Skip to content

जितके आपण स्वतःला सुखी समजू तितके आपण सुखी होत जाऊ.

जितके आपण स्वतःला सुखी समजू तितके आपण सुखी होत जाऊ.


हर्षदा पिंपळे


राधा आणि नुपूर गप्पा मारत बसल्या होत्या. सहज गप्पा मारता मारता राधाने “जितके आपण स्वतःला सुखी समजू तितके आपण सुखी होत जाऊ.” असं काहीतरी ऐकवलं.यावर नुपूर जोरजोरात हसायला लागली. त्यावर राधा म्हणाली “हसायला काय झालं..? मी तर खरं तेच बोलतेय.” हे ऐकून पुन्हा नुपूर हसायला लागली.आणि म्हणाली “अगं असं असतं तर आज सगळे इथे नसते बसले.मी श्रीमंत आहे.माझ्याकडे खूप काही आहे असं म्हणतच सगळे उंचावर गेले असते.बघतेयस नं काय अवस्था आहे कित्येकांची…? जो तो रडतोय, पैशावाचून, अन्नावाचून;तडफडतोय स्वप्नांसाठी! आणि तु हे असं काहीतरी हास्यास्पद बोलतेय. वाह्…! ”

यावर राधा काही गप्प बसली नाही. तिने पुन्हा बोलायला सुरुवात केली.”अगं नुपूर यात हसण्यासारख खरं तर काहीच नाही. तुझं म्हणणं अगदीच चुकीच आहे असं नाही म्हणत मी पण पूर्णतः बरोबर आहे असही मी म्हणत नाही.कारण मला असं वाटतं की आपण आजपर्यंत कायमच निगेटिव्ह विचार करत आलो.आपल्या आजुबाजुला असणारी लोकही कितीतरी नकारात्मक विचारांची आहे. दृष्टिकोन बदलायला किंवा नव्या आणि सकारात्मक दृष्टिकोनातून ती पहायला तयारच होत नाहीत.कायम रडगाणं गाण्यातच त्यांचा वेळ जातो.रडगाणी गायली तर त्रास अधिकाधिक वाढतच जाणार आहे. त्याउलट काहीतरी चांगल बोलण्यात ही लोकं वेळ का घालवत नाहीत…?

माझं कधी काही चांगलं होऊच शकत नाही.माझ्याकडे पैसे नाहीत.दुःखाचा नुसता बाजार मांडलाय वगैरे असलं काहीतरी बोलण्यातच ही लोकं वेळ घालवतात. दुःख वगैरे असतं हे सगळं मान्य आहे गं,पण यामुळे नकारात्मक विचारांची संख्या दिवसागणिक वाढतच जाते.अतिचिंता, नैराश्य यामध्येही वाढ होत जाते.परिणामी शारीरिक – मानसिक आरोग्यावरही याचे परिणाम होत राहतात.मग काय आरोग्य बिघडलं की पुन्हा पैशाच्या अडचणी येतातच.थोडक्यात असा विचार केल्याने प्रश्न काही सुटतात का…? तर नाही.परिस्थिती आहे तीच राहते.दुःख दुःख केलं की ते अवतीभवती फिरतच राहतं.

“Law of Attraction” तर तुला माहितच आहे.आणि इंग्रजीमध्ये एक सुविचारही आहे.

“When you focus on problems you’ll have more problems. When you focus on possibilities you’ll have more opportunities.”

बघ,सुख-दुःखाचही अगदी असच आहे.आपला फोकस कशावर आहे ,आपला दृष्टिकोन काय…आपण काय विचार करतो यावर अनेकदा सगळं डिपेन्ड करतं.आपण जोपर्यंत आपल्याला दुःखीकष्टी समजत राहू तोपर्यंत आपण तसेच राहणार आहोत. आपल्या आयुष्यात अशावेळी सुख आलेलही आपल्याला कळणार नाही. बघ पटतय का…?”

इतकं सगळं बोलून राधाने मोकळा श्वास घेतला. बोलून बोलून राधाच्या घशाला कोरड पडली होती. नुपूरणे तिला पाणी दिलं.आणि राधापुढे धन्य झाली.आणि राधाला म्हणाली.”राधा अगं माझ्या डोक्यात कधी असा विचारच आला नाही गं.मी उगाचच तुला हसत होते. मला तुझं बोलणं अगदी पटतय गं.आपणच आपलं दुःख वाढवत असतो.आपण सकारात्मक दृष्टिकोनातून कधी बघतच नाही गं…खरच मनापासून थँक्य यु ! मला याची जाणीव करून दिल्याबद्दल.”

हा राधा आणि नुपूरमधील संवाद बरच काही शिकवून जातो.विचार करा,आपण स्वतःला दुःखी समजल्याने दुःखीच होत राहणार मग आपण स्वतःला सुखी का नाही समजायच…?आपण जसा विचार करतो गोष्टी तशा घडतात. त्यामुळे आपण स्वतःला सुखी समजण्याचा प्रयत्न केला तर आपण १००% सुखी होऊ असं मी म्हणत नाही.

पण अशा विचाराने किमान नकारात्मक विचारांना चालना तरी मिळणार नाही.नवीन सकारात्मक विचार करण्यासाठी नवा उत्साह मिळेल.सुखाच्या दिशेने आपला किमान छोटासा प्रवास सुरू होईल.त्यामुळे स्वतःला सातत्याने दुःखी समजण्यापेक्षा सुखी समजण्याकडे कल ठेवा. दृष्टिकोन बदला,सगळं कसं सुरळीत होईल.रडून, निराश होऊन खरं तर काही होत नसतं.कधीतरी आशेचा किरण आयुष्यात येऊ शकतो यावर विश्वास ठेवणं आवश्यक आहे. कारण हाच विश्वास नसेल तर आपण सुखी-समाधानी होणं अशक्य आहे. त्यामुळे आयुष्य सुंदर आहे.आयुष्याचा प्रत्येक क्षण आपण आनंदाने जगायला शिकलं पाहिजे.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!