Skip to content

“ज्या लोकांमुळे प्रचंड त्रास झाला, त्यांना शेवटचा नमस्कार करून पुढे चला…”

“ज्या लोकांमुळे प्रचंड त्रास झाला, त्यांना शेवटचा नमस्कार करून पुढे चला…”


मधुश्री देशपांडे गानू


हे शीर्षक वाचल्याबरोबर माझ्या मनात एक नाव लख्खकन चमकून गेलं. “आदरणीय पद्मश्री सिंधुताई सपकाळ”. यांनी अगदी लहान वयात अत्यंत कल्पनेपलीकडे यातना, दुःख भोगले. अनन्वित त्रास ज्यांना सहन करावा लागला. अगदी भीक मागून गुजराण करावी लागली. गाईंच्या गोठ्यात मुलीला जन्म द्यावा लागला. त्याच पुढे अनेकांची माय झाल्या. त्यांच्या मनातील माया, प्रेम, काळजी, आपुलकी, माणूसपण या भयंकर त्रासातही तगून राहिलं. त्यांनी अनेकांना जीवनदान दिलं. अनेकांचे आयुष्य सावरले.

पण त्यांनी कधीही बदला घेण्याची भाषा केली नाही. घर, नवरा, सासर, गाव यांना कायमचा शेवटचा नमस्कार केला आणि पुढे निघाल्या. पुढे त्यांचं आयुष्य त्यांनी कसं घडवलं हे तर सर्वज्ञातच आहे. अगदी नवऱ्यालाही त्याच्या शेवटच्या दिवसात आईच्या मायेने त्यांनी सांभाळलं. शतशः प्रणाम आहे या माऊलीला..

केवढं धैर्य, केवढा त्याग, केवढी जीजिविषुवृत्ती आणि तरीही जपलेलं माणूसपण. अगदी चपखल उदाहरण आहे ना आजच्या विषयाचं!

काही लोक मग ते अगदी रक्ताच्या नात्याचे असोत, नातेवाईक असोत, नाहीतर मित्र-मैत्रिणी, जिवलग असोत, ज्यांच्यामुळे आपल्याला प्रचंड त्रास होतो. हा त्रास कोणत्याही स्वरूपाचा असू शकतो. मानसिक, शारीरिक, आर्थिक ज्यामुळे आपल्याला प्रचंड मनस्ताप होतो. आपला वेळ, ऊर्जा, ताकद, पैसा, भावनिक गुंतवणूक सगळ्या पातळ्यांवर आपलं नुकसान होतं. कित्येक वेळा आयुष्याची मोलाची वर्षं वाया जातात.

अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर एखादी नवतरुणी प्रेमात पडते. जीवनाचा, माणसांचा कोणताही अनुभव नसतो. माणसं ओळखता येत नाहीत. प्रेमाच्या नाजूक भावनेत वाहत जाते. आणि चुकीच्या माणसाच्या प्रेमात पडलोयं हे तिच्या लक्षात येत नाही. आणि एक दिवस तो नराधम डाव साधतो. त्याच्या मित्रांबरोबर तिच्यावर बलात्कार करून तिला जखमी अवस्थेत सोडून पळून जातो. नंतरचे पोलीस, केस, कोर्ट, वकील हे सोपस्कार होतात. त्यांना शिक्षाही होते. पण त्या तरुणीवर शारीरिक, मानसिक, भावनिक जो बलात्कार झाला तिची काय अवस्था झाली असेल??? विचार केला तरी अंगावर काटा येतो.

नैराश्याच्या खाईत ती लोटली जाते. शरीराच्या जखमा तरी कालांतराने भरून येतात. पण मनावर झालेल्या जखमा?? तिचं संपूर्ण भावविश्व उद्ध्वस्त होतं. जीवनावरचा, जगण्यावरचा, माणसांवरचा विश्वास ती गमावून बसते. किती प्रचंड शारीरिक, मानसिक त्रास होत असेल तिला! तिच्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे वाया जातात. तिचं कायमचं नुकसान होतं. काही तरुणी तर आत्महत्या करतात.

तरीही अशा प्रसंगातून गेलेल्या कितीतरी तरुणी पुन्हा नव्या जिद्दीने आयुष्याला सामोरे जाताना आपण पाहिल्या आहेत. ज्या लोकांमुळे प्रचंड त्रास झाला त्यांना शेवटचा नमस्कार करून भूतकाळ मागे टाकून त्या स्वतःचे जीवन आनंदी यशस्वी बनवतात. एकतर्फी प्रेमातून ऍसिड हल्ला झालेल्या आणि कायमचं विद्रूप पण घेऊन जीवनाला सामोरे गेलेल्या कितीतरी तरुणी आज यशस्वी आनंदी जीवन जगत आहेत.

खरंतर कोणालाच असा त्रास नको असतो. सगळ्यांनाच एक सुखी, सुरळीत आयुष्य हवं असतं. पण अचानक नकोसे दुःखद प्रसंग उदभवतात. त्यांचा सामना करावाच लागतो. आपली प्रेमाची माणसं हकनाक गमवावी लागतात. कोणाचं आर्थिक नुकसान होतं. अपघात, युद्ध, नैसर्गिक आपत्ती, आर्थिक फसवणूक अशा कितीतरी त्रासांना कधीतरी सामोरं जावं लागतं. या सगळ्याला कोणी ना कोणी जबाबदार असतं. कोणामुळे तरी आपल्याला प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

पण खरं सांगू! घटना घडून जाते. त्यावेळी त्या घटनेची तीव्रता आणि त्याचे परिणाम सहन करावे लागतातच. हा त्रास भोगूनही संपतो. आपण जीवनात पुढे चालत राहतो. “पण ज्यांच्यामुळे आपल्याला प्रचंड त्रास झाला त्यांना मनापासून माफ करून टाका.” मनापासून त्यांना शेवटचा नमस्कार करा. त्यांच्याशी कोणताही संपर्क ठेवू नका,

पण मनापासून माफ केलेत तर तुम्हीं त्या भूतकाळातील घटनेच्या त्रासातून, त्या ओझ्यातून मुक्त होता. त्या त्रासाकडे, त्या घटनेकडे त्रयस्थ नजरेने पाहता. फक्त त्यातून घेतलेला धडा मात्र कायम स्मरणात ठेवा. मग तुम्हांला भूतकाळात घडलेल्या घटना सतत त्रास देत नाहीत. तुमची ऊर्जा, मानसिक ताकद वाया जात नाही.

हीच ऊर्जा, हीच ताकद तुम्हीं तुमच्यासमोर असणाऱ्या जीवनाला नवसंजीवनी देण्यासाठी उपयोगात आणा. आणि पुढे पुढे चालत राहा. बघा, सुंदर आयुष्य तुमची वाट बघत आहे…


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!