जे घट्ट पकडून ठेवशील ते तुझं कधीच राहणार नाही.
अपर्णा कुलकर्णी
विकासराव आज आपल्या बायको सोबत पहिल्यांदा फिरायला आले होते. दोघेही एका बागेत भेळ खात बसले होते. विजयाताईंना भेळ खायची नव्हती कारण भेळ खाल्ल्याने त्यांच्या छातीत जळजळ होत असे, पण हे विकासरावांना सांगण्याची त्यांची हिम्मत नव्हती म्हणूनच त्या निमूटपणे भेळ खात होत्या. आज विकासराव मात्र खूपच आनंदात होते. त्यांचा एकुलता एक मुलगा रोनितच्या लग्नाला आजच एक महिना पूर्ण झाला होता आणि त्याचाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. म्हणूनच त्यांनी विजयाताईंना बाहेर फिरायला आणले होते. विजयाताई बी.कॉम झाल्या होत्या, लग्नानंतर काही वर्षे जॉब करण्याची त्यांची खूप इच्छा होती पण विकासरावांचा त्याला विरोध होता.
घरातल्या बाईने घरच सांभाळावे अशी त्यांची धारणा होती आणि तीच त्यांनी विजयाताईवर लादली होती. त्यात लगेच विजयाताईंना रोनीत झाला आणि त्यातच त्या अडकल्या. विजयाताईंना अजून एक चान्स घ्यायचा होता कारण त्यांना मुलगी हवी होती. म्हणजे काहीही झालं असतं तरी चाललं असतं पण त्यांना अजून एक चान्स घ्यायचा होता. घरातील आर्थिक परिस्थिती पण चांगली होती.
विकासराव बँकेत मॅनेजर होते त्यामुळे पगार उत्तम होता पण तिथेही विकासरावांनी विरोध केला आणि विजयाताई गप्प राहिल्या. विकासराव पहिल्यापासूनच खूप शिस्तबद्ध आणि काटेकोर होते. आपला एकुलता एक चिरंजीव तसाच असावा अशी त्यांची इच्छा. म्हणूनच त्यांनी पहिल्यापासून रोनीतवर स्वतःचे गुण देण्याचा नव्हे तर विजयाताईंच्या मते लादण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यात त्यांना चांगले यश पण मिळाले होते.
विजयाताई मोठ्या असून, चांगले वाईट कळत असूनही त्यांना विकासरावांना विरोध करायला जमले नव्हते तर रोनित तर लहान होता त्यामुळे त्याने विरोध करण्याचा प्रश्नच येत नव्हता. आता तर बाबांना विरोध न करता सगळं निमूटपणे ऐकणे हा त्याचा स्वभावच झाला होता. लग्न ही अशाच प्रकारे पार पडले होते. विकासरावांनी मुलगी पसंत केली आणि रोनीतने निमूटपणे होकार दिला. पण मुलगी दिसायला जशी छान होती तशीच स्वभावाने ही. त्यामुळे विजयाताई आनंदात होत्या आणि अनघाला मुलीप्रमाणे जपत आणि समजून घेत होत्या.
आज अनघाने पिठलं भाकरीचा बेत केला होता त्यामुळे विकासराव लवकर घरी येऊन ताटावर बसले आणि सुनेच्या स्वयंपाकाचे कौतुक करून झोपले. आज अनघा आणि रोनित फिरायला गेले होते, पण सकाळी गेलेले अजूनही परत आले नव्हते. सातच्या आत घरात हा विकास रावांचा नियम मोडल्याने ते भयंकर चिडले होते. लग्न झाले की बायकोचा गुलाम झाला म्हणून बडबड चालूच होती.
रोनित घरात येताच त्याचे काय अनघाचे ही काहीच ऐकून न घेता खूप चिडले होते विकासराव दोघांवरही. माझा मुलगा जसा माझ्या ऐकण्यात, बंधनात आहे तसेच सुनेने रहावे अशीच त्यांची अपेक्षा होती. पण बाबंसमोर रोनित काहीच कसा बोलला नाही याचे मात्र अनघाल नवल वाटले. बाबा अपरोक्ष रोनीत किती वेगळा असतो आणि बाबांसमोर किती वेगळा असतो हे अनघाला लक्षात आले होते आणि विजयाताईंनी पण थोडक्यात घरातल्या वातावरणाची ओळख करून दिली होती अनघाला.
