जोपर्यंत तुम्ही सहन करत असता, तोपर्यंत तुम्ही चांगले असता…
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
“रघु अरे जरा बाजारात जाऊन लगेच सामान आण, पाहुणे यायचे आहेत घरी. काही कमी पडायला नको.” रमा रघुला म्हणाली. “मामी शाळेत जायला वेळ होतोय, गिरीशला सांगाल का?” रघु शाळेत निघाला होता, आधीच त्याला निघायला वेळ झालेला त्यात रमाने त्याला काम सांगितल होत. रघु, रघुनंदन हा रमाचा म्हणजेच तिच्या नवऱ्याच्या नारायणच्या बहिणीचा मुलगा. त्याचा भाचा. नारायणची बहीण सुशीला. लहान वयातच तिचं लग्न झालं. आणि लगेच रघु झाला.
दुर्दैवाने त्याला वडिलांचा सहवास फारसा लाभला नाही. ते राहायचे पण एका गावात. नवरा गेल्यानंतर तर सुशिलाला सर्वच कठीण जाऊ लागलं. रघु एकटाच तिचा आधार होता. पण तोही अजून लहान होता. त्याच शिक्षण व्हायचं होत. गावात ते नीट होणार नाही हे सुशीलाला समजलं. नारायण शहरात रहात होता. घरी पण परिस्थिती चांगली होती. माणसं होती. रघुला त्याची भावंडं होती. मामाकडे त्यांच्यासोबत राहून चांगला शिकेल अस वाटून तिने त्याला इथे ठेवले. नारायणकडे आला तेव्हा रघु तसा लहानच होता. जेमतेम सात, आठ वर्षाचा.
नारायणची मुल गिरीश, नम्रता पण त्याच्या बरोबरीची होती. सुट्टीत यायचा तेव्हा त्याला इथे करमायच. त्यामुळे आई जेव्हा त्याला इथे ठेवून गेली तेव्हा त्याने फार कुरकुर केली नाही. तिथे गावात त्याच्यासोबत कोण नव्हत. इथे मामा मामी आहेत, भावंडं आहेत म्हणून तो राहिला.
मामा मामी पण त्याचे लाड करायचे. पण कधी? तो सुट्टीत आल्यावर आणि ती अशी किती दिवस असणार? आता तस नव्हत. जेव्हा सुशिलाने त्याला ठेवण्याची विनंती केली जेव्हा तो नाकारू शकला नाही. पण त्याला काही तो इथे राहिलेला पसंद पडल नव्हत. सुशिलाने त्याचा शाळेचा खर्च वगैरे देण्याचं कबूल केल होत. पण तिला नाहीच शक्य झालं तर सर्व त्याच्यावर पडणार होत. बहिणीला तो काय बोलणार? म्हणून त्याने रघुला आपल्याकडे ठेवून घेतला. सुरुवाती सुरुवातीला ती दोघ त्याच्याशी नीट वागत, बोलत. पण नव्याचे नऊ दिवस सरले तस त्यांचं वागणं बदललं.
गिरीश आणि नम्रता यांच्याशी जसं त्यांचं वागणं होत तस ते रघुशी वागत नसत. छोट्या छोट्या कारणावरून त्याला रागावणे. झेपत नसलेली काम त्याच्यावर टाकणे. तो देखील स्वभावाने गरीब होता. आईने ठेवतानाच सांगितल होत की मामा मामी सांगतील ते ऐकायचं. त्यांच्या शब्दाबाहेर जायचं नाही. त्यामुळे तो कधी काहीच बोलायचा नाही. सर्व निमूटपणे ऐकायचा. पण नंतर नंतर मामी त्याचा अपमान करू लागली, त्याला घरात आलेल्या लोकांसमोर घालून पाडून बोलू लागली. तो समोर काही बोलत नसे. पण आत खोलीत जाऊन खूप रडे. गावाला कधी आईकडे गेला की सांगे ती दोघं त्याच्याशी कसं वागतात.
पण ती त्याला समजावून सांगत असे. तु मोठा हो चांगल शिक. मग आपण दोघच राहू. आपल्याला कोणी काहीही बोलणार नाही. कमी वयातच त्याला समज आली होती. आईचे कष्ट त्याला दिसत होते. म्हणून तो परत येऊन राहत असे. कमालीची गोष्ट अशी की नारायण आणि रमा त्याची सुशिलाकडे काही तक्रार करत नसत. तुझा मुलगा गुणी आहे. नीट राहतो अस सांगत. का करतील तक्रार? त्यांचं सर्व वागणं, बोलण तो सहन करत असे. उलटून एक शब्द बोलत नसे. आणि जोपर्यंत माणूस आपल्या मनासारखं वागतो, आपलं सर्व सहन करतो तोपर्यंत तो चांगलाच असतो. आज देखील तो शाळेत जायला निघाला असताना रमाने त्याला कामाला लावले होते.
