ज्याच्या हृदयात जे आहे तो तेच देईल मग ते प्रेम असेल किंवा मनस्ताप.
हर्षदा पिंपळे
“ती खूप चांगली आहे. किती छान बोलते माझ्याशी. याआधी इतकं छान कुणी बोललेलं मला आठवतही नाही.इतकं छान कोण बोलतं ? किती मदत करते मला.घरातली नाही ती पण अगदी घरातल्यासारखी वाटते.परकेपणा जाणवत नाही तिच्यामध्ये.
काही वेळातच तिने सगळ्यांना आपलसं केलय.
सगळ्यांनाच जमत नाही असं.बघ नं किती हक्काने, मनापासून सगळ्यांच सगळं करतेय.खरंच असं कुणीतरी भेटायला नशीब लागतं गं बाई….”
सुलभा आजींच्या तोंडून त्या बाहेरून आलेल्या निशाविषयी कौतुकाचे शब्द काही थांबत नव्हते.
अगदी न थांबता सुलभा आजी तिचं कौतुक करत होत्या.कोणास ठाऊक सुलभा आजींवर तिने काय जादू केली होती.सुलभा आजींना तिच्या स्वभावाची चांगलीच भुरळ पडली होती.
सुलभा आजींना तसं फारसं दिसायचं नाही. वयोमानानुसार त्यांची दृष्टी कमी होत चालली होती. अंधूक अंधूक दिसायचं त्यांना.याच गोष्टीचा एक दिवस निशाने फायदा घ्यायचा ठरवला.सुलभा आजींच्या नावावर चांगली प्रॉपर्टी होती.दोन बंगले ,जमीन असं बरच काही सुलभा आजींच्या नावावर होतं.आणि हे सगळं निशाला बळकावयचं होतं.सुलभा आजींच्या या प्रॉपर्टीवर निशा केव्हाच भाळली होती.आणि ती अगदी पूर्व नियोजन करूनच सुलभा आजींकडे आली होती.पण सुलभा आजीला आणि घरातील कुणालाही याची थोडी सुद्धा कल्पना नव्हती.
दिवसामागून अनेक दिवस गेले.हळुहळू निशाचं वागणं बदलतय याची अनेकांना चाहूल लागायला लागली.कारण घरातील काही महत्वाच्या गोष्टी एकामागोमाग एक अशा गायब होत होत्या. इतकचं नाही तर निशा पैशाचे गैरव्यवहार करतेय हेही घरातील लोकांच्या लक्षात आलं होतं.पण तिला बोलायचं कसं हेच त्यांना कळत नव्हतं.कारण सुलभा आजीचा तिच्यावर फार विश्वास होता.
सुलभा आजी निशाच्या विरोधात काहीच ऐकायची नाही.त्यामुळे सुलभा आजी आपल्यावर विश्वास ठेवणार नाही याची घरात सगळ्यांना खात्री होती. शेवटी घरातील लोकांनी निशाचं सत्य समोर आणण्यासाठी प्लॅंनिंग करायचं ठरवलं.मात्र घरातील लोकं जेव्हा प्लॅनिंग करण्यात व्यस्त होती तेव्हाच निशाच्या डोक्यातही काहीतरी शिजत होतं.शेवटी निशाने सगळ्यांचा डोळा चुकवून सुलभा आजीची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतलीच.आणि हे घरातील सर्वांना कळालं तेव्हा फार उशीर झाला होता.पण सुलभा आजी तेव्हाही या सगळ्यापासून अलिप्तच होती.तिला या गोष्टींची जाणीवच नव्हती.
शेवटी जे व्हायचं ते झालं.निशाने एक दिवस संधी साधून सगळ्यांना घराबाहेरचा रस्ता दाखवला. सगळं तिच्या नावावर असल्यामुळे घरातील लोकं काहीच करू शकत नव्हते.अगदी सुलभाआजीसुद्धा.बाहेर जाण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच नव्हता.
सुलभा आजीला जेव्हा हे निशाने केलयं असं कळालं तेव्हा सुलभा आजीचा विश्वासच बसत नव्हता.सुलभा आजीला खूप मोठा धक्का बसला.त्यावेळी काय करावं त्यांना काहीच कळत नव्हतं.शेवटी निशामुळे त्यांना फक्त त्रास आणि त्रासच सहन करावा लागला.
“सुलभा आजी , तरी मी तेव्हाच सांगितलं आहे की या निशाचं लक्षण काही बरोबर नाही. तिला घरात ठेवू नका जास्त. पण तु ऐकलं नाही. आता बघ तिच्यामुळे किती त्रास होतोय.”
सुलभा आजीची नात म्हणाली.
“हो गं,चुकलं माझं.मी आपली तिच्या स्वभावाला पाहून हुरळून गेले.मला वाटलं असेल चांगली.पण खरंच चुकलं माझं.शेवटी काय तिच्या मनात चांगल्या गोष्टी नव्हत्याच असचं म्हणावं लागेल.ज्याच्या मनात खरचं काही चांगलं असतं तो चांगलच देतो.नाहीतर निशासारखेच मनःस्ताप देणारे काही कमी नसतात.”
सुलभा आजी म्हणाली.
तर मित्रांनो, हे झालं उदाहरण. पण आपल्या आयुष्यात रोज कुणीतरी येतं आणि जातं.कुणाचा स्वभाव कसा असतो ते काही आपल्याला क्षणात समजत नाही. कुणी चांगलं असू शकतं तर कुणी वाईटही असू शकतं. आपण मात्र नेहमीच आपल्या परीने तर्क लावत असतो.”ही चांगलीच असेल,ती अशीच असेन,तो तसाच आहे.” असे अंदाज आपण लावत असतो.
आणि इतकच नाही तर आपण एखाद्याविषयी खूप आंधळा विश्वास बाळगून असतो.आपण समोरच्याकडून अनेकदा चांगल्याची अपेक्षा ठेवतो.प्रेमाची अपेक्षा ठेवतो.पण एक लक्षात ठेवा,ज्याला जसं वागायचं असतं तसचं तो वागतो.इतरांच्या सांगण्यावरून सहसा कुणीही लवकर बदलत नाही.
शेवटी, ज्याच्या हृदयात जे आहे तो तेच देईल मग ते प्रेम असेल किंवा मनस्ताप.आपण मात्र दिलेलं प्रेम मनापासून स्विकारायचं.आणि कुणी मनःस्ताप दिला तर त्याचा जास्त विचार न करता पुढे जायचं.
आणि आपणही ठरवायचं काय द्यायचं,प्रेम की मनःस्ताप ?
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


शंभर % आहे खरं पण किती काही झाल तरी आपण चूकतोच कारण आपल्या मनाला कोण समजवणार