हे कसे ओळखावे कि खोट्या कल्पना मनात ठेवून आपण आयुष्य जगतोय..
हर्षदा पिंपळे
कल्पना,कल्पना ही एक मानसिक स्वरूपाची प्रक्रिया आहे.माणूस कोणत्याही गोष्टीची कल्पना करू शकतो.भूतकाळ किंवा अगदी भविष्याची देखील मनुष्य कल्पना करतो.तसेच ज्या गोष्टी अस्तित्वात देखील नाहीत त्याचीही मनुष्य कल्पना करू शकतो.कल्पनांमध्ये रमला नाही असा एकही मनुष्य या पृथ्वीवर सापडणार नाही.माणूस त्याचं कितीतरी आयुष्य हे कल्पनांमध्ये घालवतो. माणसाला कल्पनाविश्व बहुधा जरा जास्तच आवडत असावं.
खरं तर कल्पना म्हणजे कित्येकांच्या आवडीचा विषय.प्रत्येक व्यक्तीकडे एक कल्पनाशक्ती नक्कीच असते.आणि त्या कल्पनाशक्तीच्या जोरावर ती व्यक्ती कोणतीही गोष्ट करायला मागे पुढे पाहत नाही.इतकच नाही तर एखादा मनुष्य कल्पनाशक्तीच्या जोरावर आयुष्य जगत असतो. तसेच कल्पनेला मानवाच्या आयुष्यात अनन्यसाधारण असं महत्त्व आहे.एखाद्या नवनिर्मितीसाठी कल्पनेच वेड असणं आवश्यक आहे.यात खरं तर वाईट असं काहीच नाही.
पण एखादा मनुष्य मनामध्ये कशा प्रकारच्या कल्पना घेऊन जगतो ते बघणं फार महत्त्वाच असतं.कारण कधी कधी काही कल्पनांना जन्मच नसतो.त्या कल्पना कधी आपल्या अंतरंगातून बाहेरच पडत नाही. अनेकदा मग त्या कल्पनांना काही अर्थही उरत नाही.कितीतरी खोट्या कल्पना घेऊन एखादा मनुष्य जगत असतो.कधी कधी तर मनुष्य केवळ कल्पनांचे इमले बांधण्यात इतका रमून जातो की त्या कल्पना किती खऱ्या आणि किती खोट्या आहेत याचं त्याला काही भानच राहत नाही.
मनातील खोट्या कल्पना तर कधी कधी ओळखणं सहज शक्य होत नाही.तर असं खोट्या कल्पना मनात ठेवून आपण आयुष्य जगतोय हे कसं ओळखायच ते आपण पाहूयात—-
सर्वात आधी कल्पनेची संकल्पना नीट समजून घ्या. आपल्या मनातील कल्पनांचा एकदा खोलात जाऊन विचार करा.आपण कशा प्रकारच्या कल्पना आखतो त्याचा एकदा अंदाज घ्या.आपल्या कल्पनांना खरच काही अर्थ आहे का..? हे सुद्धा एकदा तपासून पहा.
आपल्या कल्पना किती वास्तविक आहेत?किती भ्रामक आहेत?याचा देखील अंदाज घ्या.
आपल्या मनातील/डोक्यातील कल्पनांची एक यादी करून घ्या. आपल्या कल्पना कोणकोणत्या आहेत हे लक्षात येईल.
आपल्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण काहीच धडपड करत नसू तर समजून जावं या कल्पनांना काहीही अर्थ नाही. या कल्पना केवळ खोट्या कल्पना आहेत.या कल्पना कधीच प्रत्यक्षात उतरणार नाहीत.यांना मनात ठेवून आयुष्य जगण्यात काहीच अर्थ नाही.
कारण एखाद्या गोष्टीची कल्पना करून त्यासाठी प्रयत्न करणं वेगळं आणि नुसत्या कल्पना मनात ठेवून वावरणं वेगळं. तसेच आपण एखाद्या गोष्टीविषयी आपण सहज चंग बांधत असतो.थोडक्यात एखाद्या गोष्टीची कल्पना करत असतो वा अंदाज बांधत असतो.
उदा.
ते पुस्तक खूप सुंदर असेल.त्याचं मुखपृष्ठ तर कमालीचच असणार आहे.आणि नाव मृगजळ म्हंटल्यावर तर पुस्तकात नक्कीच काहीतरी असणार यात शंका नाही.
ती नं…ती तर भारीच असेल. तिच्याइतकं सुंदर सुबक काही नसेलच.आणि तिच्याइतकं सुंदर काही असूच शकत नाही. पण प्रत्यक्षात तसं काही असतच असं नाही. आपण आधीच अशा कल्पनांमध्ये रमून जातो.मग त्या खोट्या असल्या तरी आपल्याला फरक पडत नाही.आणि आपण त्याच कल्पना घेऊन जगत राहतो.
कुणीतरी आपल्याला भेटायला येईल.आपण छान गप्पा मारू. इथे जाऊ तिथे जाऊ.नव्या आठवणी निर्माण करू.तो आज मला हे घेऊन येईल.वगैरे वगैरे या कल्पना आपण रंगवत असतो.पण प्रत्यक्षात तसं काही नसतं.हे आपल्या मनाचे खेळ असतात.कल्पनांच स्वरूप जेव्हा वास्तविक नसतं नं तेव्हा मात्र समजून जावं हे खोट्या कल्पनांच विश्व आहे.
थोडक्यात काय तर ,जोपर्यंत कल्पनांना वास्तविक रूप मिळत नाही तोपर्यंत त्या कल्पना खोट्या असतात. आणि त्या कल्पना घेऊन आपण जगामध्ये फिरत असतो. एकतर या कल्पना खोट्या आहेत हे मान्य करायला हवं किंवा कल्पनांना वास्तव रूप मिळवून देण्यासाठी आपणच धडपड करायला हवी.
तुम्हीही जर अशा काल्पनिक जगात केवळ रममाण होत असाल तर स्वतःला, स्वतःच्या खोट्या कल्पनांना ओळखायला शिका.कल्पनाविश्वात रमणं वाईट नसलं तरी फार काळ कल्पनांमध्येच रमणं चांगलं नाही.काही कल्पना या कल्पनाच असतात. आणि जोपर्यंत त्यांना वास्तव रूप मिळत नाही तोपर्यंत त्या खोट्याच असतात.त्यांना फारसा अर्थ नसतो याची जाणीव स्वतःला करून द्या.
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

खूप छान!