Skip to content

एखाद्या घटनेकडे जास्त त्रास करून न घेता तटस्थपणे कसे पहावे?

एखाद्या घटनेकडे जास्त त्रास करून न घेता तटस्थपणे कसे पहावे?


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत असतात ज्या आपल्या आयुष्याला अर्थपूर्ण बनवतात. या घटना फक्त आनंद देणाऱ्या असतात अस नाही. किंबहुना आयुष्याला आकार हा खऱ्या अर्थाने जितकी आपण आव्हान स्वीकारू, त्यांचा सामना करू, टक्के टोणपे खाऊ त्यातून येत असतो. त्यामुळे चढ उतार हा आयुष्याचा अविभाज्य भागच आहे. आपल्या आयुष्यात जसे आनंदाचे क्षण येतात, जशी खुशी मिळते तसा त्रास ही झेलावा लागतोच. तो कधी सुटणारा नसतो आणि तो सुटणार नाही हे सत्य आहे.

आपण त्यापासून पळ काढू शकत नाही. हे सर्व असणारच आहे. पण तरीही या सर्व गोष्टी मधूनही आपल्याला जर चांगल एक निरोगी ज्यामध्ये सर्वच गोष्टी येतात मग त्या मानसिक, सामजिक, शारीरिक आयुष्य जगायचं असेल तर काय करायचा आहे?

तर त्यासाठी स्वतःला तयार करायचं आहे. त्रास पूर्णपणे जाणार आहे का? नाही. तो आपल्याला घालवता येणार नाही आणि घालवायचा देखील नाही. कारण मग आयुष्याची किंमत राहणार नाही. मग काय करायचं? तर हा त्रास किंवा ज्या काही घटना आपल्या अडथळे निर्माण करत आहेत, ताण देत आहेत त्यांचा कमीत कमी त्रास आपल्याला कसा होईल, आपल्या आयुष्यात त्यांचा जो काही वाईट परिणाम होत आहे तो आपल्याला कमी कसं करता येईल यासाठी स्वतःला तितकं सक्षम करायचं आहे.

तेवढी आपली शारीरिक, मानसिक तयारी करायची आहे. त्या तयारीची पहिली पायरी म्हणजे एखाद्या घटनेचा जास्त त्रास न करून घेता त्याच्याकडे तटस्थ नजरेने पाहणे. एक third person म्हणून त्या घटनेकडे पाहणे. आताचा एकंदरीतच काळ पाहिला तर खूप जास्त संवेनशील झालेला दिसतो. छोट्या छोट्या गोष्टी देखील त्रासदायक होतात. साधं परीक्षेत कमी मार्क्स पडले म्हणून मुल आत्महत्या करत आहेत, काम मिळत नाही म्हणून नैराश्यात जात आहेत. आता ही कारण असू शकत नाही आपल आयुष्य संपवून टाकण्याची.

पण तरीही अस होत आहे. अस का? कारण आपल्या समोर जे काही येत आहे त्याला इतकं मोठ केलं जातं की याच्या पलीकडे काही वाईट असूच शकत नाही अस मनात येऊन जात आणि त्यातून पुढच्या गोष्टी होतात. आपल्याकडे गमितीने अनेकदा बोललं जात की डोकं दुखत असेल तर पायावर काहीतरी मार. का? तर ते पायच दुखणं इतकं मोठं होऊन जाईल की आपण डोकेदुखी विसरून जाऊ. गमतीचा भाग सोडला तरी यात तथ्य आहेत.

जर आपण असा विचार केला की जास्तीत जास्त वाईट काय आहे? आणि त्याच्या तुलनेत हे तितकं वाईट आहे का? तर आपला त्रास कमी होण्याची शक्यता असते. पण तस त्यावेळी घडत नाही. आपण कधी पाय दुखायला लागला तर पूर्ण अंग दुखतय अस म्हणतो का? पूर्ण अंगदुखी औषध लावून बसतो का? नाही. कारण ते फक्त पायाच दुखणं आहे त्याला तितकच औषध लावलं पाहिजे.

शरीराबाबत जी जागरूकता आपण दाखवतो तितकी आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या घटना प्रसंगांबदल दाखवत नाही. एखादी समस्या आली की ती समस्या, तो अडथळा म्हणजेच आपलं आयुष्य आहे अस आपण मानतो आणि म्हणून त्रास होतो. थोडक्यात काय, आधी म्हट्यल्याप्रमाणे काही लोकांना सवय असते हात दुखायला लागला तरी ताप आला म्हणायची. तस जरा काही अनपेक्षित घडल की माझ पूर्ण आयुष्यचं खराब झालं या घटनेनं अस वाटून त्रास करून घ्यायचा, तो वाढवायचा अश्या गोष्टी होतात. म्हणून जर तटस्थ व्हायचं असेल तर आधी या घटनेला, त्या त्रासाला आपल्या आयुष्यातून वेगळं करून पाहता आलं पाहिजे. ज्याला *externalization* अस म्हणतात. जी काही गोष्ट आहे त्याला आपल्यापासून वेगळं करण.

अस जेव्हा आपण करतो, त्या घटनेकडे आपण जेव्हा त्रयस्थ, तटस्थ चांगल्या वाईटच्या पलीकडे जाऊन पाहतो तेव्हा त्यातील बरीच तथ्य, अनेक पुरावे आपल्याला जे दिसून येतात जे एरवी लक्षात देखील येत नाहीत. आपल्या नोटेवर दिसताना तीन सिंह दिसतात. पण वास्तवात ते चार आहेत. त्यासाठी काय करावं लागेल तर सर्व बाजूंनी त्यांना पाहावं लागेल. एखादी घटना जेव्हा घडते तेव्हा तीसुद्धा सर्व बाजूंनी पहावी लागते. त्यासाठी तटस्थ असावं लागतं. फक्त ही माझ्या आयुष्याशी कशी निगडित आहे, किंवा मलाच त्या गोष्टीने कसा आणि किती त्रास होतोय त्याहूनही प्रत्यक्षात त्याच्या काय काय बाजू आहेत, अस काही घडलं असेल तर त्याची काय कारण असू शकतात, काय वेगळी अंग असू शकतात हे पाहायला लागत. या एकाच घटनेकडे दुसरी एखादी व्यक्ती कशी पाहत असेल हे समजून घेता आला पाहिजे.

जेव्हा आपण एकांगी होऊन पाहतो तेव्हा त्यात बरेच पूर्वग्रह जोडले जातात. म्हणजेच काय तर आधी आपल्या आयुष्यात त्यासारखं काही झालं असेल किंवा आपण तस काही ऐकलं असेल तर त्याचा परिणाम या गोष्टींवर होतो. आपसूकच त्यातून बाकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष होत. आणि आपला त्रास वाढतो. म्हणून तटस्थपणे पाहायचं म्हणजे काय करायचं? तर ही घटना चांगली आहे का वाईट आहे हे न पहाता एक फॅक्ट म्हणून त्याकडे पाहायचं. हे झालं आहे हे अस आहे. बास.

मग त्याची कारण काय असतील? आपला त्याच्याशी कितपत आणि कसा संबंध आहे? आणि आता यातून मी कसा उपाय शोधू शकतो हे पहाणे. सर्वात महत्त्वाची गोष्ट जी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे जे काही घडत आहे; चांगल असुदे, वाईट असुदे ते फक्त माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. ते माझं पूर्ण आयुष्य नाही. इतकं जरी समजलं तरी बराच त्रास कमी होतो. कारण अंगदुखीहून निश्चितच हात दुखी आपण सहन करू शकतो आणि त्याला लवकर बर करू शकतो.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!