काही माणसं अचानक बदलतात, कधी आपण महत्वाचे असतो तर कधी आपलं काहीच महत्व नसतं.
मेराज बागवान
एक अशी मानसिकता ह्या लेखात आपण पाहणार आहोत,ज्यामध्ये माणसे का आणि कशी बदलतात हे जाणून घेता येईल.असे म्हणतात माणसाचा स्वभाव बदलता येत नाही.पण आयुष्यात होते काय,काहीतरी अचानक घडते आणि माणसं बदलतात. हो असे अनेकदा घडते आणि आपण यामुळे गोंधळून जातो.ह्या माणसांसाठी आपण कधी महत्वाचे असतो तर कधी त्यांच्यासाठी आपलं काहीच महत्व नसतं.
‘केशव’ एक होतकरू मुलगा.सीमा ताईंच्याकडे ‘पेईंग गेस्ट’ म्हणून राहत होता.केशव ची घरची आर्थिक परिस्थिती नाजूक होती.केशव चे शिक्षण कसेबसे पूर्ण झालेले होते.आणि तो नोकरीच्या शोधात होता.पण चांगली अशी नोकरी त्याला मिळत नव्हती.तोपर्यंत तो अशीच काही छोटी मोठी कामे करीत असे आणि घरखर्च भागवत असे.आई-वडील गावाकडे होते.आणि केशव शहरात.सीमा ताई देखील एक सुशिक्षित महिला होत्या.त्या देखील नोकरी करीत होत्या.मध्यमवयीन नोकरी करणारी महिला.सरकारी नोकरी होती त्यामुळे घर सोडून दुसऱ्या शहरात राहावे लागत होते.पण नोकरी चांगली असल्यामुळे सीमा ताईंनी स्वतःचे घर तिथे घेतले होते आणि सोबत म्हणून मुला-मुलींनी ते काही खोल्या ‘पेईंग गेस्ट’ म्हणून देत असत.
केशव आणि सीमा ताईंची चांगली गट्टी जमली होती.केशव अनेकदा सीमा ताईंकडे मन मोकळे करीत असे.असेच एके ते दोघे बोलत होते.”ताई ,मला तर आता खूप टेन्शन आले आहे.नोकरी मिळत नाही.घरखर्च कसा भागवू.घरची जबाबदारी कशी पूर्ण करू.लहान बहीण आहे,तीच देखील पाहायचं आहे.मला तर खूप निराश वाटत आहे.”
सीमा ताई बोलू लागल्या,”केशव अरे तू इतका का त्रास करून घेत आहेस. तू किती हुशार आहेस.तू एक काम कर,काहीतरी नवीन कोर्स कर जेणेकरून नोकरीत त्याचा उपयोग होईल.ऑनलाइन तर खूप काही मार्ग आहेत.तू ते करू शकशील. आणि पैशाची काही काळजी करू नकोस.मी आहे नेहमी तुझ्यासोबत.”
असेच दिवसांमागून दिवस जात होते.सीमा ताई केशव ला नेहमी मदत करीत असत.त्याला पाठिंबा देत असत.केशव ने देखील त्यांचा विश्वास पात्र ठरविला. त्याने वेगवेगळे कोर्स केले आणि त्याला चांगली नोकरी मिळाली.पुरेसा पैसा हाती येऊ लागला.त्याने सीमा ताईंचे आभार मानले.त्याने शहरात स्वतःचे घर घेतले आणि तो तिथे सेटल झाला.
केशव यशस्वी झाला.पण त्याचा एक मूळ स्वभाव होता,त्याला जास्त माणसं आवडत नव्हती.म्हणजे त्याला एकटे राहायला आवडत असे.मग कोणीही असले तरी तो त्याच्याच आयुष्यात रमत असे.आणि म्हणूनच त्याने कळत-नकळत सीमा ताईंशी देखील संपर्क जवळजवळ तोडुनच टाकला.
सीमा ताई विचार करीत होत्या,”अरे केशव एकदम कसा बदलला.त्याचा काही आता फोन येत नाही,मेसेज नाही.काहीच नाही.काळजी वाटते पोराची. माझ्याजवळ इतकं मन मोकळे करणारा मुलगा आज दूर दूर का जातोय.बघू बोलून बघुयात त्याच्याशी.त्याला काही अडचण तर नसेल ना..”
असे म्हणत,सीमा ताईंनी केशव ला फोन केला.”हॅलो ,केशव,मी सीमा बोलतेय.खूप दिवस झाले बोलणे नाही तुझ्याशी”.पण केशव खूप थोडं बोलला ,जणू फक्त हाय,हॅलो.आणि त्यांचं संभाषण संपलं.
सीमा ताईंना थोडं वाईट वाटलं.कारण त्यांचं रिलेशन खूप छान होत.पण दुसरीकडे त्यांना केशव च्या मूळ स्वभाव थोडा माहीत होता. त्यामुळे त्यांनी विचार केला.”केशव ला त्याच त्याच आयुष्यच प्रिय आहे.त्याला नातेसंबंध जास्त जोडायला नको आहेत.तो त्याच्याच विश्वात मग्न आहे. सो ठीक आहे,त्याला जिथे आहे तिथेच राहू दे”.असे बोलून सीमा ताई देखील स्वतःच्या जीवनात व्यस्त झाल्या.
ह्या उदाहरणावरून हेच सांगायचे आहे की, माणसं अचानक बदलतात.केशव साठी सीमा ताई खास होत्या,महत्वाच्या होत्या.पण त्याही पेक्षा त्याला त्याच त्याच आयुष्य महत्वाचं वाटत होतं.सीमा ताईंशी कायम गुंतून राहणं त्याला जणू काही बंधन वाटत होतं.त्यांच्या उपकारांची त्याला जाण नव्हती असे नाही.पण तरी देखील त्याला सीमा ताईंना तितकंच महत्व द्यायचं नव्हतं.म्हणून त्याने त्याचा आयुष्याचा रस्ता धरला.
आणि हेच खरे आयुष्य.तुम्ही कोणासाठी कितीही केले तरी त्याहीपेक्षा जास्त महत्वाचं त्यांच्या आयुष्यात दुसरं काहीतरी असू शकतं. आणि हेच वास्तव आज प्रत्येकाने स्वीकारणे गरजेचे आहे.उगाच कुढत बसून काहीच साध्य होत नाही.प्रत्येक व्यक्तीसाठी तुमचे महत्व नेहमीच असतेच असे नाही. कारण त्यांचे आयुष्य वेगळे असते आणि तुमचे.
तुम्ही कित्येकदा विचार करतात,की हा माणूस इतका कसा बदलला.मी तर किती केले ह्याच्यासाठी.पण हा विचार चुकीचा आहे.तुम्ही फक्त चांगले कर्म करीत राहा बाकी काहीच अपेक्षा ठेवू नका.कारण कोणाशी कितीही ऋणानुबंध जुळले गेलेले असले तरी त्या व्यक्तीबरोबरचा तुमचा प्रवास हा अनेकदा तात्पुरताच असतो.हेच आयुष्याचे सूत्र आहे.
सो ,आयुष्य जसे पुढे येत आहे तस तसे मनमोकळेपणाने जगून घ्या.प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधत बसू नका.कारण काही प्रश्न अन्नूतरीतच राहिलेले चांगले असतात.त्यांची उत्तरं जर तुम्ही शोधत राहिलात तर जगणं कधी कधी मुश्किल होत.म्हणून जे घडतंय ते घडू द्या…चांगल्यासाठीच आहे ते…
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

