Skip to content

“जो फरक औषधांमुळे पडत नाही तोच फरक काही जवळच्या माणसांमुळे पडतो.”

“जो फरक औषधांमुळे पडत नाही तोच फरक काही जवळच्या माणसांमुळे पडतो.”


मधुश्री देशपांडे गानु


“दुवा से बढकर कोई दवा नहीं” असं कोणीतरी म्हटलं आहेच. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात आजारी तर पडतेच. कधी लहानपणी, कधी तरुणपणी, कधी म्हातारपणी. परिस्थितीनुसार सुखदुःखाच्या क्षणांना सामोरे जात, जीवन आहे तसेच स्वीकारून पुढे जात कधी माणूस शारीरिक दृष्ट्या थकतो. आजारी पडतो. किंवा कधी मानसिकही थकून जातो. त्याचं मन आजारी होतं.

आज विज्ञान इतकं प्रगत झालं आहे की जवळजवळ प्रत्येक आजारावर, दुर्धर रोगावर औषधं उपलब्ध आहेत. सरासरी आयुष्यमान वाढलं आहे. बालमृत्यू चे प्रमाणही घटले आहे. तुमची इच्छाशक्ती, कृती, सकारात्मक विचार प्रणाली प्रबळ असेल तर तुम्हीं आज कोणत्याही शारीरिक, मानसिक रोगातून संपूर्णपणे बरे होऊ शकता. पण याच औषधोपचारांबरोबर अत्यंत महत्त्वाची गरज आहे ती, आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला त्याच्या जवळच्या माणसांनी समजून घेण्याची. त्याला मायेचा, आधाराचा हात देण्याची.

एक सोपे उदाहरण देते. माझा मुलगा लहान असताना फार आजारी पडत नसे. पण जर आजारी पडला तर त्याला खूप ताप यायचा. आणि अगदी मलूल होऊन जायचा. औषधोपचार वेळेवर सुरू असायचेच. पण माझे सासरे त्याच्या डोक्यावरून, चेहऱ्यावरून, अंगावरून हात फिरवत त्याच्याजवळ बसायचे. ते स्वतः श्री दत्तगुरूंचे निस्सीम भक्त होते.

श्री दत्तगुरूंचे नामस्मरण करत, ते त्याला सांगायचे की, हे बघ पळून सुद्धा गेला ताप. दत्त महाराज सगळे छान करतील. आणि त्यांच्या त्या प्रेमळ मायेच्या स्पर्शाने खरंच माझ्या मुलाला लवकर बरं वाटायचं. श्रद्धेचा प्रश्न बाजूला ठेवू. तरीही आजोबांचा प्रेमळ स्पर्श त्याला त्या क्षणी औषधांपेक्षाही आश्वासक वाटायचा हे मात्र खरे.. आणि जो फरक औषधांनी पडत नाही तोच आजोबांच्या स्पर्शाने पडायचा. आणि तो लवकर बरा व्हायचा.

प्रगत विज्ञान, औषधांमध्ये संशोधन, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अचूक निदान हे तर आज अत्यंत आवश्यक आहे आणि होतही आहे. वैद्यकीय व्यवसायाचा पूर्ण आदरही आहे. आपण डॉक्टरांना देव मानतो. ते त्यांचं काम चोख बजावतातच.

पण त्याचबरोबर पेशंटला त्यांच्या कुटुंबीया कडून मानसिक आधाराची, मायेची महत्त्वाची नितांत गरज असते. अनेक असाध्य आणि जर्जर रोगांनी पछाडलेले रुग्ण अतीव औषधोपचार आणि जगण्याची नसलेली शाश्वती यांनी चिडचिडे होतात. प्रचंड नैराश्यग्रस्त होतात. अशावेळी कुटुंबाने धीर सोडून मात्र चालत नाही. त्यांनाही आपलं माणूस यातनांतून जातंय याचं अतीव दुःख होत असतं. पण पेशंटला हसतमुखाने सामोरं जाणं, त्याला धीर देणे, त्याला सकारात्मक विचार करायला भाग पाडणे ही कुटुंबाची खरी परीक्षा असते. तरीही खचून न जाता सकारात्मक विचारांनी आणि कृतीने आजारी व्यक्तीला धीर द्यायला हवा. “मुन्नाभाई एम् बी बी एस्” मध्ये दाखवल्याप्रमाणे “जादू की झप्पी” द्यायलाच हवी. कारण शब्द जे सांगत नाहीत, जे पोहचवत नाहीत… तेच स्पर्श सांगून जातो. आश्वासक असा स्पर्श आजारी व्यक्तीला औषधांपेक्षाही मोलाचा वाटतो.

नुसतं एवढेच नाही तर आजारी व्यक्तीची आवड ही जोपासली गेली पाहिजे. त्याच्या आजूबाजूचे वातावरण प्रसन्न, उत्साही असायला हवं. प्रेमाचे दोन शब्द तर प्रत्येकालाच खूप बळ देऊन जातात. जर आजारी व्यक्तीच्या भोवतालचा परिसर प्रसन्न असेल, त्याच्या जवळच्या व्यक्ती प्रेमळ आधार देणाऱ्या असतील तर त्याचीही मनस्थिती बदलते. ती सकारात्मक होते. अशी व्यक्ती औषधोपचारांना पण उत्तम प्रतिसाद देते. आणि लवकर बरी होते. शरीराबरोबरच मनही सांभाळणं तेवढंच महत्त्वाचं आहे ना!!

हेच मानसिक आजारांसाठीही लागू होतं. शारीरिक आजार आपण जितक्या सहजतेने स्वीकारतो त्याच सहजतेने आपण मानसिक आजार आजही स्वीकारत नाही. उलट मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना तर जास्त प्रेमाची, आपुलकीची, स्वीकारण्याची गरज असते. त्यांची ही गरज जर कुटुंबातच पूर्ण झाली तर ते यातून लवकर बाहेर पडतात.

प्रत्येक व्यक्तीला आजार कोणताही असो शारीरिक, मानसिक, क्षुल्लक, दुर्धर ,आपल्या जवळच्या माणसांची ठाम साथ, त्यांचं प्रेम, त्यांचा सहवास, त्यांची माया, त्यांचे कष्ट त्या व्यक्तीचा आजार लवकर बरं करतात हे नक्कीच! त्यामुळे न खचता तुमच्या प्रेमाच्या माणसांबरोबर राहा. माणसाला माणसाची साथ असणं आज खूप मोलाचं आहे. मग औषधांनी जो फरक पडत नाही तोच आपल्या प्रेमाच्या माणसांनी पडतो. आणि पुन्हा नव्याने जीवनाची दमदार वाटचाल करण्यासाठी आपण सज्ज होतो.. हो ना!!


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!