जीवन सोपे होणार नाही, परंतु आपण मात्र आणखीन मजबूत होऊ शकतो.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
एका गावात एक गरीब गवंडी राहत होता. गावतल्या लोकांची घर बांधून देणे, एखाद्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली कामाला जाणे अस करून तो पोट भरत होता. त्याच्या हाताला कला होती. अगदी ज्यांच्याकडे काही सामान नाही. जे झोपडीवजा घर तरी असुदे अशी प्रार्थना करत त्यांची घर देखील तो अगदी सुंदररित्या बांधून देत असे.
म्हणूनच गावाबेहरचे लोकही त्याला मदतीला बोलवत. त्याचा स्वभावपण मेहनती होता. दिलेले काम जास्तीत जास्त नीट कसं करता येईल याकडे तो लक्ष देई. अगदी तहान भूक विसरून तो त्या जागेत राबे. पण नशीब तरी एखाद्याची कशी विडंबना करत पहा! लोकांची घर व्हावीत म्हणून जो माणूस राबत होता त्याच स्वतःच साधं एक घरसुद्धा असू नये? पण हीच परिस्थिती होती. जुन्या मातीने बनवलेल्या व वरती नारळाची झावळ घातलेल्या एका छोट्याश्या खोलीत तो राहत असे. जे कधीही पडू शकत होत. त्यातच त्याच स्वयंपाकघर, त्यातच मोरी.
गवंडी स्वभावाने गुणी होता. लोक त्याला आधीपासून ओळखत होती. इतरांच्या मदतीला तो लगेच धावून येत असे. कित्येक लोकांची घर त्याने अशीच बांधून दिली होती, कोणताही मोबदला न घेता. या विचाराने की आपलं तरी घर नाही निदान दुसऱ्याच तरी व्हावं. लोक त्याच्यासाठी हळहळत. त्याच स्वतः च देखील चांगल घर होऊदे अशी आशा करत. अनेकजण त्याला भेटल्यावर विचारत देखील, काय रे, इतक्या लोकांसाठी घर बांधतोस.
कधी स्वतःसाठी पण चांगल घर बांधव अस वाटत नाही का? तेव्हा तो हसुन म्हणत असे. “अहो मला एकट्याला कश्याला हवं घर? मी असतो कुठे एका जागी? लोकांना त्यांची घर मिळतात त्यातच मला आनंद.” पण हे सांगण्यापुरत होत. त्याला त्याच्या दुःखाचं प्रदर्शन करायला आवडत नसे म्हणून हे बोलण केलेलं असायचं. खरी गोष्ट ही होती की त्याला पण वाटत होत की आपलं घर व्हावं. कमी वयापासून तो हे काम करत होता.
आपलं अस स्वतःच काही नाही म्हणून त्याने लग्न देखील केले नाही. सुरुवातीला त्याला वाटायचं की आपल्याला एकट्याला कितीशी जागा लागते. पण इतकी वर्ष लोकांची सुंदर घर उभारताना पाहून त्याच्या मनात पण एक आशा निर्माण झाली की आपलं देखील छोटंसं का असेना छान अस घर असावं. त्याला अजून एक कारण होत ते म्हणाजे आताच घर कधीही पडू शकत होत. तशीच त्याची अवस्था झाली होती. म्हणून आता त्याने ठरवलं की आपण आपल्यासाठी पण काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत.
अगदी पै पै करून त्याने काही रक्कम साठवली होती. म्हणून यावर्षी आपण आपलं नवं घर उभारायचं असा त्याने विचार केला. इतकी वर्ष यात काम केल्याने चांगल सामान, दगड विटा यातली त्याला माहिती होती. तशी लोक त्याला माहिती होती. पावसाळा सुरू व्हायच्या आत हे काम त्याला करून घ्यायचं होत. त्यानुसार तो तयारीला लागला. सर्व सामान आणण्यापासून ते जून घर पाडून परत सर्व आखण्यापासून सर्व त्याने सुरू केलं. आणि तो त्यात एकटा खपत होता.
शेवटी दिवसरात्र मेहनत करून त्याने दोन खोल्यांचं छोटंसं घर बांधलं. सामान अगदी उच्च दर्जाचं नसल तरी अगदी हलक्यातल पण नव्हता. सर्व ऋतु त्यातल्या त्यात झेलू शकेल अश्या पद्धतीने त्याने घर बांधलं. वरती कौल घातली. समोर थोडी जागा उरत होती तिथे वेगवेगळी झाड लावून बाग तयार केली. इतक्या वर्षांची केलेली मेहनत त्याच्या समोर उभी होती. स्वतःच ते घर पाहून त्याचे डोळे भरून आले. घर झाल असल तरी त्यात पक्केपणा यायचा होता. छोट मोठ काम राहील होत. तेही तो करतच होता. पण दैव एकेकाची कशी परीक्षा घेईल हे सांगता येत नाही. तसच काहीस झालं.
अचानक एकेरात्री अवकाळी पाऊस पडला. कोणाला काही कल्पना नसताना अस झालं. बर तो एक दिवस येऊन थांबला नाही तर सलग सात आठ दिवस पडत राहीला. इतक्या मेहनतीने बांधलेलं ते घर, बाग सर्व पावसाने झोडपून निघालं. बरीच पडझड झाली. बाग तर जवळपास नाहीशीच झाली. जेव्हा त्याने हे सर्व पाहिलं तेव्हा तो कोसळलाच. कारण ही पडझड फक्त त्याच्या घराची नव्हती. तर त्याच्या स्वप्नांची होती. जी त्याने त्या नवीन घरासाठी रंगवली होती.
घर पक्क झाल्यावर तो तिथे राहायला जाणार होता. तोपर्यंत तो बाजूच्या शेतात राहत होता. पण स्वतःच्या हाताने घडवलेल्या त्या घरात त्याला एक रात्र देखील काढता आली नाही. कितीतरी दिवस त्याच्या मनातून हे दुःख जात नव्हत. बर आपल्याकडे कोणीतरी असल तर आपण दुःख हलक करणार. जो एकटाच आहे त्याने कोणाचा आधार घ्यायचा? लोक यायची सांत्वन करून निघून जायची. पण हे किती दिवस पुरणार होत. शेवटी त्याला स्वतः लाच स्वतःच आधार व्हायला लागणार होत. आणि तो झाला. जास्त दिवस दुःखात कुढत न राहता त्याने परत आपल्या कामाला सुरुवात केली.
पडझड झालेल्या घरात देखील जे काही सामान वाचलं होत ते त्याने बाजूला काढलं. तात्पुरती एक झोपडी बांधून त्यात तो राहू लागला. परत पूर्वीसारखं मेहनत करू लागला किंबहुना पहिल्याहून जास्तच करू लागला. कारण आता तो जिद्दीला पेटला होता की आपलं घर बांधायचं. आणि ते त्याने खर केल. ही घटना घडल्यानंतर काही वर्षातच पुन्हा एकदा चांगल घर उभराल आणि यावेळी त्याने सर्व विचार करून, अंदाज घेऊन अनेक जणांच्या मदतीने भक्कम घर उभारल आणि त्याच जागेत उभारल.
त्याच पुस्तकी शिक्षण झालं नव्हत पण इतक्या वर्षांच्या अनुभवाने तो एक गोष्ट मात्र शिकला होता ती म्हणजे जीवन सोपे होणार नाही, परंतु आपण मात्र आणखीन मजबूत होऊ शकतो.
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
