Skip to content

जीवन गतिमान होईल जेव्हा अपेक्षा कमी आणि कृतीतून तुम्ही व्यक्त करायचं ठरवाल.

जीवन गतिमान होईल जेव्हा अपेक्षा कमी आणि कृतीतून तुम्ही व्यक्त करायचं ठरवाल.


हर्षदा पिंपळे


सध्याचं जीवन अगदीच गतिमान आहे.पण कधी कधी याच गतिमान जीवनात आपण मात्र कुठेतरी मागे आहोत असं वाटत राहतं.इतरांच जीवन खूप गतिमान आहे आणि आपलं मात्र अजून कशातच काही नाही असं वारंवार आपल्याला वाटत राहतं.पण मग आपण अशावेळेस केवळ विचार करण्यातच वेळ घालवतो.

आपल्या अपेक्षांच आपण नियोजनच केलेलं नसतं.एकामागोमाग एक अपेक्षा आपल्या वाढतच राहतात. विचारांच चक्रही एकीकडे चालूच राहतं.या सगळ्यामध्ये वेळ असाच निघून जातो.आपण शारीरिक आणि मानसिक दृष्टीने थकून जातो.आणि आपलं जीवन गतिमान व्हावं हा विचार केवळ विचारच राहतो.

तर,

मरेपर्यंत आणि आणि एखाद्याच्या मरणानंतरही आपल्या अपेक्षा संपतात का ?

आयुष्याच्या शेवटच्या क्षणानंतरही अपेक्षांची संख्या काही कमी होत नाही. अपेक्षा नाही असं कोणाचं आयुष्य नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात स्वतःकडून/इतरांकडून कोणत्या ना कोणत्या अपेक्षा असतात.पैसा,करिअर, नोकरी, नातेसंबंध अशा गोष्टींशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारच्या अपेक्षा या असतात.

[आपल्याकडे मोठा बंगला असावा.चार पाच गाड्या असाव्यात.एखादी कार,बाईक असावी असं वाटतं.आजची छोट्या पगाराची नोकरी उद्या चांगल्या पगाराची व्हावी.प्रेमात असेल तर त्या वेगळ्या अपेक्षा.किंवा कुठल्याही नात्यातील विविध प्रकारच्या अपेक्षा. मुलांकडच्या अभ्यासाबाबतीत असणाऱ्या अपेक्षा, पालकांच्या अपेक्षा……. वगैरे वगैरे.]

अशा प्रकारच्या अपेक्षा साधारणपणे असतात.

कधी आपण स्वतःकडून त्या ठेवत असतो तर कधी इतरांकडून.त्या पूर्ण व्हाव्यात असं प्रत्येकालाच वाटत असतं.पण नेहमीच त्या पूर्ण होतात असं नाही.

कधी कधी अपेक्षाभंग हा होतोच.

अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे असं अजिबात नाही.परंतु त्याला काहीतरी लिमीट असणं आवश्यक आहे.आपण कधी कधी अवास्तव आणि जरा जास्त अपेक्षा करत असतो.आणि त्या पूर्ण झाल्या नाही तर बराच काळ त्यावर दुःखी होतो.खूप वेळ त्यावर विचार करण्यात खर्च करतो.आणि यामुळेच आपल्या कितीतरी गोष्टी अर्धवट राहतात.किंवा एखाद्या गोष्टीचा स्पीडही कमी होतो.

अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे त्याचा परिणाम मनावर होतो.आणि मन खचलं की शरीराला त्रास व्हायला वेळ लागत नाही.

मित्रांनो नेहमीच या अशा अपेक्षांमुळे आपण असं काहीतरी सहन करत रहायचं का ? यामुळे आपलं जीवन कधीच गतिमान होणार नाही.आपण एकाच ठिकाणी अडकून राहिलो तर आपली वाढ खुंटण्याची शक्यता असते.

सतत वाढत्या अपेक्षांमुळे आपण पुढे जाऊ शकतो का ? यामुळे जीवन गतिमान होणार आहे का?

गतिमान जीवनासाठी अपेक्षा उपयोगाच्या नाही असं नाही.अपेक्षा असाव्यात परंतु ढीगभर नाही.जेवढ्या कमी अपेक्षा असतील तेवढच आपलं जीवन सुधारण्यासाठी जास्त वेळ आपल्याला मिळू शकतो.कारण अपेक्षांच्या ओझ्याखाली आयुष्य कधी गुदमरलं जातं कळतही नाही.आयुष्यच गुदमरलं तर गतिमान जीवनाची कल्पनाच विरून जाऊ शकते.म्हणून गतिमान जीवनासाठी अपेक्षांच्या मर्यादा ठरवून घेणं आवश्यक आहे.

आणि इतकच नाही तर आपल्या विचारांना केवळ मन आणि मेंदूत ठेवण्यापेक्षा थेट आपण कृतीतून दाखवलं तर जीवन गतिमान होण्यास अधिक बळ मिळेल.विचार महत्वाचा असतोच पण त्याहीपेक्षा कृती जास्त महत्वाची असते.[कुणीतरी म्हंटलच आहे,’Actions speaks louder than words.’]

म्हणून कृतीवर जास्त भर द्या.थेट कृतीतून व्यक्त व्हायला शिका.नुसतं विचार असून चालत नाही.कोणत्याही कृतीशिवाय आयुष्य गतिमान होणं शक्य नाही.त्यामुळे action ही must आहे.हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं.

काय,येतयं नं लक्षात ?

जीवन तेव्हाच गतिमान होईल जेव्हा

अपेक्षा कमी आणि कृतीतून आपण व्यक्त करायचं ठरवू.

आपल्यालाही या गतिमान जीवनाचाच एक भाग व्हायचा असेल तर थोडे फार प्रयत्न तर करायलाच हवेत.

अपेक्षांच , विचारांच व्यवस्थित नियोजन करता यायला हवं.सतराशे साठ अपेक्षा आणि मेंदूवर ताण येईपर्यंत विचार करणं म्हणजे गतिमान जीवनाकडे वाटचाल करणं होत नाही. कमी आणि योग्य अपेक्षा, विचारांना कृतीची जोड असेल तर अनेक गोष्टी लवकरात लवकर साध्य होतात.आणि तिथूनच गतिमान जीवनाची खरी वाटचाल सुरू होते.

म्हणून अपेक्षा कमी करा,किंवा एकावेळी ढीगभर अपेक्षांची तरी अपेक्षा करू नका. विचार करा पण त्याला कृतीची जोड अवश्य द्या.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *