“एका स्त्रीला इतर स्त्रियांकडून समान वागणूक मिळत नाही हे खरंय का??”
मधुश्री देशपांडे गानू
“Jealousy thy name is woman.”
सुप्रसिद्ध लेखक विल्यम शेक्सपियर यांनी हे म्हणून ठेवलंय..”मत्सर, हेवा याचंच दुसरं नाव स्त्री आहे.” आणि हे अगदी खरं आहे. प्रत्येक स्त्रीला जीवनात अशा मत्सरी, ईर्षा, हेवा करणाऱ्या इतर स्त्रियांचा सामना करावा लागतोच. बहुतेक वेळा या इतर स्त्रिया घरातील, कुटुंबातील असतात. निसर्गत:च स्त्री स्वभाव असा बनलेला असेल बहुदा. आपलं कौतुक, आपली प्रशंसा व्हावी असे प्रत्येक स्त्रीला वाटतं. मग स्वतः पेक्षा कोणत्याही बाबतीत वरचढ स्त्री तिला प्रतिस्पर्धी वाटू लागते.
आणि इथेच मत्सराची ठिणगी पडते. ती स्वतःचं अस्तित्व, स्वतः मधले गुणदोष, स्वतः मधली शक्तिस्थानं हे सगळं विसरून फक्त त्या वरचढ स्त्रीशी स्वतःची तुलना करू लागते. तिच्यासारखं जगू पाहते. आणि इथेच फसते. आपण इतर कोणासारखं होऊ शकत नाही या वास्तवाचा विसर पडल्याने ती निराश होते. तिची चिडचिड होते. मग गॉसिपिंग करणं, त्या स्त्रीविषयी चुकीचे गैरसमज पसरवणं, तिची प्रतिमा मलिन करणं अशा गोष्टी सुरू होतात. स्वतःची प्रगती करायची सोडून यातच स्त्रीया अडकतात. आणि यात त्यांना काही चूक आहे हे जाणवतही नाही. त्यामुळे एखाद्या गुणवान स्त्रीचं मनमोकळेपणाने साधं कौतुक करणंही कित्येक स्त्रियांना जमत नाहीच.
अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. मैत्रिणींच्या समूहामध्ये प्रत्येक स्त्रीमध्ये काहीतरी कला असतेच. पण स्वतः मध्ये काहीही शोध न घेता अंधपणे एखादीला फॉलो केलं जातं. एखाद्या कलेची उत्तम समज, जाण, प्रयत्न, सातत्य, कौशल्य असलेल्या स्त्री सारखं आपण असावं असं सगळ्यांना वाटत असतं. पण प्रत्येकीला ती कला उपजत असतेच असे नाही. प्रयत्न, मेहनत, सातत्य याने कला निश्चित आत्मसात करता येते. पण हे काहीही न करता त्या स्त्रीशी स्वतःची तुलना करणं आणि तिचा मत्सर करणे अत्यंत चूक आहे. याने स्वतःचाच आत्मविश्वास गमावण्याची पाळी येते. त्यापेक्षा स्वतःवर लक्ष केंद्रित केलं तर आपण स्वतःला छान घडवू शकतो.
आपल्याकडे सौंदर्याच्या कल्पना तर फारच हास्यास्पद, तकलादू आहेत. गोरी आणि बारीक स्त्री सुंदर! अशी अतिशय हास्यास्पद कल्पना आहे. प्रत्येक स्त्री गोरी आणि बारीक असू शकेल का?? पण यावरून आपण किती सहज जजमेंटल होतो. एखाद्या सावळ्या रंगाच्या स्त्रीला हा न्यूनगंड आयुष्यभर छळत राहतो. केवळ गोरा रंग हे तिचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व आहे का?? त्यामुळे ती संपूर्णपणे स्वतःलाच स्वीकारू शकत नाही. अनाठाई “बारीक म्हणजे सुंदर” या भयंकर कल्पनेने ग्रासलेल्या स्त्रिया दोन वेळचं नीट जेवत नाहीत.
आणि पुरेसे पोषण न मिळाल्यामुळे कुपोषित तर असतातच आणि अनेक मोठ्या दुर्धर आजारांना बळी पडतात. पण त्यांना हे समजत नाही. कारण बारीक म्हणजे सुंदर या अट्टाहासाने त्यांना पछाडलेलं असतं. प्रत्येक स्त्रीमध्ये स्वतःचं असं सौंदर्य असतंच. पण समाजाचे चुकीचे संकेत, लग्नाच्या बाजारातले चुकीचे नियम अशा गोष्टींमुळे आपल्यावर संस्कार ही चुकीचे होतात.
कित्येक घरांमध्ये दोन सुना असतील एक नावडती आणि एक आवडती असते. कोणत्याही कारणाने एक मुलगा दुर्बल असेल तर त्याच्याकडे आई-वडिलांचा ओढा असतो त्यामुळे त्याची पत्नी आवडती. मग नावडती सून कितीही multi-talented, multitasking असली तरी संपूर्ण ओढा आवडत्या सुनेकडेच असतो. नावडत्या सुनेवर कायम अन्याय होतो. तिला योग्य कौतुक, योग्य मान, योग्य स्थान कधीच मिळत नाही. आवडत्या सुनेला मग नसलेले गुणही चिकटतात.
