कधी कधी असं वाटतं, आपण नेमकं कोणासाठी जगतोय हेच कळत नाही.
अपर्णा कुलकर्णी
अश्विनी चहा आण ना, हेमंतरावांच्या या बोलण्यावर अश्विनी ताई हातातील कणीक मळण्याचे काम सोडून पटकन चहा घेऊन आल्या. कारण उशीर झाला तर हेमंतराव त्यांच्यावर चीडणार आणि काहीतरी बोलणी ऐकून घेण्यापेक्षा सरळ समोर कप ठेवलेला बरा म्हणून. अग जरा पोहे करतेस का ?? चारच घास कर खाण्याची खूपच इच्छा झाली आहे, चहाचा कप अश्विनी ताईंनी हातात ठेवताच हेमंतराव म्हणाले.
अहो आताच कणीक मळत होते मी अजून मळून झाली पण नाही तोपर्यंत हे पोह्याच काय मध्येच ?? परत स्वयंपाक तसाच शिल्लक राहतो. अश्विनी ताई ओरडून बोलत होत्या कारण हेमंतरावांना ऐकू येत नव्हते. असुदे ग खातो मी उद्या पोळ्या पण आता पोहे करून दे. हा माणूस काही स्वतःच खर केल्याशिवाय गप्प बसणार नाही त्यापेक्षा पोहे त्यांच्या डोमाल्यावर करून खायला घातलेले बरे, अश्विनी ताई स्वतःशीच बडबडत किचनमध्ये गेल्या.
दोनच दिवसांपूर्वी अश्विनी ताईंनी वयाची साठी ओलांडली होती. त्यांना तीन मुलं. एक मुलगा आणि दोन मुली. मुलींची लग्न झालेली, त्या मोठ्या होत्या तर मुलगा शेंडेफळ. शिवाय वाट पाहून झालेले आणि एकुलता एक नवसाचे होते. त्यामुळे लाडाकोडात वाढलेले. पण आता त्यालाही तीस वर्षे पूर्ण झाली होती. अजिंक्य अजूनही अविवाहित होता.
अश्विनीताई त्याच्या लग्नासाठी चार वर्षांपासून प्रयत्न करत होत्या पण अजिंक्य ना धड शिकला होता ना वडिलोपार्जित जमीन नीट सांभाळत होता. घरात बसून मोबाईलवर काहीना काही उद्योग चालूच होते त्याचे. पण ते काही अश्विनी ताईंना पटत नव्हते. त्यांनी अजिंक्यच्या नोकरी साठीही अनेक खटपटी केल्या होत्या पण अजिंक्य कुठेच सहा महिन्यांपेक्षा जास्त टिकला नव्हता. कोणत्या ना कोणत्या कारणाने त्याचे तिथल्या लोकांशी वाद होत होते आणि आता तर नोकरी न करण्याचा निर्णय घेऊन तो मोकळा झाला होता.
त्यामुळे त्याला स्थळे आली तरी मुलगा असा बसून खातो म्हणून मुलगी काही मिळत नव्हती. शिवाय दिसायला जेमतेम आणि तब्येतीने खूपच नाजुक. एकंदरीतच अश्विनीताई काळजीने झुरत होत्या. कारण त्यांना ही वयोमानानुसार काम होत नव्हते शिवाय लग्नाची जबाबदारी पार पाडण्याची आणि सून कधी येईल याची स्वप्ने त्या रंगवत होत्या. त्यासाठीच उपवास, व्रत, वैकल्ये सुरू होती.
घरात हेमंतराव आणि अजिंक्य हे दोघे असे होते. घरात बसून फक्त अश्विनी ताईंना त्रास देणारे आणि काम वाढवून ठेवणारे. हेमंतरावांनी फक्त शेती केली होती. आता वयामुळे त्यांनी सगळा कारभार अजिंक्यच्या हातात सोपवला होता. आजवर त्यांनी बायकोला छळण्या पलीकडे काही केले नव्हते. तरुणपणी लवकर वंशाला दिवा देत नाहीस म्हणून अश्विनी ताईंना मारहाण केली होती, व्यसन लावून घेतले होते आणि कोणत्याही वेळी पाहिजे तसे बायकोला राबवून घेतले होते.
अश्विनी ताई यांच्या दोन्ही मुली पुण्यातच होत्या. मोठी अंकिता सुखात होती. नवऱ्याने आणि तिने मिळून छान व्यवसाय सुरू केला होता आणि चांगला चालत ही होता. शिवाय अंकिताचे तिच्या नवऱ्याशी छान सुर जुळले होते. एक मताने दोघेही निर्णय घेत होते आणि संसाराची गाडी एका मुलीसोबत पुढे नेत होते. तर दुसरी मुलगी आराधना घरातच बसून होती कारण तिचा मुलगा लहान होता आणि त्याला बघणारे दुसरे कोणीही नव्हते.
