इतरांना पटकन माफ करून पुढे चालणारी माणसं आयुष्याची भन्नाट उंची गाठतात.
मेराज बागवान
‘चूक’ प्रत्येक माणसाकडून होते.काही वेळेस आपण कोणाला तरी दुखवतो किंवा कोणीतरी आपल्याला दुखावते.मग काही जण चूक सुधारतात, समोरच्याची माफी मागतात.काही जण माफ करतात, तर काही जण अजिबात माफ करीत नाहीत आणि आयुष्यभर तीच गोष्ट धरून बसतात.पण अशी काही दुर्मिळ माणसे असतात , जी इतरांना पटकन माफ करून पुढे चालत राहतात.आणि खरे तर अशाच माणसांची गरज समाजाला आहे.
बरेचदा काय होते, कुणी कोणाला दुखावले की दुखावली गेलेली व्यक्ती तीच गोष्ट कायम मनात ठेवते.’मी त्याला अमूक एका गोष्टीसाठी आयुष्यभर माफ करणार नाही, जन्मभर ती गोष्ट मी विसरणार नाही आणि त्याला काहीही झालं तरी माफ करणार नाही’असे म्हणणारे अनेकजण आहेत.पण थोडा आपण विचार केला, आजूबाजूला पाहिले तर लक्षात येते, ‘इतरांना पटकन माफ करून पुढे चालणारी माणसं आयुष्याची भन्नाट उंची गाठतात.’
‘मानसी’ , एक उचचशिक्षित तरुणी.लग्न झाल्यानंतर मात्र ‘हाऊसवाईफ’ झालेली.सगळे सुरळीत चालू होते.मात्र अचानक, तिच्या नवऱ्याने सांगितले ,’माझे दुसऱ्या एका मुलीवर प्रेम आहे,आणि मला तिच्याशी लग्न करायचे आहे.मी तुझ्याशी मनाविरुद्ध घरातील मंडळींसाठी लग्न केले, पण मी आता तुझ्यासोबत राहू शकत नाही.’यानंतर त्या दोघांमध्ये अनेक बोलणी झाली.पण शेवट ‘घटस्फोटावरच’ आला.मानसी ह्या सगळ्यामुळे खूप दुखावली गेली होती.तिची ह्यात काहीच चूक नव्हती.लग्नाआधी तिच्या नवऱ्याने ह्या सर्व गोष्टी सांगितल्या असत्या तर सर्व अनर्थ टळले असते.पण आता हा सगळा विचार करून काहीच उपयोग नव्हता.
मानसी, आता तिच्या आई वडिलांकडे होती.ती चांगली शिकलेली होती.आणि हुषार देखील होती.तिचे आई वडील देखील सुशिक्षित होते.ह्या सगळ्यात त्यांनी आपल्या मुलीला खूप आधार दिला.आई वाडीलांच्या पाठिंब्यामुळे ती ह्या दुःखातून हळू हळू बाहेत पडू लागली.तिने विचार केला ,’जे झाले ते झाले.किंबहुना जे झाले ते चांगल्यासाठीच.नाहीतर आयुष्यभर माझी फसवणूक होत राहिली असती.ज्या माणसाचे माझ्यावर प्रेम नाही,ज्याला माझ्यासोबत राहण्यात काहीच रस नाही , अशा व्यक्तीबरोबर जबरदस्तीने राहण्यात काहीच अर्थ नाही आणि अशा व्यक्तीबरोबर सुखाचा संसार कसा होऊ शकतो.म्हणूनच मी आता त्याचा अजिबात विचार करणार नाही.’
आणि मग तिने नवऱ्याच्या संबंधित सर्व वस्तू नष्ट केल्या.कायदेशीररित्या तर सर्व संपले होते.पण तिने देखील त्याला एक प्रकारे माफ केले आणि संपूर्णपणे आयुष्यातून काढून टाकले.आणि पुढे जात राहिली.आज मानसी एका नामांकित कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहे. आणि एक यशस्वी आयुष्य जगत आहे.मानसी ह्या सगळ्यातून लवकर बाहेर पडली आणि तिने तिचे एक नवीन आयुष्य निर्माण केले. आणि त्यात ती खूप आनंदी आणि समाधानी आहे.
मानसी प्रमाणे वागायला, जगायला प्रत्येकाने शिकले पाहिजे.उगाच सुडाची भावना मनात ठेवून आपण आपला वेळ वाया घालवत असतो.आणि स्वतःला देखील आतून त्रास करून घेत असतो.माणूस विचार करीत असतो, मी त्याला माफ केले नाही तर त्याचे आयुष्य पण सुरळीत चालणार नाही.पण खरे तर तसे नसते.कोणत्या एका गोष्टीमुळे आयुष्य थांबत नाही.आयुष्यात इतर देखील अनेक गोष्टी असतात आणि त्या जगणे देखील खूप गरजेचे असते.
पण काही जण असा विचार करतात, ‘मला इतका त्रास झाला आणि मग मी त्याला सहजपणे कसे माफ करू’.पण असा विचार करणे म्हणजे त्या व्यक्तिकडे कायम लक्ष देणे होय.त्याऐवजी , कायमचे त्या व्यक्तीला विसरायचे असेल तर , त्याला सर्वप्रथम पटकन माफ करता आले पाहिजे आणि त्याकडे दुर्लक्ष करता आले पाहिजे.म्हणजेच काय तर त्या गोष्टीतून पटकन ‘डीट्याच’ होता आले पाहिजे.आणि पुढे चालत राहिले पाहिजे.
