जसं आहे तसच राहुदेत हा स्वभाव बदलायला हवा!!!
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असावे समाधान हा तुकाराम महाराजांचा अभंग आपल्याला काय सांगतो तर आपण ज्या परिस्थितीत आहोत त्यात आपल्याला समाधानी राहता आलं पाहिजे. इतरांशी तुलना करून दुःखी होण्याचा काहींचा स्वभाव असतो. तस न करता आहे त्या परिस्थितीत आपण आनंदी, समाधानी रहावं. तुकाराम महाराजांनी दिलेला हा संदेश खरच बोध देणारा आहे. पण काही जण मात्र याचा उलट अर्थ घेतात.
आहे त्या परिस्थितीत आनंदी रहावे हे जरी खरं असलं तरी ती परिस्थितीत, आता असलेले आयुष्य आपण बदलुच नये, त्यासाठी काही प्रयत्नच करू नये असा त्याचा अर्थ होत नाही.
नेमके हेच अनेक जण करतात. आपल्याकडे जे आहे त्यात आनंदी राहायचं, पण आपल्याला जर अजून प्रगती करता येत असेल, आहे त्या परिस्थितीत बदल करण्याची संधी मिळत असेल, पुढे जाता येत असेल तर का जाऊ नये? पण ही लोक अस करत नाहीत. आपण काही करायला गेलो तर आपल्याला अपयश मिळेल आणि समजा यश मिळालं तर ते मिळालेलं यश, ती जबाबदारी आपण हाताळू शकत नाही, आपल्याला ती पेलवणार नाही अस कुठेतरी वाटत असत, ही चिंता मनात असते त्यामुळे या गोष्टी नाकारल्या जातात. हे यश नाकारलं जातं.
हा एक चालढकलपणाचा प्रकार आहे. ज्याला “fear of success procrastination” असं म्हटलं जातं. ज्यामध्ये व्यक्ती मिळू शकणार यश, ते पुढचं पद, ते काम आपण पेलवू शकत नाही अस वाटून ते कामच करायला घेत नाहीत. त्यांना माहीत असतं त्यात त्यांची प्रगती असते पण तरी ते नाकारतात आणि आहे तस राहणं पसंत करतात. त्यातून त्यांचं नुकसानच असत तरी पुढची चिंता करून ते स्वतःच नुकसान करून घेतात.
याची कारणं आपल्या बालपणात, त्यावेळी रुजवल्या गेलेल्या काही धारणांमध्ये आहे. आपल्याकडे काही म्हणी पण म्हटल्या जातात. अंथरूण पाहून पाय पसरावे ही त्यातलीच एक. लहान असताना पण अनेकदा मुल काही नवीन करायचा प्रयत्न करू लागलं की अनेक पालक त्यांना हटकतात. तुला काय जमणारे? तू कश्याला करायला जातो? आपली कुवत तेव्हढ करावं असं बोलून अप्रत्यक्ष रित्या याच गोष्टी रुजवल्या जातात की आपण नवीन काही करायचा प्रयत्न करू नये, किंवा केलं तरी आपल्याला जमणार नाही.
याच गोष्टी पुढे जाऊन आपल्याला कुठेतरी मागे खेचत राहतात. नोकरी मध्ये मिळत असलेलं प्रमोशन असुदे, किंवा समोरच्या माणसाने दिलेले एखादी जबाबदारी असुदे सर्व नाकारलं जात. कारण मला ते सर्व जमणार नाही. पण अस करताना आपण स्वतःचीच प्रगती खुंटवत असतो. आपली क्षमता काय आहे हे समजण्यासाठी सुद्धा नवीन काहीतरी करून पाहावं लागतच. जर प्रयत्नच केले नाहीत तर आपल्याला ते कसं कळणार?
आपल्याला आपल्या आयुष्यात जर खरच पुढे जायचं असेल तर समाधानी वृत्ती ठेवूनच अजून प्रगतीचे मार्ग निर्माण करावे लागतातच. त्यासाठी आपल्याला संधी येत असतात. पुढे जाऊन आपण पेलवू शकतो का नाही ही शंका मनात आणून त्या गोष्टी नाकरण हे आपल्याला कार्यक्षम ठेवत नाही. जर आपण नीट विचारपूर्वक निर्णय घेतले, वेळ प्रसंगी काम वाटून घेतली,आपलं बोलणं वागणं नीट असल तर नक्कीच आपल्याला ते यश, ती जबाबदारी पेलवता येईल आणि आपल्याला आपल्या परिस्थितीत अजून विकास करता येईल.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Khup chan aani motivational