बरेच दिवस निघून गेले होते. बघता बघता रोनीतच्या लग्नाला वर्ष होत आले होते आणि विकासरावांना नातवंडं खेकवण्याची इच्छा झाली होती पण अनघाला काही वर्ष जॉब करायचा होता. रात्रीची वेळ होती, सगळेच जेवत होते, विकासरावांनी नातवंडाची इच्छा बोलून दाखवली तसा अनघाला ठसका लागला. आज तिने गप्प न राहता बोलायचे ठरवले होते, कारण हा विषय बोलून दाखवल्याशिवाय संपणार नाही हे तिने ओळखले होते.
बाबा मला इतक्यात तुमची इच्छा पूर्ण करायला जमणार नाही, मला जॉब करायचा आहे असे अनघाने म्हणताच विकासरावांचा पारा चढला आणि बायकोला समज दे असे त्यांनी रोनितला बजावले. त्यावर रोनितने खाली मान घालुन मुकसंमती देणे अपेक्षित होते पण आज रोनित म्हणाला, बाबा अनघाच्या निर्णयाशी मी सहमत आहे. तिने कधी आई व्हावे, हा निर्णय सर्वस्वी तिने तिच्या मर्जीने घ्यावा असेच मला वाटते.
रोनितचे हे बोलणे ऐकून विकासरावांचा पारा कुठल्या कुठे गेला. त्यांचा राग पाहून विजया ताई जागीच गार पडल्या होत्या पण त्यांना रोनितचे पहिल्यांदा कौतुक वाटत होते. अनघा म्हणाली, बाबा शांत व्हा, उगाच चिडून माझा निर्णय बदलणार नाही. खरंय बाबा अनघाचे, आजपर्यंत मी तुम्ही दाखवलेल्या दिशेनेच गेलो, पण मी पण एक स्वतंत्र व्यक्ती आहे, मला माझी मते आहेत, माज चांगलं वाईट मला कळत, माझे निर्णय मला घेता येतात.
पण आजपर्यंत तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायचं हेच होत आले आणि तशीच सवय लागून गेली होती. पण वर्षभरात अनघाने हे सगळं पाहून मला माझ्या स्वतंत्रपणाची, अस्तित्वाची जाणीव करून दिली बाबा. आज तुम्ही नातवंडाचा निर्णय आमच्यावर लादून सीमाच गाठलीत. मी तुमचा आदर करतो, प्रेम करतो पण तुमच्या विचारांचा मी गुलाम होऊन राहणार नाही. पण एका गोष्टीसाठी मी तुमचा कायमचा ऋणी राहीन, ते म्हणजे अनघाला माझी बायको म्हणून पसंत केले त्यासाठी. तो निर्णय योग्यच होता. तुम्ही आजवर तुमचे निर्णयच लादले नाहीत तर तुमच्या निर्णयात बांधून, पकडुन ठेवले जे पूर्णपणे चुकीचे होते बाबा.
बाबा तुम्हाला वाटत असेल मला या घरात सून म्हणून आणून सगळ्यात मोठी चूक झाली, पण बाबा तुम्हाला एक सांगू का, मी एकदम स्वतंत्र विचारसरणीच्या वातावरणात वाढले आहे. बाबा आमच्यावर त्यांचे निर्णय कधीच लाडात नव्हते, निर्णय स्वातंत्र्य आम्हाला होते पण जिथे चुकेल तिथे कान उघडणी मात्र नेहमीच करत होते. जे घट्ट पकडून ठेवशील ते तुझं कधीच राहणार नाही त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्य ओळखून समोरच्याच्या मताचा आदर करावा, बंधनमुक्त करावे असे नेहमी ते सांगत असत. अनघाचे हे बोलणे ऐकून विकासरावांचे डोळे पाणावले आणि त्यांनी सगळ्यांची माफी मागितली.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
