कधीतरी चांगला हेतू ठेवून जगणारे आपण आजकाल पद्धतशीर हेतू ठरवून वागतोय.
मेराज बागवान
आजकाल एक मानसिकता सरसकट कमी अधिक प्रमाणात प्रत्येकामध्ये कधी ना कधी दिसून येत आहे आणि ती मानसिकता म्हणजे, ‘कधीतरी चांगला हेतू ठेवून जगणारे आपण आजकाल पद्धतशीर हेतू ठरवून वागतोय.’ हो हे असे घडताना दिसत नाही.त्याला कारणे देखील बरीच आहेत.पण मी मानसिकता का आणि कशी होत आहे हे पाहणे गरजेचे आहे.
आजचे जग खूप बदलत आहे. स्पर्धा, तंत्रज्ञान, माहिती-तंत्रज्ञान, इंटरनेट यामुळे सर्व काही नेहमी बदलत आहे. आणि ह्या सगळ्याचा परिणाम आपल्यावर होतो आहे. आपली वागणूक बदलताना दिसते आहे.आपण आजकाल कोणाशी संवाद साधायचा असो वा काही गोष्ट करायची असो काहीतरी हेतू ठेवून तो करीत आहे.आधी सहज मित्राला-मैत्रिणीला फोन करणारे आपण आज फोन तर करीत आहोत पण त्यामागे काही ना काही हेतू जरूर आहे.
हे असे अनेक छोट्या छोट्या बाबतीत अगदी सहज घडत आहे. आणि आजकाल ह्यात कोणाला काही वेगळे देखील वाटत नाही.जणू हीच आपली जीवनशैली बनत चालली आहे. आणि त्यातही कोणी कोणताही हेतू न ठेवता बोलत असेल किंवा एखादी गोष्ट करीत असेल तर त्याचे कौतुक करण्याऐवजी त्याच्यावर शंकाच जास्त घेतली जाते.’त्याने ना हे अमुक एक गोष्ट मिळविण्यासाठी केले असेल.त्याला तमुक एक गोष्ट हवी असेल म्हणून तो असा वागत असेल’.असे अनेकजण म्हणताना दिसतात.का तर आजकाल कोणताही हेतू न बाळगता वागणारा माणूस जणू ‘गटात न बसणारा झाला आहे’.
पूर्वी विनाकाही कारण कट्ट्यावर जमणारे आज काही ना काही कामाच्या हेतूने जमत आहेत.का तर म्हणे, ‘आजकाल वेळ कुठे आहे,कोणाला कोणासाठी’.अशाच प्रकारे प्रत्येकजण एकमेकांना भेटतो आहे , पण काही ना काही हेतू ठेवून. सर्वांचे एकच मत, ‘माझे काम झाले पहिजे’.माझी गरज भागली पाहिजे.आणि हे आज सर्वत्र अगदी सहज पहावयास मिळते आहे.
कोणी आर्थिक अडचणीचे करण ठेवून दुसऱ्याशी बोलतो आहे, तर कोणी भावनिक आधार हवा म्हणून दुसऱ्याशी बोलतो आहे.गरज प्रत्येकाला असतेच कोणती ना कोणती.पण आजकाल ह्यामध्ये थोडा जास्तच ‘व्यावहारिक दृष्टीकोन’ वाढत आहे.अनेकजण विचार करतात ,’आजकाल कोणीच विश्वास ठेवण्याच्या लायक नाही.पण कोणी स्वतः देखील विश्वासु व्यक्ती होण्याचा प्रयत्न करीत नाही.आणि मग पध्दतशीर हेतू ठेवूनच नाती देखील जोडली जातात.
एकमेकांच्या घरी जायचे असेल तरी काही ना काही हेतू आहेच.इंटरनेट वर, सोशल मीडिया वर कोणताही हेतू न ठेवता ‘वेळ घालवणारे’ आपण, प्रत्यक्ष जीवनात मात्र कोणतीही गोष्ट करण्याआधी, कोणाशीही बोलण्याआधी अनेकदा विचार करतो. ‘एखाद्याचे भले व्हावे’ असे तर आपल्याला वाटतेच, पण मग मी त्याचे काही तरी चांगले केले तर त्याने पण मग माझ्यासाठी काही ना काही चांगले केलेच पाहिजे हा दुसरा ‘पध्दतशीर हेतू’ चांगलाच गाजत आहे.
मी त्याला अडचणीत मदत केली, त्याच्या गरजेच्या वेळी उपयोगी पडलो, तर मग त्याने देखील मला नेहमी लक्षात ठेवावे असा एक पध्दतशीर हेतू मनात आल्याशिवाय राहत नाही.मी तिला वाढदिवसाला खूप छान भेटवस्तू दिली, तिला किती खुश केले.मग आता ती पण माझ्याशी असेच वागेल, असा हेतू ठेवून काही ‘चांगल्या गोष्टी’ केल्या जातात.
अशी ही मानसिकता आपल्यामध्ये रुजत चालली आहे. आणि ह्या पध्दतशीर हेतू मुळे अनेक नाती फक्त नाही फक्त ‘प्रॅक्टिकल’ बनत चालली आहेत.माणुसकी आहे पण त्याबरोबर हेतू देखील आहे.विश्वास आहे पण त्याबरोबर अपेक्षा देखील आहेत.संवाद आहे पण सुसंवाद नाही.फक्त आणि फक्त तर्क, वितर्क आणि अंदाज बांधणे.
असेल हा आधुनिक जीवनशैलीचा परिणाम.पण माणूस माणसापासून कुठे तरी दुरावत चालला आहे हे नक्की.माणूस करत असेल प्रगती, यशाची उंची गाठत असेल, पण नाती कुठेतरी अयशस्वी ठरत आहेत. भावभावना आजही आहेत, पण भावनांचे बाजारीकरण करून जगणारे देखील अनेक आहेत.
मग आता प्रश्न उरतो तो म्हणजे , ‘मग जगायचे तरी कसे’? मनमोकळे की हेतू ठेवून? आपल्यानसोबत की आपल्यांकडून फक्त अपेक्षा पूर्ण करण्यासाठी? जन्मभर एकमेकांसाठी की जन्मभर हेतू ठेवून एकमेकांबरोवर जगण्यासाठी?
खूप छोट्या छोट्या गोष्टी आपले जगणे ठरवत असतात.ह्या गोष्टी समजायला कुठले ‘रॉकेट सायन्स’ शिकण्याची गरज नसते.तर गरज असते की आत्मपरीक्षण करण्याची आणि स्वतःला बदलण्याची…..
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