मान्य आहे, कोणा एका व्यक्तीच्या चुकीमुळे , किंवा आपण दुखावले गेल्यामुळे खूप मानसिक आघात होतात.मन कशातच रमेनासे होते.कोणी व्यक्ती आपल्याला साथ देत नाही किंवा सोडून निघून जाते. गरज असताना माणसे आपली मदत करीत नाहीत.कोणीतरी मुद्दाम त्रास देते, अन्याय , अत्याचार करते.आयुष्यात काही जणांकडून आपल्याला फक्त अश्रू आणि धोकेच मिळतात.आपण जिच्यावर विश्वास ठेवतो तीच व्यक्ती आपला घात करते.
आपण मात्र त्या व्यक्तीला खूप जवळचे मानत असतो, तिची नेहमी साथ देत असतो.आणि म्हणूनच आपण त्या व्यक्तीला लवकर ‘डीट्याच’ करू शकत नाही. आणि ह्या उलट ती व्यक्ती आपल्याबरोबर वागत असते.पण ह्यामुळे आपण आपलेच नुकसान करीत असतो.लवकर ह्यातून बाहेर न पडल्यामुळे आयुष्य पुढे सरकत नाही आणि एके ठिकाणी ‘स्टक’ होऊन जाते.
तुम्ही जर का पटकन मनातून त्या व्यक्तीला माफ केले आणि त्याला कायमचे तुमच्या आयुष्यातून हद्दपार केले तर तुम्ही अनेक नवीन गोष्टी पटकन करू शकतात आणि त्या गोष्टीच तुम्हाला आयुष्याची भन्नाट उंची गाठायला मदत करतात.तुम्ही नवीन एखादी नोकरी करू शकतात, पुढील शिक्षण घेऊ शकतात, एखादा व्यवसाय करू शकतात.काही सामाजिक उपक्रम किंवा समाजसेवा देखील करू शकतात.लहान मुले किंवा ज्येष्ठ व्यक्तींसाठी काही चांगल्या गोष्टी करता येऊ शकतात. जे काही अडचणीत आहेत , ज्यांना गरज आहे अशांसाठी देखील तुम्ही काही तरी चांगले नक्की करू शकतात.ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही जुन्या गोष्टी लवकर विसरायला लागाल आणि मन एक प्रकारे गुंतून राहील.अन्यथा ‘रिकामे डोके शैतानाचे घर बनून राहील’.
अगदी मोठ्याच चूका असे नाही.पण काही जण अगदी छोट्या चुका देखील मनात घेऊन बसतात.आणि माफ करीत नाहीत.कोणी मला असे बोलले, कोणी मला टोचून बोलले, अपमान केला ह्या गोष्टी देखील लक्षात ठेवतात.पण ह्याने त्या माणसालाच जास्त त्रास होत असतो.सतत कोणी आपल्याशी वाईट वागले हे आठवून आठवून मला अस्वस्थ राहते. आणि त्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडते.म्हणूनच, सोडून द्यायला शिकले पाहिजे.एकच गोष्ट धरून राहिलात तर आयुष्य जगणे मुश्किल होईल.डोक्यात सतत नकारात्मक विचारच राहतील.म्हणूनच इतरांना पटकन माफ करायला शिकले पाहिजे.ह्यात तुमचाच फायदा आहे.
जी माणसे इतरांना पटकन माफ करून पुढे जातात , त्यांना मागच्या गोष्टींसाठी वेळ नसतो आणि त्यामुळेच आयुष्याची एक एक शिखरे ती मिळवू लागतात. अनेक यशस्वी व्यक्तींच्या आयुष्यात खूप मोठे दुःख असते. पण ते त्या दुःखाला भांडवल न बनवता, ताकद बनवतात आणि पुढे पुढे जात राहतात.नवीन गोष्टींचा ध्यास घेतात.दुःखच त्यांना त्यांच्या आयुष्याचा नवीन मार्ग दाखविते.आयुष्यात मिळालेल्या धोक्यांमुळे ही माणसे, इतरांना पहिल्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे ओळखू लागतात.समजुतदारपणा , तसेच व्यवहारिकपणा अशा व्यक्तींमध्ये इतरांपेक्षा जास्त येतो.
प्रत्येक व्यक्तीला आपल्या चुकीची शिक्षा कोणत्या ना कोणत्या रुपात मिळत असते. निसर्ग, विधाता , परमेश्वर सर्व पाहत असतो.त्याला प्रत्येकाची काळजी असते.तो सर्व हिशोब ठेवत असतो.आणि योग्य वेळी जे जे गरजेचे आहे ते ते घडवून आणत असतो.त्यामुळे आपण जास्त अशा गोष्टींचा विचार करून काहीच उपयोग नसतो.म्हणून सर्व त्या विधात्यावर सोपवून पटकन पुढे जात राहिले पाहिजे.
आणि म्हणूनच पटकन माफ करायला शिकले पाहिजे.पण विश्वास कोणावर ठेवावा हे देखील आत्मसात करता आले पाहिजे.जे फक्त स्वतःच्या आयुष्यात डोकावतात ते खूप पुढे जातात आणि जे सतत इतरांच्या आयुष्यात डोकावतात ते कायम आहे तिथेच राहतात.म्हणूनच किती जरी दुःख आले तरी त्यातून लवकर ‘रिकव्हर’ होता आले पाहिजे .कारण आयुष्यात एकच दुःख नसते, एक झाले की दुसरे हजर असते.-+

भन्नाट लेख खूप खूप धन्यवाद मन कपसासारखे हलके झाले move on व्हायला मदत मिळेल thankyou so much
खूप सुंदर
खूप छान
खूपच छान