आराधनाचा नवरा क्लार्क म्हणून नोकरी करत होता पण अत्यंत लबाड आणि आतल्या गाठीचा माणूस होता. नवरा म्हणजे उशा खालचा साप असतो याची प्रचिती तो आराधनाला रोज नव्या पद्धतीने करून देत होता. त्यात मुलगा जेमतेम ५-६ वर्षांचा पण तो ही इतका हट्टी आणि आराधनाला त्रास देणाराच होता. ती बिचारी रोज अश्विनीताईंना फोन करून घरातल्या गोष्टी सांगत होती कारण मन मोकळे करण्यासाठी आईच जवळची व्यक्ती होती आणि अश्विनी ताई पण तिला स्वतःचे अनुभव सांगून शांत राहायला सांगत होत्या. पण मुलीच्या दुःखाचा ताण अश्विनी ताईंना होताच. आपली मुलगी सुखी असावी असेच त्यांना वाटत होते पण तसे घडत मात्र नव्हते.
एके दिवशी सकाळी सकाळीच अश्विनी ताईंना जरा कणकण आल्यासारखे वाटले. तरीही घरात झोपून चालणार नाही म्हणून त्या काहीच न बोलता काम करत होत्या. तेवढ्यात हेमंतरावांनी हाक मारली आणि चहा आणायला सांगितले. बिचाऱ्या अश्विनी ताईंनी चहा दिला आणि स्वतःही घेतला. चहा घेतल्यावर त्यांना थोडे बरे वाटले आणि त्यांनी स्वयंपाकाला सुरुवात केली. तेवढ्यात पुन्हा हेमंतराव स्वयंपाक घरात आले आणि रोज रोज पोळी भाजी काय करतेस दुसरं काहीतरी खायला कर म्हणाले.
पण आता मात्र अश्विनी ताई चिडल्या आणि खायचं असेल तर खा नाहीतर उपाशी बसा म्हणाल्या. त्यावर दोघांची खूप भांडण झाली. अजिंक्य वाण सामान आणायला गेला होता. तो येताना मिसळचे सामान घेऊन आला आणि संध्याकाळी करून दे म्हणाला. आज करत नाही उद्या करते म्हणाल्यावर अजिंक्य ने काय झालं विचारलं त्यावर बरं वाटत नाही असे अश्विनीताई म्हणाल्या त्यावर जाऊन ये डॉक्टरकडं इतकचं अजिंक्य म्हणाला. पण चल जाऊ आपण दवाखान्यात, मी जातो घेऊन तुला अस तो म्हणाला नाही. आणि हेमंतरावांनी तुला काय होतंय ?? हे ही विचारले नाही तर अजिंक्य नंतर खोलीतून बाहेर आला नाही. अशाही परिस्थितीत अश्विनी ताईंनी दोघांसाठी स्वयंपाक मात्र करून ठेवला होता पण त्याची जाण मात्र कोणालाच नव्हती.
आजवर अश्विनी ताईंनी आपले पूर्ण आयुष्य नवऱ्याच्या धाकाखाली आणि नंतर मुलांच्या सुखासाठी वेचले होते. त्यांची कोणतीच हौस मौज आजवर पूर्ण झाली नव्हती आणि तशी त्यांनी अपेक्षाही कधी केली नव्हतीच कोणाकडून. कारण नवरा कशा स्वभावाचा आहे हे त्यांना कळून चुकले होते. पण मुलांकडे मात्र नेहमीच त्यांनी अपेक्षेने पहिले होते. निदान त्यांना तरी आपली परिस्थिती समजेल आणि त्यांचा प्रेमळ आधार मिळेल असे त्यांना वाटत होते आणि अर्थात त्यात काहीच चुकीचे नव्हते.
नेहमीच हेमंतरावांचे दारू पिऊन घरात गोंधळ घालने, मार हान करणे, कुठल्याही गोष्टीवरून टोकाचा राग आणि त्यावर होणाऱ्या गंभीर परिणामास अश्विनी ताई सामोरे गेल्या होत्या केवळ मुलांसाठी. आज ना उद्या तेच आपला आधार आहेत या आशेपोटी. पण आता मुलानेच त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे अश्विनी ताई रडत होत्या. त्यात आपल्या आराधनाचा फोन आला हे पाहून त्यांनी अंथरुणावर पडूनच फोन घेतला आणि आईचा आवाज ऐकून लगेच काय झालं ?? असे काळजीने विचारले. तेंव्हा अश्विनी ताईंना अश्रू अनावर झाले आणि सगळे त्यांनी आपल्या मुलीला सांगितले.
मला आता हे सहन होत नाही, कधी कधी असं वाटत, मी कोणासाठी जगतेय हेच कळत नाही आराधना. नवरा असून उपयोग नाही आणि मुलगा माझ्याकडे बघायला तयार नाही. अश्विनीताई हताश होऊन बोलत होत्या तर आराधना सांत्वन करण्याचा प्रयत्न करत होती.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

लेखात केवळ समस्या च समस्या मांडली, समाधान नाही मांडले. हिंदू संस्कृतीत अनेक संस्कार चे पर्व आहेत, परंतु त्याचा मूळ गाभा असल्या समाज समस्या नी नासविला. टाळी एका हाताने कधीच वाजत नाही, त्याला जबाबदार दोन्ही. आईने मुलीच्या संसारात जास्त नाकं खुपसू नये, लग्न होताच त्यांची त्यांची उत्तम जबाबदारी असते, परंतु, येथूनच खरी समाज समस्या ची सुरुवात होते मग तो संसार नवीन असो वा जुना. येकाचे समर्थन, पाठ राखण, डोळेझाक, ही बीजे आहेत मॅडम!