“कधी कधी अपेक्षित नव्हे तर अनपेक्षित व्यक्ती सुद्धा मदतीसाठी पुढे येतात.”
मधुश्री देशपांडे गानू
“हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे..
माणसाने माणसाशी माणसासम वागणे..”
ही प्रार्थना आपण अनेक वेळा ऐकली असेल. वेळ प्रसंगी आपण एकमेकांच्या मदतीला धावून जायला हवे, हीच खरी माणुसकी. अडचणीत सापडलेल्या, कठीण प्रसंगी ओळखीच्या आणि अनोळखी व्यक्तीला ही योग्य वेळी योग्य ती मदत करणे म्हणजेच माणूसधर्म. प्रत्येकाला कधी ना कधी या अनपेक्षित मदतीचा हात मिळालेला असतोच. पण आपणही असा अनपेक्षित मदतीचा हात कोणाला दिला आहे का?? याचाही विचार प्रत्येकाने करायला हवांय.
प्रत्येक व्यक्तीचं स्वतःच्या आवडीच्या माणसांचे एक वर्तुळ असतं. मग त्यात कुटुंब, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, सहयोगी असे अनेक असतात. बहुतेक वेळा आपल्याला माणसांची गरज असताना कुटुंब, नातेवाईक कितीही जवळचे, प्रेमाचे असले तरीही लांब असतात. त्यामुळे आपल्या आजूबाजूला असणारी अगदी तोंडओळख असणारी किंवा अनोळखी व्यक्तीच आपल्या मदतीला धावून येतात. आणि आपण तो कठीण प्रसंग निभावून नेतो.
मदत करणारा मदत करून विसरूनही जातो. पण आपण मात्र आयुष्यभर त्या कठीण प्रसंगात वेळेला मिळालेली मदत लक्षात ठेवतो. नव्हे ठेवायलाच हवी. कित्येकदा आपल्याला ती व्यक्ती ओळखतही नसते. नाव गाव काही माहीत नसतं. पण एक मात्र खरं अशी नेमक्या क्षणी मिळालेली मदत कधीही विसरायची नाही. या मदतीसाठी नेहमीच प्रत्येक माणसाने आयुष्यभर कृतज्ञ राहायला हवं.
कित्येक नैसर्गिक आपत्ती, पूर, दरड कोसळणे, वादळ, मानवनिर्मित आपत्ती, बॉम्बस्फोट, अपघात अशावेळी अगणित, अनामिक मदत करणारे हात पुढे येतात. ज्यांची कधीही साधी नोंदही होत नाही. तरीही अशा अनपेक्षित मदतीचं महत्त्व अबाधित असतंच.
कित्येक वेळा आपण एखाद्या चिंतेने, ताणाने ग्रस्त असतो. खूप विचार करूनही मार्ग सापडत नाही. घरच्यांशी, नातलगांशी त्यावर बोलणे उचित वाटत नाही. या मंडळींकडून मदत अपेक्षित असते, पण ती मिळेलच ही खात्री वाटत नाही. कोणतेही जजमेंट न देता घरचे आपल्याला समजून घेतील असा विश्वास नाही वाटत. अशावेळी एखादा मित्र/ मैत्रीण यांच्याशी बोलून आपण ताणमुक्त होऊ शकतो. कोणतेही पूर्वग्रहदूषित मत व्यक्त न करता एखादा मित्र, मैत्रीण आपल्याला समजून घेऊ शकते. वेगळ्या, त्रयस्थ दृष्टिकोनातून आपली समस्या तिला जाणवू शकते. त्यावर योग्य मार्ग ती सुचवू शकते. म्हणून तर आज समुपदेशकांची गरज सर्वात जास्त आहे.
माझाच अनुभव सांगते. माझ्या आयुष्यात अत्यंत कठीण अशा प्रसंगाला सामोरे जात असतानाच, एका उदास सायंकाळी एक प्रौढ स्त्री माझ्याकडे आली. तिची माझी फक्त तोंडओळख होती. तिला माझ्याविषयी काय विश्वास वाटला मला माहित नाही. पण तिला माझ्याशी बोलायचं होतं. तिला जगायची अजिबात इच्छा नव्हती. “मला आत्महत्या करावीशी वाटते”, असं तिने मला सांगितलं. तेंव्हा मी माझ्या परीने तिला खूप समजावलं. मी स्वतःच अस्वस्थ मनस्थितीतून जात असतानाही मला जेवढं शक्य होईल तेवढे तिला समजून घेतलं. कोणतंही मत प्रदर्शित न करता तिला जगणं कसं महत्त्वाचं आहे हे सांगितलं. कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करायची नाही, हे तिला ठणकावून सांगितलं. माझं म्हणणं मात्र तिने मनापासून ऐकलं. त्यानंतर नव्या उमेदीने ती जगायला लागली. तिच्या कुटुंबातच जो आनंद तिला मिळत नव्हता, तो आता मिळाला. या घटनेला चार वर्षे होऊन गेली. आता ती स्त्री जेंव्हा मला भेटते तेंव्हा मला कडकडून मिठी मारते. आणि म्हणते,” तुमच्यामुळे आज मला हा आनंद दिसतोयं. तुमच्यामुळे मी आनंदाने जगते आहे.” खरं तर तिची माझी काहीच ओळख नव्हती. तिला माझ्याबद्दल कृतज्ञ वाटणं साहजिकच आहे. पण तिला पाहून मला मिळणारं समाधान काही औरच आहे.
कोणताही प्रश्न, समस्या बोलून सुटतात. म्हणून मी नेहमी सांगते की आयुष्यात एक तरी अशी व्यक्ती कमवा जिला तुम्हीं तुमच्या मनातलं सगळं अगदी सगळं सांगू शकता. जी तुमचं नीट ऐकून घेईल. तुमच्यावर दोषारोप न करता तुम्हांला योग्य मार्ग दाखवेल. निदान तुमच्या मनावरील ताण तरी बोलण्याने निवळेल. काही वेळा आपल्याच प्रेमाच्या माणसांना, कुटुंबातील सदस्यांना सगळ्या गोष्टी सांगणं शक्य नसतं. अशा वेळी एक असा सुहृद नक्की हवा.
माणूस म्हटलं की नाती आली, नाती आली की अपेक्षाही आल्याच. प्रत्येक नात्याची त्याची त्याची गरज, महत्त्व, अपेक्षा असतातच. पण खूपदा अपेक्षित नात्यांकडूनच आपल्याला हवी ती मदत मिळत नाही. नातं रक्ताचं असो नाहीतर मैत्रीचं दरवेळी मदत मिळेलच असं नाही. आपल्या अपेक्षा पूर्ण होतीलच असं नाही. अशावेळी एखादा अनपेक्षित सहज मदत करून जातो.
परमेश्वर कोणालाही दिसत नाही. पण अशा मदत करण्यार्याच्या रूपात प्रत्येकाला परमेश्वर भेटतोच. तुम्हींही असंच कोणासाठी तरी त्याचे परमेश्वर होऊ शकता. फक्त तुमचं मन जागृत हवं. मदतीची इच्छा हवी. या समाजाचे आपण देणं लागतो. आणि माणुसकी जपणं सगळ्यात महत्त्वाचं. “माणसाने माणसाशी माणसासम वागणे” हा मंत्र नेहमी ध्यानात ठेवा. आणि मदतीसाठी तत्पर राहा..
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

खूप छान विचार आहे
खूपच छान लेख 👌👌
Wonderful article Vasudha! Very true!