“झुरत राहण्याची वेळ वाढली की जगण्याची इच्छा मंदावते.”
मधुश्री देशपांडे गानू
विश्वनाथपंत चौधरी. बांधकाम व्यवसायातील एक अत्यंत नावाजलेले नाव. चोख व्यवहार. अत्यंत कष्टाने, मेहनतीने त्यांनी त्यांचा व्यवसाय नावारुपाला आणला होता. त्यात त्यांच्या पत्नीची वैशालीची भक्कम साथ होती. आता मुलगा अमेयही हाताशी आला होता. सुप्रतिष्ठित, विश्वासार्ह, लोकप्रिय नाव होतं त्यांच्या व्यवसायाचं. सगळं वीस, बावीस वर्षांच्या मेहनतीने या कुटुंबांने मिळवलं होतं. सुयश, सुप्रतिष्ठा, सौख्य, श्रीमंती.. सगळी सुखं हात जोडून उभी होती. अर्थात व्यवसायात त्यांचे पार्टनरही होते.
पण अचानक एका मोठ्या व्यावसायिक करारात त्यांच्याच पार्टनरने त्यांची फसवणूक केली. खोट्या कागदपत्रांवर विश्वानाथपंतांच्या सह्या घेतल्या. आणि इथेच घात झाला. नवीन करारासाठी बँकेचे भलं मोठं कर्ज घेतलं होतं. हळूहळू घरातलं सोनं नाणं, राहता बंगलाही त्यांना विकावा लागला. आणि वर्षभरात स्वतःचं छप्परही उरलं नाही. व्यवसायात नावही खराब झालं. आपण “Rags to Riches” ऐकलं होतं. पण इथे अगदी उलट, होत्याचं नव्हतं झालं. इतकं की त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा यांना एका छोट्या पोळी भाजी केंद्रात काम स्वीकारावं लागलं.
या सगळ्याचा जबरदस्त धक्का विश्वनाथपंतांना बसला. आणि त्यांचा आत्मविश्वास पूर्णपणे कोलमडून पडला. ते नैराश्याच्या गर्तेत गेले. खूप उपाय झाले. मानसोपचारतज्ञ झाले. पण काही उपयोग झाला नाही. यातून ते सावरूच शकले नाहीत. रोज क्षण क्षण ते फक्त झुरत राहिले. खूप मोठा सेटबॅक होता. पण यातूनही ते काही काळानंतर स्वतःच्या हिमतीवर सावरू शकले असते. त्यांच्यात ते सामर्थ्य होतं. पण पुन्हा नव्याने ते काहीच करू शकले नाहीत.
कारण त्यांच्या मनाने संपूर्णपणे हार मानली होती. रोजची दिनचर्या ही आता ते वेळेवर करू शकत नव्हते. कौटुंबिक, सामाजिक संवाद त्यांनी कमी केले. फक्त झुरत राहणे एवढेच करत राहिले. परिणामी ऐन पन्नाशीतच त्यांच्या तब्येतीवर परिणाम दिसू लागला. त्यांना पाठीचं जबर दुखणं सुरू झालं. पाठीच्या मणक्याचे मोठं ऑपरेशन करावं लागलं. त्यांच्या हाता पायांच्या हालचालीवर परिणाम झाला. बाहेर पडणं जवळजवळ बंद झालं. कारण त्यांची जगण्याची इच्छाच मंदावली होती. ते सतत कोणत्या ना कोणत्या आजाराने पछाडलेले राहू लागले. त्यांच्या मनाने त्यानंतर उचल खाल्लीच नाही. आज त्यांची अजिबातच जगण्याची इच्छा नाही. डॉक्टरांवर विश्वास नाही. त्यांच्या पत्नीला, मुलाला याचा त्रास होतो, अतोनात दुःख होतं पण विश्वनाथ पंतांचे झुरत राहणं आजही संपत नाही…
वाचकांनो, माणूस म्हटलं की सुख-दुःखाची वादळं झेलावी लागतातच. संकटं आली, अडचणी आल्या तरी डगमगून न जाता सामोरे जावं लागतं. अगदी मग नैसर्गिक आपत्ती असोत नाहीतर आपल्याच प्रिय माणसांनी दिलेलं दुःख, पैशाची फसवणूक असो किंवा प्रेमभंग… माणसाला या अशा अग्नीदिव्यांमधून पार पडून पुढचा रस्ता चालावाच लागतो. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची उभी पिकं नष्ट होतात. काय वाटत असेल त्यांना?? किती अतोनात दुःख होत असेल त्यांना. पण तरीही परत नव्याने पेरणी करतात. माघार नाही घेत. “यालाच जीवन ऐसे नाव”
हल्ली माणूस सोशल मीडियावर कितीही सुविचार पोस्ट करत असला तरीही प्रत्यक्ष आयुष्यात एकतर तो भावनाहीन तरी होत आहे, नाहीतर अति भावनिक. मग प्रेमात अपयश आलं, आई-वडिलांनी मोबाईल दिला नाही अशा अनेक क्षुल्लक कारणांनी तरुण मुलं आत्महत्या तरी करतात किंवा हत्येसारखा निर्मम गुन्हा तरी करतात.
