न हरवलेली वस्तू जेव्हा सापडत नाही, तेव्हा जास्त मानसिक गोंधळ उडतो.”
मधुश्री देशपांडे गानू
“दिल ढूंढता है…
फिर वही फुरसत के रात दिन…”
गुलजारजी यांनी लिहिलेलं कमाल गाणं आहे हे… आपल्या रोजच्या वेगवान धकाधकीच्या जीवनात आपण विसाव्याचे निवांत क्षण शोधत असतो. खरं तर ते आपल्यापाशीच असतात. पण आपल्याला ते सापडतच नाहीत. कारण आपण स्वतः एका यंत्राप्रमाणे दिवस-रात्र चालत असतो. जीवघेणी स्पर्धा, महागाई, स्टेटस, दिखाऊपणा,
टिकून राहण्याचा अट्टाहास अशा अनेक कारणांमुळे आपण स्वतःलाच हे विसाव्याचे क्षण देऊ शकत नाही. आणि मग आपला गोंधळ होतो. या चक्रात अडकल्यावर दुसरा पर्याय दिसत नाही. चिडचिड, अकारण चिंता, निद्रानाश, अनेक शारीरिक मानसिक आजार असे परिणाम दिसू लागतात.
आपलं घर प्रत्येकालाच प्रिय असतं. जिथे आपण हक्काने आपल्या कुटुंबासोबत राहतो. जिथे आपल्याला सुरक्षित वाटतं. हेच घर आपण सातत्याने आवरतो, सजवतो, नीटनेटकं ठेवतो. पण खूपदा आपणच आवरताना अगदी वेळेत मिळावी म्हणून ठेवलेली एखादी वस्तू आपल्याला ऐन वेळी सापडत नाही. ती हरवलेली नसतेच. आपणच डाव्या उजव्या हाताने कुठेतरी ठेवलेली असते. पण मिळेनाशी झाली की आपला जास्त गोंधळ उडतो. खूप शोधाशोध करतो. खरं तर बऱ्याचदा ती वस्तू समोर असते. पण आपण इतके गोंधळून गेलेलो असतो की आपल्या दृष्टीस पडत नाही. हे तर झालं वस्तूंचं… अगदी रुमाल, किल्ली, एखादा चमचाही नाही मिळाला तर आपली किती घालमेल होते ना! मग अशी न हरवलेली नाती दिसेनाशी होतात, सापडेनाशी होतात, तेव्हा तर किती घालमेल होत असेल जीवाची!
जीवन चक्र गतिमान आहे. काळाला कोणीही थांबवू शकत नाही. बदलत्या काळाप्रमाणे, गरजेप्रमाणे, प्राधान्याने माणसांची नातीही बदलत असतात. आज जे जवळचे, प्रेमाचे आपले आहेत ते उद्या अगदी अनोळखी होऊन जातात. नवीन माणसं जोडली जातात. माणसाच्या स्वार्थी, अप्पलपोटेपणा, अहंकार, राग, मत्सर अशा अनेक नकारात्मक भावनांमुळे आपली हक्काची, रक्ताची नाती तुटतात. ती हरवत नाहीतच. ती आपल्या आसपास असतात. पण आपल्या विचारांमध्ये, कृतींमध्ये मात्र ती सापडत नाहीत. प्रेमाचा, भावनांचा, आपुलकीचा ओलावा उरत नाही.
उदाहरणार्थ, लग्न होऊन सासरी गेलेली मुलगी सासरी नव्याने नाती जोडते. पण तिने जर माहेरची नाती कायमची तोडली तर! जन्मदाते आई-वडील, बहिण-भाऊ, नातलग या सगळ्यांपासून ती कायमची दूर गेली तर? जुने संबंध तिने संपुष्टात आणले तर. अशा खऱ्या घटना घडलेल्या आहेत. जेव्हा आपण नवीन संबंध जोडतो तेव्हा जुने संबंध कायमचे तोडून टाकतो का?? नाही ना! म्हणजेच ही नाती हरवू न देणं हे आपल्याच हातात आहे. पण अशी अनेक उदाहरणं दिसतात. क्षुल्लक गैरसमजापोटी आपण नाती कायमची तोडून टाकतो. स्वतःच्या वागण्याचं समर्थनही करतो. पण एक पाऊलही पुढे टाकत नाही. कारण आपला अहंकार आपल्याला तसं करू देत नाही.
“माझं चुकलं” असं म्हणायला फार मोठं मन लागतं. मागची पाटी कोरी करून आज नव्याने पुन्हा तीच नाती जोडायला ही धैर्य लागतं. “मीच कसा/ कशी बरोबर” हे तुणतुणे आपण आयुष्यभर वाजवत राहतो. पण आपली न हरवलेली नाती मात्र शोधायचा प्रयत्न करत नाही.
आपल्याला खरंच नात्यांची, माणसांची जाण, महत्त्व असेल तर मात्र असं आपण करणार नाही. दोन व्यक्ती एकत्र आल्या की मतभेद होणारच. नातं कोणतेही असो. वाद, भांडणं होणारच. पण वाद विकोपाला जाऊ न देता नातं टिकवणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यातच समजूतदारपणा, प्रगल्भता, लवचिक दृष्टिकोन दिसून येतो. मानसिक गोंधळ उडण्याचा प्रश्नच येत नाही.
त्याच प्रमाणे आपण स्वतः स्वतःला किती शोधतो?? आपण स्वतःचं मन किती नेमके वाचू शकतो? “स्वतःच स्वतःला सापडण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ध्यानधारणा.” कोणीही नसलं तरी आपलं मन, आपले विचार, आपला सकारात्मक वास्तवदर्शी दृष्टिकोन, आपली मानसिकता हे तर हरवलेलं नसतं ना! हे तर आपलं आपल्यापाशीच असतं. पण हे सुद्धा नेमकं शोधणारे किती जण आहेत??? आपण स्वतःला जर नीट सापडलो तर कधीच मानसिक गोंधळ उडणार नाही.
न हरवलेली वस्तूही शांतपणे, घाई गडबड न करता आपण शोधू शकतो. आणि ती मिळतेही. त्याच प्रमाणे सारासार विचार आणि कृतीने तुमच्या जवळच, सोबत असलेली पण सापडत नसलेली नाती ही मिळतात. सापडतात. स्वतःला वेळ दिलात तर तुमचे तुम्हीही स्वतःला सापडता. तुम्हीं स्वतःचा संपूर्ण स्वीकार करता आणि नात्यांचाही. मग अशी नाती नव्याने रुजतात, बहरतात. नक्की प्रयत्न करुन पहा…….
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Mla mazi ktha mandaychi ahe
It is very nice and very true!!