Skip to content

“ज्यांचे शब्द त्यांच्या वागण्याची जुळत नाहीत, अशांपासून सावध राहा.”

“ज्यांचे शब्द त्यांच्या वागण्याची जुळत नाहीत, अशांपासून सावध राहा.”


मधुश्री देशपांडे गानू


“कसमें, वादें, प्यार, वफा सब,
बातें है बातों का क्या????

काही वेळा खरंच असं वाटून जातं ना! माणसं प्रेमाच्या, आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणाभाका घेतात. शब्दं, वचनं देतात, पण त्याप्रमाणे वागत मात्र नाहीत. आपली प्रचंड निराशा होते. विश्वासघात झाल्याची जाणीव तीव्र असते. खूप दुःख होतं. अशा अनुभवातून जावं लागणं खरंच वेदनादायी असतं. आपले विचार खुंटतात. का माणसं अशी वागतात? का आपल्याला हे सारं सहन करावं लागतं? प्रेमाची, विश्वासाची माणसं असा पाठीत खंजीर का खूपसतात? आपलं प्रेम, आपली त्यांच्यातली गुंतवणूक त्यांना दिसत नाही का? कितीतरी अनुत्तरीत प्रश्न पडतात आपल्याला..

माणसाला स्वतःचा गोतावळा हवा असतो. त्याची नाती, प्रेमाची माणसं, मित्र-मैत्रिणी सगळं हवं असतं. जन्माने मिळणारी नाती आणि पुढे त्याने स्वतः निर्माण केलेली, टिकवलेली नाती. खरंतर अशा आपल्या असणाऱ्या गोतावळ्यातच माणूस खरा रमतो. त्याला प्रेम, आपुलकी, विश्वास, समजून घेणारी त्याची स्वतःची माणसं कायम हवी असतात. आपल्या कुटुंबामध्ये असे निकोप नातेसंबंध असतील तर माणूस समाधानी असतो. कुटुंबातच ही ताकद त्याला मिळते. पूर्वी माणसाच्या गरजा कमी होत्या. साधनं मर्यादित होती. त्यामुळे वागण्यात एक प्रकारचा सच्चेपणा, प्रामाणिकपणा, विश्वास होता. माणसाला माणसाची किंमत होती.

आता मात्र अत्यंत स्पर्धात्मक, भौतिक सुखांचा मारा असलेल्या समाजात विश्वासू नातं मिळेलच याची खात्री अजिबातच देता येत नाही. मग नातं कोणतंही असो. फक्त स्वतःचा स्वार्थ पाहणारी अप्पलपोटी माणसं स्वार्थासाठी कोणत्याही थराला जातात. अगदी स्वतःच्या रक्ताच्या माणसांनाही दगा देतात. तिथे बोललेल्या शब्दांचं काय मोल??

कोणतेही नातं विकसित होताना त्या नात्याला दोन्हींकडून वेळ द्यावा लागतो. वेळोवेळी ते नातं प्रेम, विश्वास, आदर, क्षमा अशा अनेक आघाड्यांवर पारखून घ्यावं लागतं. तेव्हा ते हळूहळू घट्ट, अतूट होत जातं. आज नातं विकसित व्हायला माणसाकडे वेळच नाही. आणि त्याला लागणारा समजूतदारपणाचाही अभावच आहे. मी, माझं, माझ्यासाठी यापलीकडे माणूस जातच नाही.

उदाहरणार्थ तुम्हांला कोणाशी मैत्री करायची असेल तर सुरुवातीला तुम्ही औपचारिक पणे बोलाल. हल्ली तर सोशल मीडियामुळे सगळं जग जवळ आलंय. मग हळूहळू फोनवर संवाद होईल. यातून ते नातं विकसित होत जाईल. मग प्रत्यक्ष भेटून, अनूभवातून नातं पुढे जाईल.

“कोणत्याही नात्याचा पाया हा संवाद असतो.” तुमच्या बोलण्यातून, शब्दांच्या व्यक्ततेतूनच समोरच्या व्यक्तीला तुम्हीं कसे आहात, ते कळत जातं. मग मैत्री करायची की नाही हे आपण संवादा नुसारच ठरवतो. फेसबुकवर एखाद्या स्त्रीने एखाद्या पुरुषाची मैत्री स्वीकारली तर लगेच त्या पुरुषाने सलगी चे प्रश्न विचारले तर तिच्या मनातून तो लगेच उतरतो. आणि पुढचे संवाद बंद होतात.

तुम्हीं माणूस ओळखायला त्याच्या संवादातूनच शिकता. तुमच्या संवादावर वेळोवेळी एकमेकांविषयी असणाऱ्या भावना व व्यक्त करण्यावरून मैत्री नातं खुलत जातं, बहरतं, टिकतं. कोणतंही नातं टिकण्यासाठी फक्त शब्दांची गरज नसते. तर खूप वेळा अव्यक्त भावनाही समजून घ्याव्या लागतात. न बोलताही तुम्हाला नेमकी, योग्य कृती करता आली पाहिजे. एखादी मैत्रीण जर आजारी असेल तर तुम्हीं लगेच फोन करून तिची चौकशी करता ना! गरज पडली तर तिला हवी ती मदत करता. याने तुमची मैत्री घट्ट होत जाते.

पण खूपदा अशी दिखाव्याची नाती किंवा मित्र-मैत्रिणी पाहायला मिळतात. जे फक्त तुम्हीं समोर असलात की तुमचं तोंड फाटेस्तोवर कौतुक करतात, स्तुती करतात पण तुमची पाठ वळल्या बरोबर तुमच्याबद्दल वाईट बोलणं, गॉसिपिंग करणे सुरू करतात. अशी माणसं कधीच तुमच्या मदतीला येत नाहीत. कारण त्यांच्या शब्द आणि कृतीमध्ये तफावत असते आणि ते तुमचे खरे मित्र नसतात. तुमच्या नातं मैत्री निभावण्याच्या प्रयत्नांना समोरून तेवढीच साथ मिळेल असं नाही. अशावेळी आपण होऊनच दूर व्हावं.

अगदी कामाच्या ठिकाणी, घरी, दारी अशी गोडबोली माणसं तुम्हाला हमखास भेटतात. तुमची स्तुती करणारी, स्वतःबद्दल बढाया मारणारी, “तुला काही लागलं तर मी आहे, मला हाक मार”, असं छातीठोकपणे सांगणारी. पण प्रत्यक्षात मात्र तुम्हांला खरंच गरज असते तेव्हा ही माणसं कुठेही नसतात. गोड बोलून प्रेमाच्या जाळ्यात ओढणारी माणसं अशीच असतात. सोशल मीडियावर तर हे सहज आणि जास्त प्रमाणात पाहायला मिळतं. बरं वयाची ही मर्यादा नाही. न पाहिलेल्या व्यक्तीच्या गोड शब्दांना कसा काय तुम्हीं पटकन पूर्ण विश्वास ठेवू शकता?? आणि फसवणूक झाल्यावर नंतर रडून काय उपयोग?? यातूनच पुढे स्त्रियांवरील अत्याचार, आर्थिक फसवणूक असे गुन्हे घडतात.

मुळात कोणतेही नातं हळूहळू उमलू द्यावं. त्याला वेळ द्यावा. आपण दिलेला शब्द पाळावा. म्हणजे नात्यात विश्वास टिकून राहतो. सहवासाने प्रेम वाढीस लागते. समोरच्या व्यक्तीचा आदर, सन्मान, विश्वास हा कायम हवा. “बोलाचीच कढी बोलाचाच भात” अशांपासून लवकरात लवकर दूर व्हा. यामुळे पुढचे वाईट प्रसंग टाळता येतील. तुम्हांला होणारा भावनिक मनस्ताप टाळता येईल.

मुख्य म्हणजे माणसं ओळखायला शिका. स्वतःबद्दल बढाई मारणारे, तुमचे उगाचच अतिकौतुक, स्तुती करणारे, प्रत्यक्षात तुमची कोणतीही मदत न करणारे पण मोठमोठ्या बाता मारणारे यांपासून सावध राहा.

बहुतेक वेळा सुरुवातीला नातं गोड, आकर्षक वाटतं. स्त्री-पुरुषांचं प्रेमाचं नातं यात तर प्रचंड आकर्षण असतं. त्यामुळे सुरुवातीला सगळंच आलबेल असतं. पण कालांतराने एखाद्याला त्या नात्याचा कंटाळा येऊ शकतो. त्याला ते नातं नकोसं होतं. मग ती व्यक्ती खोटं बोलणं, सटरफटर कारणं देणे, वेळ नसल्याचा बहाणा करणे, बोलायचं, भेटायचं टाळणे असं करू लागते. हे वेळीच ओळखा. भावनांच्या अति आहारी जाऊन वस्तुस्थितीकडे कानाडोळा अजिबात करू नका. तर स्वतःचा स्वाभिमान सर्वोच्च मानून अशा नात्यातून लवकरात लवकर बाहेर पडा. म्हणजे तुमची एकट्याची होणारी फरफट थांबेल.

सुसंवाद हा कोणत्याही नात्यात कायम हवा. हे नातं तुम्हाला हवं आहे हे शब्दांतून आणि कृतीतून वेळोवेळी जाणवून द्यायला हवं. ही जशी तुमची अपेक्षा आहे त्याचप्रमाणे समोरच्या व्यक्तीची ही हीच अपेक्षा आहे, हे लक्षात ठेवा. शब्द आणि कृती यांच्यामध्ये मेळ असण्याची बांधिलकी दोन्हींकडे समान आहे. बोललेले शब्द आणि त्याप्रमाणे कृती असं वर्तन दोन्हींकडून समान पातळीवर होत असेल तर कोणतेही नातं अबाधित, सुंदर, बहरणारंच होईल, हे नक्की…


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on ““ज्यांचे शब्द त्यांच्या वागण्याची जुळत नाहीत, अशांपासून सावध राहा.””

  1. Vaishali prajpathi

    आपले सर्व लेख संपादित छान आहे भावनिक आधार आहे

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!