Skip to content

जितक्या निगेटिव्ह गप्पा कमी कराल, तितका मानसिक त्रास कमी होईल.

जितक्या निगेटिव्ह गप्पा कमी कराल, तितका मानसिक त्रास कमी होईल.


गीतांजली जगदाळे


विचार सतत वाहतात, पण त्यांचे सामर्थ्य कमी होतं नाही. ते नदी प्रमाणे असतात..एक एक विचार येत गेला, नाहीसा होतं गेला.. पण सत्ता चालली ती विचारांचीच.. मनुष्याला या विचारांपासूनच प्रेरणा मिळत आली आहे..विचारांच्या सामर्थ्याची तुलना करावी अशी अन्य शक्ती या जगात नाही.
– आचार्य विनोबा भावे

विचारांचं सामर्थ्य फार मोठं असतं. असं म्हटलं जातं की, विचारांनीच माणूस घडतो. सकारात्मक विचार करणाऱ्यांची प्रगती लवकर होताना दिसते. त्याउलट नकारात्मक विचार करणाऱ्यांना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. सामान्यपणे आपलं आपल्या विचारांकडे लक्ष नसत.

किंबहुना विचारांबाबतीत जेवढी सजगता असायला हवी तेवढी आपल्यामध्ये नसते. एखादी चांगली गोष्ट करताना मनात येणारा पहिला सृजनशील विचार पकडून ठेवता आला पाहिजे. तशी सवयच लावून घ्यायला हवी व तात्काळ कृतीच्या अंमलबजावणीची रूपरेषा ठरवली गेली पाहिजे. मनात येणाऱ्या पहिल्या विचारालाच नकारात्मक विचारांचे मळभ लाभले की कार्यसिध्दीला ग्रहण लागलेच म्हणून समजा.

यासाठी सगळ्यात आधी आपण जे बोलतो, जो विचार करतो, ज्या भावना अनुभवतो त्या कशा आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे. खूप लोकांना आपण नकारात्मक विधाने वारंवार करत असतो हे लक्षातच येत नाही. कारण आपलं लक्ष आपण काय बोलतो, यापेक्षा कोणी आपल्याला काय बोलतंय याकडे जास्त असतं. त्यामुळे आपल्या भावना सकारात्मक आहेत का? त्या आपल्याला त्रासदायक वाटतात का? की त्यांनी आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळते याचा विचार करायला हवा.

कारण आपण ज्या भावना अनुभवतो तसेच विचार आपल्या डोक्यात येतात, आणि जे विचार आपल्या डोक्यात येतात तेच अशा ना तशा रूपाने आपल्या तोंडून बाहेर पडतात. पण त्याची अशी साखळी तयार होते की, भावना-विचार-बोलणे हे चक्र झाले की परत बोलण्याने अजून तशाच भावना येतात आणि परत तसेच विचार आणि परत तसेच बोलणं.. असं न संपणार चक्र सुरु होतं. ते चक्र तोडून मूळ पदावर येणं मात्र थोडं अवघड जात हे नक्की.

त्यामुळे वेळीच सावध झालेलं कधीही चांगलं. आपल्या विचारांकडे लक्ष द्या, आणि जरी तुमच्या लक्षात आलं की आपण नकारात्मक विचार करत आहोत, तरी देखील घाबरून जाऊ नका. असा विचार का येतोय यापेक्षा जास्त महत्वाचं खरंच आपल्याला नकारात्मक वाटतंय तसं आहे का, कि आपण उगाच टोकाचा विचार करतोय? असा विचार करून बघा.

तुमचं मन किंवा मेंदू ज्या पद्धतीचा नकारात्मक विचार तुमच्यापुढे मांडतो तो बऱ्याचदा टोकाचा आणि अतिविचाराने तयार झालेला असतो. पण प्रत्यक्षात मात्र ते विचार वास्तविक परिस्थितीपासून फार लांब असतात. त्यामुळे आपल्याला जेव्हा रिऍलिटी आणि अतिविचारांमुळे येणारे नकारात्मक विचार यातला फरक नीट समजतो तेव्हा आपल्याला ते व्यवस्थित हॅन्डल करता येतात, आणि त्या विचारांना तर्कशुद्ध पद्धतीने प्रश्न विचारल्यामुळे ते येणं हळू हळू कमी होऊन बंद होतं.

नकारात्मक चर्चेचे हानिकारक प्रभाव असू शकतात. निगेटिव्ह टॉक हे चिंता आणि नैराश्येचे खाद्य असते. त्यामुळे तणाव पातळी वाढते आणि आत्म-सन्मानाची पातळी कमी होते .यामुळे प्रेरणा कमी होऊ शकते तसेच असहाय्यतेची भावना वाढू शकते.

