Skip to content

इतरांशी करता तशी स्वतः शी पण मैत्री करता आली पाहिजे!!

इतरांशी करता तशी स्वतः शी पण मैत्री करता आली पाहिजे!!


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


आज ३०जुलै. आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस. त्यानिमित्त हे गाणं मनात आलं.

ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे
तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे..

अमिताभ आणि धर्मेंद्र यांचा गाजेलेला सिनेमा शोले आणि त्यातलच हे प्रसिद्ध अस गाणं जे अतूट, निस्सीम मैत्रीला दाखवून देत. म्हणूनच इतकी वर्ष होऊनही हे गाणं अजूनही सर्वांच्या आठवणीत आहे. तितकच लोकप्रिय आहे. गाण्यातील या दोन ओळीतून समजत की मैत्री, त्यातल हे नात माणसासाठी किती महत्त्वाचं आहे. आपण जीव देऊ शकतो पण आपल्या सख्याची साथ सोडणार नाही यातूनच समजत या नात्याची किती ताकत आहे.

मैत्री हे नातच अस आहे की जे माणसाला त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर उभारी देत. धीर देत. आणि हे अगदी प्राचीन काळापासून चालत आलेलं आहे. ज्यात आपल्याला कृष्ण आणि सुदाम्याची मैत्री दिसते, कृष्ण आणि अर्जुनाची मैत्री दिसते. कर्णाला माहीत होत की बऱ्याच ठिकाणी दुर्योधन चुकत होता तरी त्याने त्याला आपला मित्र मानलं होत आणि ते नात त्याने आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकवल. ही अशी आणि यासारखी अनेक मैत्रीची उदाहरण आतापर्यंत चालत आलेली आहेत. यावर अनेक सिनेमे होऊन गेलेले आहेत, पुस्तक लिहिली गेली आहेत.

काय असते मैत्री? कोणा एका व्यक्तीने याच खूप छान वर्णन केलंय. “मैत्री म्हणजे अस नात की जिथे कोणतं बंधन नाहीये, पण तरी सुटायची भीती नसते.” यात किती गहनता आहे पहा. कोणी कोणाला बांधून ठेवलेले नाही, इथे नात्यात असलेले कोणत चिन्ह नाही. पण तरीही आपण त्या व्यक्तीशी अदृश्य अश्या धाग्याने जोडले गेलो आहोत. खरी मैत्री असते तिथे आपल्याला माहीत आहे की मला हवं त्या क्षणी ती व्यक्ती माझ्यासाठी असणार आहे. हा विश्वास ज्यात आहे ती मैत्री आहे. याला रोज मेसेजचा, फोन कॉल्सचा पुरावा लागत नाही.

अगदी दहा वर्षांनी भेटून देखील आपल्या नात्यात कोणता फरक पडला नसेल ती मैत्री आहे. यात फक्त बोलण नाही तर त्याहून जास्त निपक्षपणे ऐकणं आहे. खरा मित्र आपल्याला चुकीच्या गोष्टी मध्ये साथ देणार नाही तर तिथे खरा खडसावून योग्य मार्गावर आणणार. आपलं हित ज्यात आहे ते करायला सांगणार.

मैत्री बद्दल बोलावं तेवढं कमी आहे कारण ही फक्त ऐकायची नाही तर अनुभवायची गोष्ट आहे. पण म्हणून आपण फक्त बाह्य जगाशीच मैत्री ठेवायची का? एखाद्या माणसाशी, निसर्गाशी, प्राण्याशी मैत्री इथपर्यंतच मर्यादित आहे का? या सर्व घटकांशी मैत्री असलीच पाहिजे. ती असणारच आहे. पण त्याहूनही जास्त महत्त्वाची, आपल्याला गरजेची आहे अशी मैत्री कोणाशी असली पाहिजे? तर ती स्वतःशी असली पाहिजे.

आपली अख्या जगाशी मैत्री आहे आणि स्वतःशी मात्र नाही तर याचा उपयोग काय? काय असते मैत्रीची ताकत? तर आधार, विश्वास, निरपेक्ष प्रेम, ऐकून घेण्याची, समजून घेण्याची वृत्ती, खूप साऱ्या गप्पा, मनातलं बोलणे, आनंदात दुःखात सहभागी होणे यासारख्या अनेक गोष्टी.

अस कितीवेळा होत की आपण स्वतःशी गप्पा मारतो, स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न करतो? खूप कमी वेळा. कारण आपल्याकडे तेव्हढा वेळच उरलेला नाही. आयुष्यात जरा काही चढ उतार आले की आपण खचतो, कोलमडतो. आपला स्वतः वरचा विश्वास डळमळीत होतो. अश्याच प्रसंगात कदाचित आपण आपल्या मित्राला धीर देऊ, आधार देऊ; पण तो आपल्याला स्वतःला द्यायला जमत नाही.

कारण आपण अजून स्वतःशी मैत्री केलेली नाही. मैत्रिमध्ये खूप साऱ्या गोष्टींचं सेलिब्रेशन केल जात, एकमेकांचा आनंद साजरा केला जातो. हा आनंद आपण स्वतः स्वतःसाठी किती वेळा साजरा करतो? विचार करण्याच्या गोष्टी आहेत. सच्चा मित्र आपल्या सोबत असतोच याच दुमत नाही. पण शेवटी आपण जेव्हा एकटे चालतो तेव्हा आपल्या सोबत कोण असत? तर आपली सावली.

याचा अर्थ असा आहे की शेवटी कोणी असो व नसो आपण आपल्या सोबत असणार आहोत आणि ही सोबत जर आपल्याला भक्कम करायची असेल, तर त्यासाठी आपल्या स्वतःसोबत मैत्री केली पाहिजे. आपल्याला स्वतःशी मोकळेपणाने बोलता आलं पाहिजे. मित्राजवळ जसं चूक झाल्यावर लगेच सांगितलं जात, शेअर केलं जातं तसच स्वतःशी देखील त्या कबूल करता आल्या पाहिजेत.

आणि जसा मित्र आपल्याला कोणत्याही प्रकारे जज न करता मार्ग दाखवेल तसच आपण स्वतः ला समजून घेऊन पुढे गेलं पाहिजे. आपल्याला स्वतः वर प्रेम करता आलं पाहिजे. इतरांसाठी आपल्याकडे खूप वेळ असतो, तसाच वेळ आपल्याला स्वतःसाठी काढला पाहिजे. स्वतःची साथ कधीही सोडणार नाही हा विश्वास आपण आपल्याला दिला पाहिजे.




आपल्या आयुष्याकडे एका त्रयस्थ, मैत्रीच्या नजरेने आपल्याला पाहता आलं पाहिजे, ती दृष्टी ठेवून वागल पाहिजे. ही अशी विश्वासावर आधारलेली, समजून घेणारी, भक्कमपणे पाठीशी उभी राहणारी, नॉन जजमेंटल मैत्री जर आपण स्वतःशी ठेवली तर आपल्याला आपल्या आयुष्यात अगदी कमी नाती असली किंवा एखाद्या वेळी आपल्या सोबत कोणी नसल तरी फरक पडणार नाही. आपण कोलमडणार नाही. उलट आपण त्यातून अजून स्ट्राँग होणार.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “इतरांशी करता तशी स्वतः शी पण मैत्री करता आली पाहिजे!!”

  1. सागर बैरागी

    नमस्कार मॅडम आपले लेख जगण्याची वाट दाखवतात तीमिरा कडून तेजा कडे खूप छान खूप आभारी

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!