Skip to content

जे आपल्या अडचणींचे सोहळे मांडत नाहीत त्या व्यक्ती खरच खूप ग्रेट असतात.

जे आपल्या अडचणींचे सोहळे मांडत नाहीत त्या व्यक्ती खरच खूप ग्रेट असतात.


हर्षदा पिंपळे


[प्रॉब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर हे असतचं. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं या तिन्ही गोष्टीपलिकडचा प्रॉब्लेम अस्तित्वात नसतो. – व.पु.काळे]

व.पु.काळेंनी अगदी सोप्या शब्दात सहजपणे माणसाचा प्रॉब्लेम काय असतो ते सांगितलं. कधी कधी त्यांच हे बोलणं मनाला पटतही.कारण आयुष्य हे माणूस, पैसा आणि वेळ यांच्याभोवती बांधल गेलं आहे. कधी कधी माणसाकडे भरपूर पैसा असतो परंतु त्याचवेळेस त्याच्याकडे वेळ तरी कमी असतो किंवा माणसं तरी कमी असतात.

कधी कधी माणूस खूप सॉर्टेड असतो परंतु वेळ आणि पैशाअभावी तो गुंतला जातो.कधी कधी वेळ आणि पैसा दोन्ही असतं पण माणूस असतोच असं नाही.कधी ना कधी कोणता ना कोणता प्रॉब्लेम प्रत्येकाच्या आयुष्यात येतोच.माणसाच्या आयुष्यात असंख्य अडचणी या येतातच. त्याला नाकारता येणं कदापि शक्य नाही.

आता सर्वसाधारणपणे माणसाच्या आयुष्यात कोणत्या अडचणी असतात…? तर….माणसाच्या आयुष्यात कधी पैशाची चणचण असते.पैशाअभावी माणसाची बरीचशी कामं खोळंबून राहतात. कधी त्याच पैशामुळे माणूस एकमेकांचा जीव घ्यायलाही कमी करत नाही. इतकच नाही तर पैसा नसला की माणूस खचून जातो.सगळं संपल म्हणून जीव द्यायलाही मागेपुढे पहात नाही.काही लोकांच्या आयुष्यात तर कायमच दुष्काळ असतो.

रहाण्यापासून खाण्यापर्यंत त्यांचे चांगलेच वांदे असतात. कुणाला छप्पर नसतं तर कुणाला खायला अन्न नसतं.कुणाला गरिबीमुळे शिकता येत नाही.उद्योगधंद्यांमधील न भरून निघणारं नुकसान, नोकरी जाणे/न मिळणे,भांडणतंटे,ब्रेकअप, घटस्फोट,जवळच्या व्यक्तीचा अकाली मृत्यू, वगैरे वगैरे.

अशी एकामागोमाग एक अडचणींची साखळी सहज तयार होऊ शकते. यांसारख्या अनेक अडचणी प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात येतात. पण प्रत्येकजण या अडचणींचा बाऊ करत बसत नाही. स्वतःच्या सगळ्या समस्या काही लोकं जगासमोर अजिबात मांडत नाही. स्वतःच्या अडचणींचे सोहळे मांडणं काही व्यक्तींना जमतही नाही आणि त्या व्यक्ती असे सोहळे मांडायचा प्रयत्नही करत नाही.एखादी गोष्ट एखादा प्रॉब्लेम शेअर करणं आणि त्याचा सोहळा मांडणं यामध्ये खरच खूप फरक आहे.एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या दुःखाचा,अडचणींचा बाजार मांडण्याची फार सवय असते.

आपलं दुःख,आपल्या अडचणी इतरांपेक्षा छोट्या असू शकतात हे त्या व्यक्ती मान्यच करत नाही. उलट “माझं दुःख केवढं…माझ्या अडचणी केवढ्या”असं म्हणत म्हणत स्वतःच्या अडचणींचा ते केव्हा सोहळा मांडतात त्यांनाही कळत नसावं. “आमचच दुःख किती मोठ्ठ” हे सतत मांडणाऱ्या व्यक्ती समस्यांचा सोहळा मांडण्यातच अर्धा वेळ वाया घालवत असावेत. कारण काही लोकं केवळ सहानुभूतीसाठी स्वतःच्या समस्यांचा सोहळा मांडतात.याउलट काही लोकं खरच खूप ग्रेट असतात जी की स्वतःच्या अडचणींचा कधीच सोहळा मांडत नाहीत.

असा अडचणींचा सोहळा मांडण्यापेक्षा या अडचणीतून बाहेर कसं पडता येईल..?यातून नेमकं काय शिकता येईल…? याचा विचार करतात.आपल्यापेक्षा इतरांच्या अडचणी मोठ्या असू शकतात याची ते स्वतःला जाणीवही करून देतात. पैसे नसतील तर “पैसा नाही पैसा नाही” असं ते करत बसत नाही. यापेक्षा पैसे कमावण्याचे ते चार मार्ग शोधायचा प्रयत्न करतात. पैशाची सतत उधळपट्टी करण्यापेक्षा पैशाची गुंतवणूक करण्याला जास्त प्राधान्य देतात.

अडचणींवर मात करण्यासाठी वेगवेगळे सोल्युशन शोधून नव्या दिशेने प्रवास करायला ते पुन्हा सज्ज होतात.आयुष्यातील अडचणींचे सोहळे मांडण्याऐवजी हसत हसत प्रयत्नशील राहून सुखाचे सोहळे कसे सजवायचे याचा विचार करतात.माझ्याकडे हे नाही,माझ्या बाबतीत असच झालं-तसच झालं हा विचार ती लोकं मनातही आणत नाही.आलेल्या अडचणींचा खंबीर मनाने सामना करत पुढे पुढे चालत रहातात.पुढे जाऊन समाधानी आणि यशस्वी होतात.

खरं तर प्रत्येक माणूस हा सारखा नसतो.तरीही सांगा,अडचणींचे सोहळे मांडण्यात कोणत नवं सुख असतं…?का अडचणींचे सोहळे मांडले तर अडचणी काय कमी होतात का…? तुम्हीच खरं तर या प्रश्नांची उत्तरं शोधून पहा.

मित्रांनो, अडचणींचे सोहळे मांडण्यात खरच काही अर्थ नसतो.अडचणी तर यामुळे कमी होत नाहीत.अशावेळी मदतीचे काही हात पुढे सरसावतात यात शंका नाही.पण अडचणी पाहून तुमच्यावर हसणारेही कमी नाहीत.अडचणींचा फायदा घेऊन खाली खेचणारेही खूप आहेत.त्यामुळे अडचणींचे सोहळे मांडताना जाणीवपूर्वक विचार करा.अशा व्यक्तींकडून नक्कीच प्रेरणा घ्या. ज्यांनी अडचणींचे कधीच सोहळे मांडले नाहीत. पण त्याच अडचणींमधून स्वतःच वेगळं असं अस्तित्व निर्माण केलं.

शेवटी, आयुष्य तुमच आहे आणि निर्णयही तुम्हालाच घेणं आवश्यक आहे.सो,योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आपल्या आयुष्याची दिशा सुखकर करा.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “जे आपल्या अडचणींचे सोहळे मांडत नाहीत त्या व्यक्ती खरच खूप ग्रेट असतात.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!