ज्या गोष्टीसाठी तुम्ही तयार असता ती गोष्ट सुद्धा तुमच्यासाठी तयार असते, हे तुम्हाला माहिती आहे का?
हर्षदा पिंपळे
अनय अभ्यासात हुशार होता.अनयला वेगवेगळ्या क्रीडाप्रकारामध्येही खूप रस होता.बुद्धीबळ, क्रिकेट, बेसबॉल ,हॉकी अशा वेगवेगळ्या खेळाची त्याला प्रचंड आवड होती. त्याचं जनरल नॉलेजही अगदी उत्तम होतं.पण त्याचा स्वभाव मात्र थोडा बुजरा होता.तो सहसा कुणाशीही बोलायचा नाही.इतरांमध्ये मिक्सप व्हायला त्याला जरा वेळच लागायचा.सगळ्यांना अनयची मैत्री हवीहवीशी वाटायची पण अनय त्याच्या बुजऱ्या स्वभावामुळे स्वतःहून त्यांच्यापासून लांब पळायचा.तो अभ्यासात हुशार असला तरीही तो अभ्यास काही करायचा नाही.आईबाबा सारखे त्याच्या मागे लागायचे. अनय अशाने वैतागून जायचा.
आणि खेळाच म्हणाल तर तो त्याची खेळाची आवड जपायचा.पण तो त्याची आवड ही एकट्यातच जपायचा. त्याला गर्दी आवडायची नाही म्हणून सगळं काही एकटं असतानाच करायचा.त्यामुळे अनेकदा त्याच्या अशा स्वभावामुळे कित्येक गोष्टी हातातून निसटून गेल्या. अनय हुशार असून अभ्यास करण्यासाठी कधी तयारच व्हायचा नाही. जबरदस्ती त्याच्या घरचे त्याला अभ्यास करायला लावायचे.तो रडतकुढत कसातरी अभ्यास करायचा.पण अशा जबरदस्तीच्या अभ्यासाला काय अर्थ….??
शेवटी कंटाळून अनयच्या आई-बाबांनी अनयला त्याच्या मागे न लागता त्याला त्याची स्पेस द्यायचा प्रयत्न केला.आणि खरं तर याच स्पेसमुळे अनयमध्ये हळुहळू बदल जाणवायला लागला. अनय स्वतःहून काही गोष्टी करायला लागला. काही गोष्टींसाठी तो स्वतःहून तयार व्हायला लागला.तो आधीपेक्षा आता अभ्यासावर थोडा फोकस करू लागला. थोडा थोडा मिक्सप होऊ लागला.त्या त्या वातावरणात तो रूळायला लागला होता. त्या वातावरणालाही आता अनयची सवय झाली होती. अनय नसताना ते वातावरणही अगदी सुनं सुनं वाटायच.
अनयलाही कळून चुकलं होतं की जोपर्यंत आपण तयार होत नाही तोपर्यंत गोष्टीही आपल्यासाठी तयार होत नाही.
ही झाली साधी सरळ अनयची गोष्ट.
पण आपणही अनेकदा या अनयसारखेच वागतो.कधी हट्टीपणा करतो.काही गोष्टी करायला स्वतःहून तयारच होत नाही.अशा अनेक गोष्टी आहेत त्या म्हणजे आपल्या इच्छा-आकांक्षा, स्वप्न, यश.या गोष्टींपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला खूप ठेचा खाव्या लागतात. पण कधी कधी या ठेचा कित्येकांना सहनच होत नाही. कित्येकजण त्यासाठी तयारच होत नाही. आणि त्यामुळेच अशा लोकांसाठी यशासारख्या गोष्टी तर कधीच तयार होत नाही.
