Skip to content

काही जखमा ह्या आपल्या अति जवळच्या व्यक्तींना सुद्धा सांगता येत नाही.

काही जखमा ह्या आपल्या अति जवळच्या व्यक्तींना सुद्धा सांगता येत नाही.


मेराज बागवान


आयुष्यात कोणाला कोणतीच ‘जखम’ मिळाली नाही असे होत नाही.कधी ना कधी , प्रत्येकाने हे अनुभवलेले असते.कोणी व्यक्ती आपल्याला सोडून जाते, संकटकाळी सर्व जण साथ सोडून जातात, विनाकारण अपमान, अन्याय सहन करावा लागतो.व्यक्ती परित्वे ह्या जखमा बदलत जातात. ह्या जखमा , ही दुःखे संपली तरी देखील मनावर कायम कोरल्या जातात.संकट, दुःख, समस्या आली की आपण आपोआपच आपल्या जवळच्या व्यक्तींशी ते शेअर करतो, बोलतो.पण काही जखमा ह्या आपल्या अति जवळच्या व्यक्तींना सुद्धा सांगता येत नाही.

कोणतीही जखम असो, दुःख असो, अनुभव असो , त्यामूळे आपण तावून सुलाखून निघतो. ती दुःखेच आपल्याला जगण्याची नवी उमेद देते.पण तरी देखील अशा वेळी एक मानसिकता होते, ती म्हणजे कोणाला काहीच सांगू न वाटणे.एकामागे एक दुःखे येत राहतात. माणूस ती सोडविण्याचा प्रयत्न करीत असतो.पण जवळच्या व्यक्तीला देखील ते सांगू वाटत नाही.कारण , त्या दुःखांनीच , जखमांनीच माणसाला तसे बनवलेले असते.शांत राहून जीवन जगावे हीच मानसिकता त्यामुळे बनत जाते.मनावर इतका आघात झालेला असतो की त्या दुःखाची आठवण सुद्धा नको वाटते.मग माणूस शांत राहायला लागतो.

कधी वाटत असते, आपल्या दुःखामुळे आपल्या जवळच्या व्यक्तींना त्रास नको, ते त्याचा ताण घेतली, काळजी करतील म्हणून देखील माणूस आपल्या माणसांजवळ व्यक्त होत नाही.मन अशा वळणावरती येऊन पोहचते जिथे त्या जखमांवरची खपली काढायला मन धजावत नाही.कोणत्याच गोष्टीत मन कायमचे गुंतू नये असे नेहमी वाटत राहते.

अगदी लहान वयात काही जखमा जन्मभरासाठी मिळालेल्या असतात.बालवयात शिक्षण सोडावे लागते, आई-वडिलांचा आधार सुटतो, आर्थिक परिस्थिती कोलमडते.आणि अशा सर्व घटनांचा मात्र दूरगामी परिणाम त्या व्यक्तीवर होत असतो.मग अगदी कमी वयात मोठ्या माणसासारखा ‘समजुतदारपणा’ येतो.संयम वाढतो आणि मग किती जरी जवळच्या व्यक्ती भोवताली असतील तरी देखील मन एकटे पडते.कधी कधी एक प्रकारचे नैराश्य देखील येते.आणि हेच आपले आयुष्य अशी देखील मानसिकता होते.आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे माणूस अबोल होतो.

एखादी जखम जेव्हा आयुष्यात मिळते तेव्हा माणूस आतून खूप भावनिक झालेला असतो मात्र बाहेर तो खूप व्यवहारी वागत असतो.वरवर तो दाखवत असतो की , मी कोणत्याच भावनेच्या आहारी जाणार नाही.आणि म्हणूनच तो माणसांपासून दूर दूर जायला बघत असतो.आणि याचे कारण म्हणजे पूर्वी आलेले अनुभव.मग किती जरी विश्वास ठेवणारी व्यक्ती आयुष्यात भेटली तरी देखील तो माणूस त्या व्यक्तीबरोबर चालू शकत नाही, तिची साथ देऊ शकत नाही.कारण कधी तरी कुठे तरी त्याचा विश्वासघात झालेला असतो.म्हणूनच कोणावरही पटकन विश्वास ठेवू वाटत नाही .आणि यापेक्षा निशब्द राहणे ती व्यक्ती पसंत करते.

आयुष्यात जेवढ्या जास्त जखमा मिळतील तेवढा जास्त माणूस खंबीर, कणखर, निडर ,सकरात्मक आणि यशस्वी होतो.पण दुसरीकडे तो आपल्या जवळच्या व्यक्तींजवळ देखील आपले मन मोकळे करू शकत नाही.अशा व्यक्तींना स्वतःचाच सहवास खूप हवाहवासा वाटतो आणि त्यामुळेच माणसांच्या गर्दीत देखील तो स्वतःला कायम एकटा समजत असतो.

इतर जण जेव्हा अशा व्यक्तींच्या सहवासात येत असतात, तेव्हा त्यांना त्यांचे असे वागणे बघून कधी असेही वाटत असते की ,’अरे ह्याला/हिला माणसांची किंमतच नाही.किती हा माणूसघाणेपणा,वगैरे वगैरे..पण त्यांना असे पारखण्यापेक्षा, त्यांच्या विषयी असे कोणतेही मत बनविण्यापेक्षा त्यांच्या ह्या वागण्यामागची ही मानसिकता इतरांनी थोडी समजून घेतली पाहिजे.आणि मग त्यांच्या वाटेत कोणताही अडसर न ठरता , त्यांना दुरूनच मदत करता आली पाहिजे.यातच त्यांचे आणि तुमचे यशस्वी जीवन आहे.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!