घेतलेले निर्णय चुकले असतील तर सुधारायचे कसे??
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
कोणतीही गोष्ट करताना निर्णय घ्यावेच लागतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टी करतानाही आपण निर्णय घेत असतो. आपल्या मनात काहीतरी आले आणि आपण क्षणार्धात करून टाकलं अस क्वचित होत.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला निर्णय घ्यावे लागतात. मग ते शाळा कोणती निवडायची इथ, लग्न, कोणता व्यवसाय करायचा, घर कसं बनवायचं आणि अगदी हॉटेलमध्ये गेल्यावर कोणती डिश ऑर्डर करायची. सगळीकडे निर्णय घेणे अपरिहार्य आहे.
पण अनेकदा आपण घेतलेले निर्णय चुकतात. आपण ठरवतो एक आणि दुसरं काहीतरी. दहावी बारावी नंतर करियर म्हणून जे एखादं क्षेत्र निवडल जात त्यावेळी ते बरोबर वाटत असते पण काही काळ गेला की अस वाटत आपलं निर्णय चुकला. फक्त करिअर नव्हे तर अनेक गोष्टी मध्ये हे होतं.
आपले निर्णय चुकतात. आता हे निर्णय चुकले पण मग ते सुधारायचे कसे? अशी चूक पुन्हा होऊ नये यासाठी कशी काळजी घ्यायची? तर त्यासाठी आधी निर्णय चुकला कशामुळे हे समजून घेऊन त्यावर शांततेने विचार करणे गरजेचे आहे. त्यावेळी बरोबर वाटलेला निर्णय आत्ता चुकत असेल तर यामागे काय कारण असू शकतात? काय केलेलं असू शकत याचा आढावा घ्यायला हवा. जर कारण नीट समजली तर चुकलेला निर्णय सुधारता येईल पुन्हा त्या गोष्टीशी पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेतली जाईल.
निर्णय घेणे ही समस्या सोडवण्यामधील एक पायरी आहे. तसंच हे एक जीवन कौशल्य देखील आहे. यामध्ये समस्या म्हणजे त्या गोष्टीचा स्वरूप समजून घेऊन त्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत याचा विचार केला जातो व त्यातील एक पर्याय निवडला जातो. असे करताना काही गोष्टींचा विचार करावा लागतो.
ते म्हणजे आपण पर्याय निवडता अाहोत तो ही समस्या किंवा गोष्ट नीट करायला मदत करणारे का? आणि मदत केली तरी ती आता पुरती नसून दीर्घकालीन फायद्याची असू शकते का? आजूबाजूची परिस्थिती माझ्या निर्णयाला पूरक आहे का? सर्वात महत्त्वाचा स्व जाणीव.
माझी बलस्थाने ज्यात अगदी कोणतीही गोष्ट असू शकते जी माझ्या जमेची बाजू असेल. मग तो पैसा असू शकतो, परिस्थिती असू शकते, माझ्या क्षमता असू शकतात, आवडी निवडी, स्वभाव, नातेसंबंध अगदी काहीही अश्या गोष्टी ज्यांचा मला फायदा होऊ शकतो. फक्त बलस्थाने नाही तर आपल्याला आपल्या कमकुवत बाजू म्हणजेच एखाद्या प्रसंगात मी कसा वागतो ज्यामुळे माझ नुकसान होत, माझ्याकडे आता कशाची कमी आहे ज्यातून अडथळे होऊ शकतात तसेच या दोन गोष्टी तून भविष्यात मिळणाऱ्या संधी आणि होऊ शकणारे धोके हे ही माहिती पाहिजेत. याला स्व जाणीव असणे म्हणतात.
या सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घ्यावा लागतो आणि इतका करूनच निर्णय चुकत असेल तर त्याला काही बाह्य घटकही कारणीभूत असू शकतात हे आपल्या नियंत्रणात नाहीत. जसे की आताच lockdown. अनेक प्रोजेक्ट नीट प्लॅन करून अंमलात आणायचे म्हटले तरी लॉकडाऊन पडलं तर पुढे जातात. यातून नुकसानही होत. अश्या वेळी निर्णय चुकला अस वाटू शकत.
तर ही काही निर्णय चुकण्याची कारण असू शकतात जी सुधारली पाहिजेत. बरेचदा निर्णय तात्पुरत्या समाधानासाठी किंवा तात्पुरत्या समस्या सोडवण्यासाठी घेतले जातात. दुसऱ्यांच्या प्रभावाखाली घेतले जातात. ऍडमिशन घेताना पण अस दिसून येत की मित्र मैत्रीण अमुक एक क्षेत्र निवडतो म्हणून निवडलं जात.
म्हणून जर निर्णय सुधारायचे असतील तरी या गोष्टी सुधारल्या पाहिजेत. पण त्याआधी आधी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे कोणताही निर्णय अंतिम असत नाही. बऱ्याचदा चुकू शकतो, बऱ्याचदा तो बदलावा लागू शकतो. आपण किती विचार करून, काळजी घेऊन घेतला असला तरी चुकू शकतो. काहीतरी मागे पुढे होऊ शकत.
अनेक जण निर्णय चुकल्यावर अपराधी वाटून घेतात, निराश हताश होतात. तसं न करता आणि त्या चुका झाल्या असतील त्यांना समजून घेऊ सुधारायचा प्रयत्न करा. कारण निर्णय हा कायमस्वरूपी असत नाही. प्रत्येक टप्प्यावर बदलत रहावा लागतो. बाहेर खायला गेल्यावर मला हवं तस खाणं मिळालंच नाही म्हणून उपाशी राहण्याला अर्थ नाही. तिथे वेगळं काहीतरी ट्राय करून पाहण्यात शहाणपण आहे.
म्हणून निर्णय बदलण्याची लवचिकता आपल्याच पाहिजे. एकदा मी निर्णय घेतला आणि हाच अंतिम यातून काही होणार नाही असा विचार केला तर निर्णय सुधारता येत नाही. म्हणून निर्णय सुधारायला आपला अपराधीपणा आधी कमी केला पाहिजे, नवीन निर्णय घेण्याची लवचिकता पाहिजे, स्वतःला एक संधी दिली पाहिजे आणि वर म्हटल्याप्रमाणे स्व जाणीव, निर्णयाचे दीर्घकालीन परिणाम यांचा विचार केला पाहिजे. त्यानुसार अँक्शन घेतली पाहिजे. नक्कीच आपल्या निर्णयात सुधारणा होऊ शकते.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

अप्रतिम nice
नवीन शिकायला मिळाले