आयुष्य म्हणजे केवळ एक शब्द नाही. आयुष्य म्हणजे आपल्या जन्मापासून ते मृत्युपर्यंतचा एक अनोखा प्रवास होय.या प्रवासात आपण खूप काही शिकत असतो.खूप काही कमवत असतो,गमवत असतो.या प्रवासात आपलं कोणतं ना कोणतं ध्येय जरूर असतं.किंवा एखादी गोष्ट असते ती आपल्याला साध्य करायची असते.कधी कधी आपल्याला एखादी गोष्ट मनापासून करावीशी वाटते तर कधी कधी एखादी गोष्ट आपल्याला अजिबात करावीशी वाटत नाही.कधी कधी आपल्याला वाटतं की आपण या या गोष्टीसाठी पात्र नाही. तर कधी कधी वाटतं की आपण ही गोष्ट डेफिनेटली करू शकतो.
पण ज्या गोष्टीसाठी तुम्ही तयार असता ती गोष्ट सुद्धा तुमच्यासाठी तयार असते, हे तुम्हाला माहिती आहे का?
तर हो…अशा गोष्टी असतात ज्या आपल्यासाठी स्वतःहून तयार असतात.पण हे तेव्हाच कळतं जेव्हा आपणही त्या गोष्टीसाठी तयार असतो.जोपर्यंत आपण एखाद्या गोष्टीसाठी तयार होत नाही तोपर्यंत ती गोष्टसुद्धा आपल्यासाठी तयार नसते.माणूस हा कायमच तक्रारींच लेबल लावून फिरत असतो.त्यामुळे निगेटीव्हीटी सातत्याने त्याच्याभोवती ठाण मांडून बसलेली असते.
मला हेच जमत नाही तेच जमत नाही असं माणूस सतत बोलत असतो.त्याच्या अशा वागण्यामुळे सतत नकारघंटा त्याच्या मागे चालूच असते.त्यामुळे त्या गोष्टी त्या त्या व्यक्तीकडून साध्यही होत नाही.पण ज्यावेळेस तो मनुष्य स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येतो.त्याला खरच काहीतरी करावसं वाटतं तेव्हा गोष्टी स्वतःहून त्या व्यक्तीकडे आकर्षित होतात. हे म्हणजे अगदी एखाद्या प्रॉब्लेम्स सारख आहे.
आपण जेव्हा समस्येकडे जास्त लक्ष देतो तेव्हा समस्या वाढत जातात. एका मागून एक समस्या आपल्या समोर उभ्या राहतात. पण जेव्हा आपण सोल्युशनवर फोकस करतो तेव्हा मात्र अनेक सोल्युशन आपल्या समोर असतात. आणि त्याच सोल्युशन्समुळे प्रॉब्लेम्स कमी होत जातात. तसच या गोष्टींच असतं.जोपर्यंत आपण ठाम रहात नाही तोपर्यंत स्वतःहून कोणतीच गोष्ट आपल्याला खेचत नाही.
जोपर्यंत एखादी कला शिकण्यासाठी आपण तयार होत नाही तोपर्यंत कोणतीही कला आपल्यासाठी तयार नसते.आपण चित्र काढायला तयार नसताना आपल्यासमोर कागद आणि रंग असतील तर त्याचा काय उपयोग…??? पण ज्यावेळेस आपण चित्र काढायला तयार असतो त्यावेळेस ते चित्र केव्हा आपल्यासाठी तयार होतं आपल्यालाही कळत नाही.
मित्रांनो,यशाला गवसणी घालायची असेल तर आधी पंखामध्ये बळ निर्माण करावं लागतं. पण मग पंखामध्ये बळ निर्माण करण्यासाठी आपण तयार असायला हवं नं…? तरच यश आपल्यासाठी तयार होईल नं…?
त्यामुळेच सर्वात आधी कोणत्याही गोष्टीसाठी स्वतः तयार व्हायला हवं. स्वतःच्या मनाची तितकी तयारी असायला हवी. कारण गोष्टी तेव्हाच आपल्या असतात जेव्हा आपण त्यांच्यासाठी तयार असतो.तेव्हा आपल्या नसतात जेव्हा आपण तयार नसतो.
So,Be Ready For Everything…! गोष्टी तुमच्याच असतील. तुमच्यासाठीच असतील.
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