उदाहरणार्थ,
• मी केल्याने काय फरक पडणार आहे?
• लोक काय म्हणतील, हसणार तर नाहीत ना?
• मीच का म्हणून करू?
• मला नाही जमायचं ते!
• कितीही प्रयत्न केला तरी मला माहितीए ते नाहीच होणार!
• पण योजना असफल झाली तर?
• करायला हरकत नाही, पण मला नशीब कधीच साथ देत नाही.

स्वत:शी संवाद साधणं हा सकारात्मक स्व-प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आहे. पहिल्या विचारावर कार्यप्रवण होण्यामध्ये जरा काळ गेला की असे असंख्य विचार अडचणींचे डोंगर उभे करतात आणि चांगल्या विचाराची हत्या होते.

नकारात्मक संवादामुळे नवीन संधी पाहण्याची क्षमता कमी होऊ शकते, तसेच या संधींचा फायदा घेण्याची प्रवृत्ती कमी होऊ शकते. याचा अर्थ असा की तणावाची वाढलेली भावना ही समज आणि त्यातून येणारे वर्तन या दोन्हींमधून येते.जितके तुम्ही स्वतःला सांगाल की तुम्ही काही करू शकत नाही, तितका तुमचा त्यावर विश्वास बसत जातो.

तुमचा कुठेतरी यावर विश्वास बसायला लागतो की “चांगलं” हे “उत्तम” असण्याइतकं महत्वाचं नाही. एकतर हे टोक नाहीतर ते टोक धरायची सवय होते. आशावादी दृष्टिकोन उरतंच नाही. सतत स्वत: बद्दल नकारात्मक बोलल्याने तुम्हाला गरजू आणि असुरक्षित वाटत असतं किंवा तुम्ही तुमचे नकारात्मक बोलणे इतरांना त्रास देणाऱ्या सामान्य नकारात्मक सवयींमध्ये बदलत असता, संवादाचा अभाव आणि अगदी “खेळकर” टीकेचा ही अशा वेळी गंभीर परिणाम होऊ शकतो.

थोर व्यक्तींच्या चरित्राचं परिशीलन केलं असता असं लक्षात येतं की, प्रतिकूल परिस्थितीतही केवळ सकारात्मक विचारांची साथ न सोडल्यामुळे ते असामान्य कार्य करू शकले.

बऱ्याच वेळा व्यक्ती स्वत:च्या रंग, रूप, उंची यानुसार स्वत:चं मूल्यमापन करतो. वर्ण काळा असेल, उंची कमी असेल तर स्वत:बद्दल नकारात्मक विचार निर्माण होतात. क्वचित प्रसंगी आलेल्या अपयशाने खचून न जाता अपयशाच्या कारणांचा अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती ही निसर्गाची अद्वितीय कलाकृती असते, त्यामुळे इतरांशी तुलना करून स्वत:ला कमी लेखण्यापेक्षा स्वत:मध्ये सातत्याने सुधार कसा होईल, याचा प्रयत्न केला पाहिजे.

यासाठी आपण आहोत तसे स्वतःला आधी स्वीकारणं गरजेचं आहे. जेव्हा आपण स्वतःला आहोत तसे स्वीकारतो तेव्हा स्वतः बद्दल न्यूनगंडाची भावना येत नाही, आणि आत्मविश्वासाने आपण पुढील कार्य करू लागतो.

स्वत:शी संवाद साधणं हा सकारात्मक स्व-प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आहे. स्वत:ला स्वत:मध्ये असणाऱ्या गुण-दोषांसहित स्वीकारणं म्हणजेच सकारात्मक स्व-प्रतिमा निवडण्यासाठी उचललेलं पहिलं पाऊल होय. इतर व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करतात, त्यांना आपण कसे वाटतो, यावरून स्वत:ची किंमत करू नये. कारण आपणच स्वत:ला चांगले ओळखू शकतो.

सकारात्मक विचार ऑटोमॅटिक यावेत असं जरी वाटत असलं तरी त्यासाठी त्याच बी मनात आपल्यालाच पेरावे लागते . तेव्हा ते हळूहळू यायला सुरुवात होते. त्यासाठी सकारात्मक स्टेटमेंट्स (Affirmations) रोज नियमितपणे बोलणं, मनात त्यांचं चिंतन करणं आणि आपण जिथे नकारात्मक बोलणार आहोत तिथे स्वतःला थांबवून त्याचा सकारात्मक विधानांमध्ये परिवर्तन करणं ते बीर रुजवायला आणि वाढवायला मदत करू शकतं .

स्वत:साठी तर सगळेच जगतात; परंतु जो इतरांसाठी काही तरी चांगले करतो त्याला सकारात्मक ऊर्जेचे दालन खुले होते, स्वत:मध्ये आत्मप्रतिष्ठा निर्माण होते. प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार इतरांना मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकमेकांचा विचार केला तरच समाजाचा आणि राष्ट्राचा विकास साध्य होऊ शकेल.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “जितक्या निगेटिव्ह गप्पा कमी कराल, तितका मानसिक त्रास कमी होईल.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!