ज्यांच्यासाठी तुम्ही कितीतरी वेळा ऍडजेस्टमेंट केलेली असते, ते सुद्धा बदललेले दिसतात.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
“मीना, ए मीना” कल्याणी किती वेळ हाका मारत होती पण मीनाच काही लक्ष गेलं नाही. शेवटी तिने जोरात हाक मारली तेव्हा कुठे मीनाने मागे वळून पाहिलं. तिने पाहिल्यावर कल्याणीने हुश्श म्हणून एक सुस्कारा सोडला आणि तिच्या जवळ आली. “अग कधीची हाका मारते आहे तुला! किती वेगाने चालतेस अग! त्यात मागे पण पाहिलं नाहीस मला वाटलं मीच चुकीच्या माणसाला हाक मारली की काय! पण नाही तूच आहेस. मला ओळखलं की नाही? मी कल्याणी.”
मीना तिच्याच विचारात चालली होती त्यामुळे तिला कल्याणीची हाक ऐकू गेली नाही. पण जेव्हा तिने मागे वळून पाहिलं तेव्हाच कल्याणीला ओळखल होत. जवळ आल्यावर देखील कल्याणी एकसारखी बोलत होती त्यामुळे हिला काही बोलताच आलं नाही. ती बोलायची थांबली तेव्हा कुठे मीना बोलू लागली. “कल्याणी कल्याणी जरा शांत हो, मी ओळखलय तुला आणि तुला कोण ओळखणार नाही तुझ्या आवाजातच अशी काही जादू आहे की ओळख विसरलेला माणूस पण पुन्हा सर्व आठवेल.” कल्याणीला समजल की मीना तिची थट्टा करत आहे. ती हसू लागली व म्हणाली, “अजूनही माझी मस्करी करायची एकही संधी सोडत नाही ना तू! तशीच आहेस जशी आधी होतीस.” अस म्हणत तिने मीनाला मिठी मारली.
दोघी अगदी आधीपासून खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. दोघांची घर जवळ जवळ. लहानपणी खूप चांगला काळ त्या दोघांनी एकत्र घालवला होता किंबहुना त्या दोघी एकमेकांसोबत होत्या म्हणून तो काळ चांगला झाला अस म्हणायला हरकत नाही. कारण परिस्थितीमध्ये तर जमीन आस्मानाचा फरक होता. कल्याणी खूप सधन कुटुंबात वाढली होती. तर मीना अगदी साध्या कुटुंबात. पण या गोष्टीचा त्यांचा मैत्रीवर कधी कोणता परिणाम झाला नाही. कारण स्वभावच तसा होता. विशेषतः कल्याणीचा.
अगदी मनमोकळ्या स्वभावाची आणि सर्वांना सामावून घेणारी होती ती. त्यामुळेच तर सर्वांना आवडायची. लहानपणी तिने मीनाला बऱ्याच गोष्टीमध्ये मदत केली होती. तिने मीनाचे कष्ट पाहिले होते. घरात मीना सर्वात मोठी होती. तिच्या मागे दोन भाऊ. आई बाबा छोटी मोठी काम करत. मीनाला तिची शाळा देखील पूर्ण करता आली नव्हती. घराची जबाबदारी तिच्यावर पडली होती. त्यामुळे अगदी लहान वयात तिला मोठ व्हावं लागलं होत. हे सर्व कल्याणीने पाहिलं होत. नंतर कल्याणीच पूर्ण कुटुंबच दुसरीकडे राहायला गेलं. तिला जायची अजिबात इच्छा नव्हती. कारण मीनाला तिचा खूप आधार वाटे. पण तिच्या हातात त्यावेळी काही नव्हत. पुढे कल्याणी खूप शिकली तिचं लग्न झालं व ती परदेशात स्थायिक झाली.
मध्यंतरीच्या काळात मीनाच्या आयुष्यात पण खूप घडामोडी घडल्या. त्यांची पण घर बदलली. त्यामुळे त्यांची नंतर काही भेट झाली नाही. पण तरी मैत्री इतकी घट्ट होती की कल्याणीने मीनाला ओळखलं. आज कल्याणीला इतक्या वर्षांनी पाहून मीनाच्या डोळ्यात पाणी आलं. लहानपणीच्या सर्व आठवणी डोळ्यासमोर आल्या. ती एक क्षण गप्पच झाली. ते पाहून कल्याणी तिला हलवून म्हणाली, “अग मिनू कुठे हरवलीस?” तेव्हा तिने कल्याणीकडे पाहिले आणि म्हणाली, “अग नाही आहे इथेच.
खूप वर्षांनी पाहिलं ना तुला, लहानपण डोळ्यासमोर आलं बघ!” कल्याणी हसुन म्हणाली, “वाटलच मला! पण आता आपण इथे उभ राहून जुन्या गोष्टी आठवत बसायच्या आहेत की त्या पुढे पण बोलायच आहे? चल बागेत जाऊन बसू आणि निवांत बोलू.” ती जवळ जवळ ओढतच मीनाला बागेत घेऊन गेली तिच्या उत्तराची वाट न पाहता. मीना पण तिच्यासोबत गेली. इतक्या वर्षात मनात साठलेलं कुठेतरी मोकळं व्ह्यायला हवच होत. त्या दोघी एका बाकावर जाऊन बसल्या. कल्याणी खायला घेऊन आली.
त्या गप्पा मारू लागल्या, सुरुवात मीनानेच केली. बोलण्यातून हे तरी समजलं की कल्याणीच लग्न एका चांगल्या कुटुंबात झालं होत. खूप वर्ष परदेशात राहून आता ती भारतात परतली होती. तिला दोन मुल होती. दोन्ही चांगल शिकून आता चांगल्या पदावर काम करत होती. एकंदरीत चांगल आयुष्य ती जगत होती.
आता कल्याणीने मीनाला तिच्याविषयी विचारायला सुरुवात केली, “मग आमचे भावोजी काय करतात?” त्यावर मीना उपहासाने हसत म्हणाली, “भावोजी, अग लग्नच नाही तर कसले भावोजी, आणि काय.” कल्याणी ला या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटल आणि वाईट ही. कारण मीना लहानपणी एक चांगल आयुष्य जगू शकली नाही. निदान तिचं लग्न झालं असल तर तिथे तरी सुखा समाधानाचे दिवस जगू शकेल, जगत असेल अस कल्याणीला इतकी वर्ष वाटत होत.
पण इथे सर्व चित्र उलट होत. तिने याच कारण मीनाला विचारलं, तेव्हा मीना म्हणाली, “अग तू गेलीस आणि मी खरच मनाने एकटी पडले. आई बाबा कधी घरी नव्हतेच. काही वर्षांनी ते आपल्यासोबत आहे हीच जाणीव गेली. ती दोघं ही आम्हाला सोडून गेली. अश्या परिस्थितीत मीच सतीश आणि नंदन (भाऊ) यांची पालक झाले. आई बाबा असताना पण मीच त्यांना सांभाळलं.
पण त्यावेळी मला आई बाबांचा या बाबतीत आधार वाटायचा. आता तर मीच त्यांच्या जागी आले. नातेवाईक म्हणाले, आम्ही सांभाळतो दोघांना, तू लग्न कर, नंतर वय झालं की गोष्टी कठीण होतात. पण मला तो स्वार्थीपणा वाटला. माझ्या आनंदासाठी मी त्या दोघांना वाऱ्यावर सोडू शकत नव्हते. तसही आधीपासून माझं आयुष्य त्या दोघांभोवती फिरत होत. आता ते त्यांच्यासाठीच घालवायचं अस मी ठरवलं. काम करून मी त्यांना शिकवलं, त्यांची लग्न लावून दिली.
मला कधी या गोष्टीचा त्रास वाटला नाही. कारण आई बाबांनंतर मीच तर होते त्यांना.
पण कला, परिस्थिती पण किती थट्टा करते बघ आपली. कसलाही हिशोब न ठेवता मी इतकी वर्ष, माझं आयुष्य त्यांना दिलं ती मुल आता मला म्हणतात ताई तू वेगळं घर बघ. आम्हाला इथे अडचण होते. माझ्या पण तोंडून रागात कधीतरी काहीतरी निघत, जेव्हा नंदन मला म्हणतो, सारखं इतकं केल तितकं केल म्हणतेस, तुझ्या काही आम्ही असतो तर आम्ही पण हेच केल असतं. मोठी बहीण म्हणून तुझ कर्तव्यच होत ते. फार काही त्याग केला नाहीस तू. कला मी माझं मीपण विसरून इतकं सर्व केल त्याचा मोबदला पाहिला का मला काय मिळाला? मी आता अडचण झाली आहे.”
कल्याणीच्या डोळ्यातपण पाणी आलं. ज्या आपल्या मैत्रिणीला तिचं लहानपण मिळालं नाही तिला तिचं नंतरच आयुष्य पण मिळू नये ही खूप दुःखदायक गोष्ट होती. पण तिने मीनाला समजावलं, तिला आधार देत म्हणाली, “मीना तू केलेलं कधीही वाया जाणार नाही. आणि परिस्थिती पण कधी सारखी राहत नाही. आणि जोपर्यंत मी तुझ्या सोबत आहे तोपर्यंत ती कधीच एकटी पडणार नाहीस. त्यांनी तुला वेगळं राहायला सांगितल आहे ना? ठीक आहे. आजपासून तू माझ्यासोबत राहणार आणि यापुढे तू तुझ आयुष्य जगणार अस म्हणत कल्याणीने मीनाला उठवले व स्वतःसोबत घेऊन निघाली.”
मीना निघाली होती तिच्या आयुष्याची नवीन सुरुवात करायला.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

Chan