Skip to content

स्वतःला सावरण्याची ही अनोखी मानसशास्त्रीय पद्धत शिकून घ्या.

आयुष्यात प्रत्येक वेळी आपल्याला हवं तसं घडतंच असं नाही. कधी जवळची माणसं दुखावतात, कधी अपेक्षाभंग होतो, कधी अपयश येतं, तर कधी कोणतंही स्पष्ट कारण नसताना मन अस्वस्थ होतं. अशा वेळी आपण अनेकदा परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो. पण परिस्थिती आपल्या हातात नसेल तर काय करायचं? अशा वेळी स्वतःला सावरण्याची कला शिकणं खूप महत्त्वाचं असतं.

मानसशास्त्रात स्वतःला सावरण्याच्या या प्रक्रियेला Emotional Regulation (भावनांचे नियमन) असं म्हणतात.

१. स्वतःच्या भावनांना ओळखायला शिका.

मन दुखावलं असेल तर स्वतःला जबरदस्तीने आनंदी दाखवू नका. राग आला असेल तर तो नाकारू नका. भीती वाटत असेल तर स्वतःला कमजोर समजू नका.

सर्वप्रथम स्वतःला विचारा, मला नेमकं काय वाटत आहे? मी दुःखी आहे, अस्वस्थ आहे की निराश आहे?

भावनांना योग्य नाव दिल्यामुळे त्या समजून घेणं सोपं होतं. याला मानसशास्त्रात Affect Labeling असं म्हणतात.

२. प्रत्येक विचाराला सत्य समजू नका.

एखाद्या व्यक्तीने आपल्याशी नीट बोललं नाही की लगेच आपल्या मनात विचार येतो, माझी किंमतच नाही. एखादं काम अपयशी झालं की वाटतं, मला काहीच जमणार नाही.

पण लक्षात ठेवा, प्रत्येक विचार सत्य नसतो. विचार ही आपल्या मनाने तयार केलेली एक शक्यता असते.

मानसशास्त्रातील Cognitive Behavioral Therapy (CBT) या उपचारपद्धतीत विचार, भावना आणि वर्तन यांचा एकमेकांशी संबंध स्पष्ट केला जातो. त्यामुळे नकारात्मक विचार तपासून पाहायला शिका. स्वतःला विचारा, माझ्या विचाराला काही ठोस पुरावा आहे का?

३. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं थांबवा.

कोणी काही बोललं की लगेच उत्तर देणं, प्रत्येक आरोपाचं स्पष्टीकरण देणं किंवा प्रत्येक गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणं आवश्यक नसतं.

कधी कधी शांत राहणं हीसुद्धा स्वतःची काळजी घेण्याची पद्धत असते.

एखादी घटना घडल्यानंतर प्रतिक्रिया देण्यापूर्वी काही क्षण थांबा. हळूवार श्वास घ्या आणि मग विचारपूर्वक निर्णय घ्या.

यामुळे भावनेच्या भरात चुकीचं वागण्याची शक्यता कमी होते.

४. जे आपल्या नियंत्रणात नाही ते स्वीकारा.

आपण दुसऱ्यांचे विचार बदलू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती आपल्याशी चांगलीच वागेल याची खात्री देऊ शकत नाही. भूतकाळात घडलेल्या घटना बदलू शकत नाही.

मात्र आपण आज कसा विचार करायचा, कसं वागायचं आणि पुढे काय करायचं हे ठरवू शकतो.

मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट एलिस यांच्या Rational Emotive Behavior Therapy (REBT) या सिद्धांतानुसार एखादी घटना नव्हे, तर त्या घटनेबद्दल आपण केलेला विचार आपल्या भावनिक प्रतिक्रियेवर प्रभाव टाकतो.

म्हणून परिस्थिती स्वीकारा, पण स्वतःला असहाय्य समजू नका.

५. स्वतःशी सकारात्मक संवाद साधा.

जेव्हा तुम्ही अडचणीत असता तेव्हा स्वतःशी कसं बोलता, हे खूप महत्त्वाचं असतं.

‘माझं आयुष्यच खराब आहे’, ‘माझ्याकडून काहीच होणार नाही’ असे विचार करण्याऐवजी स्वतःला सांगा,

‘सध्या परिस्थिती कठीण आहे, पण मी हळूहळू यातून बाहेर पडू शकतो.’

‘माझ्याकडून चुका झाल्या असतील, पण मी त्यातून शिकू शकतो.’

स्वतःशी असा संवाद साधल्यामुळे आत्मविश्वास टिकवून ठेवण्यास मदत होते.

६. स्वतःला सावरण्यासाठी थोडा वेळ द्या.

मनाला प्रत्येक गोष्टीतून लगेच बाहेर पडता येत नाही. काही अनुभव विसरण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे स्वतःवर आनंदी राहण्याची जबरदस्ती करू नका.

पुरेशी झोप घ्या, आवडत्या गोष्टी करा, थोडं चालायला जा, मनातल्या भावना लिहून काढा आणि गरज वाटल्यास विश्वासू व्यक्तीशी बोला.

स्वतःला वेळ देणं म्हणजे कमकुवतपणा नाही, तर स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं आहे.

स्वतःला सावरणं म्हणजे आयुष्यात दुःख येऊच न देणं नाही, तर दुःख आल्यानंतर स्वतःला हरवू न देणं होय.

प्रत्येक वेळी परिस्थिती आपल्या बाजूने असेलच असं नाही. काही माणसं बदलणार नाहीत, काही घटना आपल्या मनासारख्या घडणार नाहीत. पण या सगळ्याचा परिणाम आपल्या संपूर्ण आयुष्यावर होऊ द्यायचा की नाही, हे ठरवण्याची ताकद आपण स्वतःमध्ये निर्माण करू शकतो.

कारण आयुष्यात प्रत्येक वेळी कोणीतरी आपल्याला सावरायला येईलच असं नाही. त्यामुळे स्वतःचा आधार स्वतः बनायला शिका.

धन्यवाद.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयु‌ष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”


सर्व लेख व्हिडिओच्या रूपात पहा.

👉🏽 क्लिक करा 👈🏽

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!