कोणताही प्रसंग आला तरी झुरत राहणं, त्यातच अडकून पडणं हे केव्हाही चूकच. कारण घटना घडून जाते. त्याचे परिणाम ही जबर सहन करावे लागतात. तरीही हा भूतकाळ मागे टाकून, तिथेच अडकून न राहता नवीन मार्ग शोधण्यासाठी चाचपडत राहणे, प्रयत्न करणे हेच खरं माणूस म्हणून धैर्याचं, हिमतीचं असतं. झुरत राहण्याने परिस्थिती अजून बिकट होते, बिघडत जाते. हा वेळ वाढला तर जगण्याची इच्छा मंदावते. आणि कोणताच मार्ग दिसत नाही. फक्त नकारात्मक मानसिकता तयार होते, अगदी स्वतःबद्दलही.. मग जगावसं वाटत नाही. आणि आत्मविश्वासाचा प्रचंड अभाव निर्माण होतो. या सगळ्याचा परिणाम शरीर-मनावर होतोच. शारीरिक, मानसिक आरोग्य बिघडतं.
अशा व्यक्ती तुमच्या आजूबाजूला सहज दिसतात. अशा व्यक्तींना हताश वाटतं. अकारण चिडचिड करतात. आपल्याला सगळे टाळतात असेही त्यांना वाटतं. कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला अपराधी समजतात. त्यांना स्वतःची लाज वाटते. मनाची संभ्रमित अवस्था असते. निर्णय क्षमता शून्य असते. अगदी दैनंदिन कामातही एकाग्रता आणू शकत नाहीत. झुरत राहणाऱ्या व्यक्ती कामं टाळतात, व्यसनाधीनही होतात. मग त्यांचे नातेसंबंधही बिघडायला लागतात. सतत शारीरिक तक्रारी असतात.
अशा संभ्रमित अवस्थेतून जर तुम्हीं जात असाल तर समुपदेशकाची, मानसोपचार तज्ञांची तातडीने मदत घेणे अत्यंत आवश्यक आहे. आणि स्वतःही या मनस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काही उपाय करणे गरजेचे आहे.
१) सर्वात प्रथम स्वतःला अपराधी समजणे सोडून द्या.
२) घडलेली घटना सविस्तर लिहून काढा. तुम्हांला त्याबद्दल काय वाटतं हेही लिहा. यांने तुम्हांला मोकळं वाटेल.
३) प्रत्येक मनुष्याला यश अपयश हे पचवावं लागतंच. स्वतःची लाज न बाळगता सत्य, वास्तव परिस्थिती लवकरात लवकर स्वीकारा.
४) स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका.
५) प्रत्येक व्यक्तीच्या जगण्याला काहीतरी कारण असतंच. ते शोधा. एखादी प्रिय व्यक्ती, आवड, छंद, तुमचं घर काहीही…
६) नवीन काही शिकण्याची तयारी ठेवा. अगदी घरात असलात तर घरातली छोटी छोटी कामं करा. स्वयंपाक शिका. लॉकडाऊनने तर आपल्या सगळ्यांनाच हे शिकवलंय.
७) प्रियजनांबरोबर संवाद टाळू नका. तर मनमोकळे बोला. त्याने तुम्हांलाच हलकं वाटेल.
८) शारीरिक व्यायाम , चालणं हे अत्यंत गरजेचे आहे. चार नवीन व्यक्ती भेटल्या की उल्हासित वाटतं.
९) मनाला सकारात्मक विचार करण्याची जाणीवपूर्वक सवय लावा. योगासने, ध्यानधारणा हे खूप सकारात्मकता देतात.
१०) रोजनिशी लिहा.
११) स्वतःवर निरतिशय प्रेम करा. आत्ता या क्षणापुरतं भरभरून जगा.
अशा अनेक छोट्या छोट्या उपायांनी तुम्ही अपयशाच्या, झुरण्याच्या गर्तेतून, वाईट काळातून बाहेर येऊ शकता. फक्त स्वतःवर दृढ विश्वास हवा आणि या सुंदर जगण्यावर अमर्याद प्रेम…
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
