचं हेच कारण होत. वाटलं नवीन जागेत काहीतरी काम मिळेल, काहीतरी करता येईल. पण सगळेच हिशोब चुकले. आम्हाला आता ही गोष्ट लक्षात आली की आई सहजपणे खेळायला कशी पाठवून देई. त्या दोघांनाही या सर्व गोष्टी आम्हाला कळू द्यायच्या नव्हत्या.
आता बाबांची तब्येत ढासळण्याच कारणही हे कर्ज होत. इतकं सांगून आई रडू लागली. नीलू त्यावेळी दहावीत होती आणि मी आठवीत. अजून कश्यातच काही नव्हत. आतापर्यंत आमचं आयुष्य फक्त शाळेभोवती फिरत होत. पण आता समजल खऱ्या जगात या सर्व गोष्टी देखील होतात. आईला सावरायचं कसं तेही समजेना. बाबांची तब्येत जी ढासळली ती ढासळलीच. ते त्यातून पुन्हा वर येऊ शकले नाहीत. एक दिवस ते आम्हा सर्वांना सोडून गेले. आईने त्याच दिवशी मला सांगितलं, आता जे काही आहे ते तुझ्या हातात आहे. त्या एका वाक्याने मला समजायचं ते समजलं. मी पूर्ण बदलून गेलो.
खेळकर, हसऱ्या, उनाड मुलाच्या जागी एक शांत, गंभीर मुलगा जन्माला आला. त्याचवेळी ठरवलं अभ्यास करायचा आणि काहीतरी काम करून कर्ज फेडायच. त्यानंतर माझं बाहेरच फिरणं बंदच झालं. शिक्षण संपवून मी लगेच नोकरी शोधली व हळू हळू कर्ज फेडू लागलो. आणि मी दिलेला शब्द पाळला.
परिस्थिती पहिल्याहून चांगली करून दाखवली. पण मी मात्र पूर्वीसारखा होऊ शकलो नाही. बाबा गेल्यानंतर जो मी शांत झालो तो तसाच राहिलो. आयुष्यात घडलेल्या या काही प्रसंगांनी खूप काही शिकवलं. नंतर जेव्हा जेव्हा आधीचे मित्र भेटले, संध्या काकुंसारखी लोक भेटली तेव्हा माझ्या या स्वभावाच आश्चर्य वाटण साहजिक होत. कारण त्यांना यामागे काय काही घडल आहे याची कल्पना नव्हती. आणि मी ती देऊ इच्छित पण नव्हतो. काही प्रसंग आपल्याजवळ राहिलेले बरे नाही का?
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

हा लेख वाचून खूपच छान वाटलं कुठेतरी आपल्या मनातले व्यथा आहे असं वाटलं