गिरीशला आज सुट्टी होती. तो रिकामाच बसला होता. पण त्याला तिने सांगितले नाही. ती अनेकदा असच करी. रघुची परीक्षा असुदे किंवा शाळेत एखादा महत्त्वाचा दिवस, त्याच दिवशी त्याला दुसऱ्याच कश्यात तरी गुंतवायचे. कित्येकदा यामुळे रघुने शाळेत शिक्षकांचा ओरडा खाल्ला होता, मार खाल्ला होता. घरी तो मामा मामीला याबद्दल बोलला होता. पण त्यांच्या लेखी त्याला किंमत नव्हती. जर आपण त्याला आसरा दिला आहे तर त्याने आपण म्हणू तसच वागल पाहिजे असा त्यांचा दंडक होता. तेच गिरीश किंवा नम्रताची परीक्षा असली तर ती दोघं त्यांना कसलच काम देत नसत. तेही रघुवरच पडे. खूप काळ हे सर्व रघु सहन करत होता.
पण आज पहिल्यांदा तो काहीतरी बोलला ज्यामुळे रमाचा पारा चढला. गोष्ट पण तशीच घडली होती. रघु घरात झाडलोट करत होता आणि आतल्या खोलीत मामा मामी होते. त्या दोघांचं काहीतरी बोलण चाललं होत. ते त्याच्या कानावर पडल. “अजून किती वर्ष आपण याला सांभाळायचं आहे?” रघुला समजल की त्याच्याविषयी बोलण चालू आहे. तो तिथेच थांबला. रमा रागात बोलत होती. “तुमची बहीण दिसते तितकी गरीब नाही, भोळी नाही. मुलाला इथे आपल्याकडे टाकलं आणि स्वतः तिथे मजेत राहत आहे. आपल्याला सांगायचं की काम करते, कष्ट करते. पाहायला कोण गेलं काय करत असते ते!
अजून किती वर्ष ही ब्याद आपल्याकडे राहणार कोण जाणे?” “अग मला सुद्धा याला इथे ठेवणं पसंद नाही. पण तिला कस सांगणार?” नारायण म्हणाला. त्यावर रमा फणकाऱ्याने म्हणाली, ते तुमचं तुम्ही पाहा! तुम्हाला जमत नसेल तर मी सांगेन! आपण किती काम करायचं आणि तुमची बहीण तिथे मजा मारणार! अजिबात चालणार नाही अस! रघुच्या डोळ्यातून पाणी येत होत.
आतापर्यंत त्याने सर्व प्रकारचा अपमान, त्यांचं वागणं सहन केलं होत. तो कधीच काही बोलला नव्हता. पण आज त्याच्या आईचा असा अपमान केलेला त्याला सहन झाला नाही. त्याला माहित होत त्याची आई किती कष्ट करून तिथे राहत होती. मामीच तिला अस बोलण त्याच्या जिव्हारी लागलं. तो तसच आत जाऊन त्या दोघांना डोळे पुसत म्हणाला, “मामा मामी मला माहित्ये तुम्हाला माझ्यामुळे खूप त्रास पडतो, पण तुम्ही मला वाटेल तस बोला, काहीही काम सांगा मी करेन. तुम्हाला मी इथे राहायला नको असेन तर तस सांगा. मी आता जाईन.
पण माझ्या आईला काही बोलू नका. मला ते आवडणार नाही.” आता देखील तो त्यांच्याशी नीटच बोलत होता. त्याच्या बोलण्यात कुठेही अरेरावी नव्हती. त्याच म्हणणं फक्त इतकच होत की त्याच्या आईचा कोणी अपमान करू नये. पण इतकी जाणीव त्या दोघांना नव्हती. इतक्या वर्षात एक चकार शब्द न बोललेेला मुलगा आता आपल्याला अस सांगतो हे त्यांना सहनच झालं नाही. तो त्यांना तसही नकोच होता त्यात हे एक कारण मिळालं होत. नारायणने लगेच आपल्या बहिणीला बोलवून घेतलं आणि तिला सांगितलं की तो कसा त्यांच्याशी उलट बोलला. हे इतकं कमी होत म्हणून त्याने नसलेल्या गोष्टी पण तयार करून सांगितल्या. सुशीला स्वतःच्या मुलाला इतकं तरी ओळखतच होती.
तो अस बोलला असेल तर काहीतरी कारण असणार हे तिला माहीत होत. पण ती काहीच बोलली नाही आणि रघुने पण निर्णय घेतला की यापुढे तिथे राहायचं नाही. त्याने तिला समजावलं की तो आता काहीतरी काम करत शिकेल. तिने देखील त्याचा निर्णय मान्य केला व ती दोघही तिथून निघून गेली. इतकी वर्ष सर्व सहन केलेला रघु आईचा अपमान मात्र सहन करू शकला नाही. आणि इतकी वर्ष त्यांच सर्व सहन करत असताना चांगला असलेला रघु आईच्या बाजूने बोलला म्हणून या
दोघांच्या लेखी वाईट ठरला.
सहन तर आपण काहीही करू शकतो. जोपर्यंत ते आपल्या जीवाशी बेतत नाही. पण काही सहन करायचं आणि काय नाही हे समजायला पण शहाणपण लागत. कारण अन्याय करणारा जितका दोषी असतो तितकाच तो सहन करणारा पण दोषी असतो. इथे प्रश्न मान सन्मानाचा नाही. पण जिथे आपली प्रगती खुंटते, जिथे आपल्या जवळच्या व्यक्तीवर सतत टीका केली जाते, जिथे आपलं सहन करणच आपलं नुकसान करण अश्या ठिकाणी सहन केलं पाहिजे का त्याविरुद्ध काही कृती केली पाहिजे हे आपल्या हातात आहे.
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