त्यातून जर एखादी घटस्फोटीत स्त्री किंवा पतिनिधनानंतर एखादी स्त्री एकटी खंबीरपणे जबाबदारी निभावत असेल तर स्त्रीयाच काय, समाजही कधी कधी तिला हीन वागणूक देताना दिसतो. स्त्रीच स्त्रीची शत्रू असते असं म्हणतात ते बर्याच अंशी खरेही आहे. आपण स्त्रियाच एकमेकींना मदत करत नाही, एकमेकींसाठी खंबीर उभ्या राहत नाही.. यातच मग साळसूद, संधीसाधू पुरुष याचा गैरफायदा फायदा घेतात आणि अनेक स्त्रिया हातोहात फसवल्या जातात.
परत स्त्रीला चारित्रहीन म्हणण्यात तर आपला समाज उच्च स्थानावर आहे. एखाद्या स्त्रीला मूलबाळ नसेल तरीही तिला त्याच फुटपट्टी ने मोजलं जातं. तिला काय काम आहे? रिकामीच असते ती असे सहज ताशेरे ओढले जातात. त्या स्त्रीच्या नाजूक मनःस्थितीचा विचार फार कमी इतर स्त्रिया करतात.
आपल्याकडे लग्न, मंगळसूत्र, नवरा, मुलं यांना अवास्तव महत्त्व आहे.Taboo आहेत हे. स्त्रीचं आयुष्य म्हणजे फक्त हेच असं मानणारे आपण!! स्त्रीला आपण याच तराजूत तोलतो. मग तिचा मनमिळाऊ स्वभाव, तिच्यातले कलागुण, समर्थपणे कुटुंबाला सांभाळणं हे सगळं दुय्यम ठरवतो आपण. किती हीन वृत्ती आहे ही! आणि यात स्त्रियाच आघाडीवर आहेत.
खरं म्हणजे एक स्त्रीच दुसर्या स्त्रीचे दुःख अगदी सहज नेमकं समजू शकते. तिच्या मनातील आंदोलनं, तिचं सैरभैर होणं, तिचा ठाम उभं राहणं, तिचे भावनिक चढ-उतार हे सगळं एक स्त्री उत्तम समजू शकते. पण आपल्याला एखाद्या स्त्रीच्या दुःखावर, तिच्या आयुष्यातील एखाद्या न्यूनतेवर बोट ठेवायला, त्याची मस्करी करायला सहज जमतं.
आता परिस्थिती थोडीफार बदलत आहे. कारण आजची स्त्री सुशिक्षित, अर्थार्जन करणारी, स्वतंत्र विचारसरणी असणारी आहे. मुळात माझं असं स्पष्ट मत आहे, समाजाकडून बदलाची अपेक्षा करण्यापेक्षा स्त्रीने स्वतः अमुलाग्र बदलायला हवे. स्वतःबद्दलचा ठाम आत्मविश्वास, स्वतःवर निरतिशय प्रेम, स्वतःचा संपूर्ण स्वीकार, स्वतःचा आत्मसन्मान, स्वतःचं व्यक्तिस्वातंत्र्य आणि आर्थिक स्वावलंबन या गोष्टी तिने आज आत्मसात करायलाच हव्यात. तिचं व्यक्तिमत्त्व, देहबोली, भाषा, वावर असा हवा की कोणाचीही तिच्याशी गैर वागण्याची हिम्मतच होणार नाही. आजच्या पिढीला आणि उद्याच्या ही पिढीला स्त्रियांनी स्वसंरक्षणासाठी शारीरिक दृष्ट्या सक्षम ही काळाची गरज आहे.
आज अनेक स्त्रिया एकमेकींना मदत करून एकमेकींच्या साथीने अनेक सुंदर गोष्टी करत आहेत. मग एखादं महिलामंडळ असो, एकमेकींच्या कलागुणांची जोपासना असो, लघुउद्योग असो. स्वतःबरोबर इतर स्त्रियांचीही सर्वार्थाने प्रगती करत आहेत. पन्नाशी उलटलेल्या स्त्रिया या आता सांसारिक कर्तव्यातून थोड्या मोकळ्या झालेल्या असतात. त्या एकत्र येऊन जीवनाचा मुक्तपणे, आनंदाने एकमेकींच्या साथीने आस्वाद घेत आहेत. अशा एकत्र येण्याची आज गरज आहे.
एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली तर मग नातं कोणतंही असो, मैत्रीण असो , ती स्वतःची आणि कुटुंबाची ही सर्वांगीण प्रगती करू शकते.
स्त्री अबला कधीच नव्हती आणि नाही. ती शक्ती आहे. सबल आहे. जननी आहे. पण ही स्त्री, ही शक्ती जर एकत्र एकवटली तर समाज अधिक सुदृढ, प्रगल्भ होईल याची मला नक्कीच खात्री आहे….
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

खूप छान लेख आहे. आणि आजची स्त्री स्वतःमध्ये बदल आणत आहे, थोड्याच अवधित सगळ्या स्त्रिया एकमेकींचा आदरही करतील . मला विश्वास आहे बदलत्या आधुनिकतेवर, लेख अप्रतिम आहे.
स्त्री ने समाजा कडून बदलाची अपेक्षा करण्यापेक्षा स्वतः त बदल केला पाहिजे …हे अगदी बरोबर आहे
तुमचा लेख आवडला आणि शेयर पण करते आहे