Skip to content

काही प्रसंग इतके उध्वस्त करून जातात की पुन्हा नवीन काही शिकण्याची इच्छाच उरत नाही.

काही प्रसंग इतके उध्वस्त करून जातात की पुन्हा नवीन काही शिकण्याची इच्छाच उरत नाही.


हर्षदा पिंपळे


शिकत रहावं,अगदी मरेपर्यंत !

पहा,माणसाने मरेपर्यंत शिकत रहावं असं म्हणतात.आयुष्य म्हणजे स्वप्नांचा सोहळा.कितीतरी स्वप्न उराशी बाळगून माणूस रोज नव्याने काहीतरी शिकत असतो.कधी गाणं शिकतो तर कधी एखादी टेक्निकल गोष्ट शिकतो.कधी पोहणं शिकतो तर कधी लिहीणं शिकतो.अशा विविध प्रकारच्या गोष्टी माणूस शिकत असतो.पण याच अशा गोष्टी शिकताना आयुष्यात असे प्रसंग येतात ज्यामुळे आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त होऊन जातं.आणि पुन्हा काही नवीन शिकण्याची इच्छाच उरत नाही. माणूस हळुहळू खचायला लागतो.

आपल्यासमोर अशी असंख्य उदाहरणं आहेत.अशा घटना आपण रोजच्या जीवनात अनुभवतो.वर्तमानपत्रात वाचतो.आजुबाजूला घडताना पाहतो.अशा प्रसंगामुळे अनेकदा माणूस शेवटचं पाऊल उचलायलाही मागे पुढे पहात नाही. मागचा पुढचा कसलाच विचार न करता स्वतःचच जीवन संपवून टाकणारी कितीतरी उदाहरणं आपण रोज पाहतो.

आपण एखादं उदाहरण पाहूयात.

आता बिझनेस करणं फारसं अवघड नसलं तरीही ते तितकं सोपही मुळीच नाही. प्रचंड प्रमाणात तुमच्याकडे पेशंस असणं आवश्यक आहे.कारण,बिझनेस आज टाकला आणि उद्या लगेच उभा राहिला,असं होत नाही.त्यासाठी संयम हा आवश्यक आहे.

~
समीरने इतके वर्ष नोकरी करून ,प्रचंड प्रमाणात मेहनत करून, संयम ठेवून स्वतःचा व्यवसाय करायचं ठरवलं. कितीतरी लाखांची गुंतवणूक करायची त्याने ठरवलं.आणि ते त्याने करूनही दाखवलं.त्याने त्याचा स्वतंत्र बिझनेस टाकला.बिझनेस म्हंटलं की रिस्क येणारच हे त्याला माहित होतं. तरीही त्याने ते रिस्क घेतली होती.

चार पाच महिने गेले आणि जे व्हायला नको तेच समीरच्या बाबतीत घडलं.त्याचा बिझनेस बुडाला.इतक्या वर्षाच्या त्याच्या मेहनतीवर एका क्षणात पाणी पडलं. हातात नोकरी नाही आणि बिझनेसही नाही. यामुळे समीर तणावात आयुष्य जगत होता.त्याला प्रचंड धक्का बसला होता.त्यात टोमणे मारणारे अजूनच समीरला बेजार करत होते.

कालांतराने तो या सगळ्यातून बाहेर आला.परंतु पुन्हा काहीतरी नवीन शिकायचं, काहीतरी नवीन करू पाहण्याची त्याची इच्छाच होत नव्हती.”माझी इच्छा नाही काही करायची. मूड नाहीये माझा.” असा पाढा त्याने सुरू केला.

~~
रोहन सगळं सोडून शेती करण्यासाठी मायदेशात येतो.शेतीमध्ये नवीन प्रयोग करण्यासाठी तो धडपडतो. हळुहळू यश मिळत जातं.प्रगती होतेय असं वाटू लागतं.आणि असा प्रसंग येतो की,
“नको…आता ,मी हे करू शकत नाही. हे माझं काम नाही. मला यामध्ये काहीही रस राहिलेला नाही.नवं काहीतरी शिकायला जातो आणि नको ते होऊन बसतं.मला नाही शिकायचं काही. “असं बोलून तो कित्येक महिने शेतीकडे फिरकतही नाही.

ही छोटी छोटी उदाहरणं आपल्याला नवीन नाहीत.

आपल्या आयुष्यात असचं काहीसं घडत असतं.काहीतरी नवीन शिकायची इच्छा असते,स्वप्नांना गवसणी घालायची इच्छा असते.परंतु असे प्रसंग आयुष्यात येतात की ते सगळ्या इच्छाच मारून टाकतात.चांगलं चाललेलं आयुष्य ते कुठेतरी उद्ध्वस्त करतात.कुठेतरी मानसिक संतुलन बिघडतं तर कधी आर्थिकदृष्ट्या असे प्रसंग येतात जे कोलमडून टाकतात.अशाने पुन्हा काहीतरी नवीन शिकावं असं वाटत नाही.

तर,मित्रांनो असं होणं तर अगदी साहजिक आहे.असे प्रसंग येतात, जातात.आयुष्यात हे असं चालूच रहातं.त्या प्रसंगांना आपल्याला तोंड द्यावच लागतं.आणि निश्चितच अशा प्रसंगामुळे काहीतरी नवीन करण्याची, शिकण्याची इच्छा मरून जाते,कमी होते. पण,असे प्रसंग आयुष्यात येतच राहणार हे स्वीकारून आपणच आपल्या इच्छांना जिवंत ठेवायला हवं.जे काही शिकायचय ते पुन्हा एकदा नव्या जोमाने शिकायला हवं.

आयुष्य सारखं सारखं मिळत नाही, त्यामुळे जोपर्यंत आयुष्य आहे, श्वास जिवंत आहे तोपर्यंत नवनवीन गोष्टी शिकून घ्यायला हव्या.मनाला उद्ध्वस्त करणारे कोणतेही प्रसंग येऊद्यात,त्यांना हसतहसत झेलायला शिका.
आणि अपूर्ण राहिलेली, निसटून गेलेली प्रत्येक गोष्ट शिका.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “काही प्रसंग इतके उध्वस्त करून जातात की पुन्हा नवीन काही शिकण्याची इच्छाच उरत नाही.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!