वाट पाहण्याची इतकी सवय झालीये की काही विचित्र घडलं तरी दुःख होत नाही.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
मी रजनी, रजनी माटे. आज मी माझ्या मनात जे काही साचून राहिलय ते तुमच्यासमोर मांडणार आहे. तुम्हाला सांगणार आहे. माझा जन्म एका सर्व साधारण घरातच झाला. आमची शेती होती. आई बाबा दोघही शेती सांभाळायचे. आम्ही तीन भावंड. सर्वात मोठी मी. माझ्या मागची माझी दोन भावंड. एक भाऊ आणि बहीण. वयात तस काही फार मोठं अंतर नव्हत. तरी मोठी आहे म्हटल्यावर यायची ती जबाबदारी आलीच.
आई रोज सकाळी लवकर उठून जेवण बनवायची, तिला मदत करायला मलाही उठायला लागायचं. जेवण झालं की आई बाबा दोघंही शेताकडे जायचे. ते गेल्यावर घरातली उरलेली काम आवरा, आम्ही तिघही शाळेत जायचो त्यामुळे स्वतःची तयारी करून भावा बहिणीला उठवा, त्यांची तयारी करा हे सर्व माझ्यावरच पडायचं. अधे मध्ये शेतात मदत करायला ही जावं लागतं असे. मी सर्व आनंदाने करायचे.
कारण यातलं कोणतही काम माझ्या भावंडाना करायला लागू नये असं मला वाटायचं. यंदा माझी सातवी होती. नेहमीप्रमाणे मी शाळेतून आले आणि पाहिलं तर बाबा अंथरुणावर पडून होते. आज कामावरून लवकरच आले होते. विचारल्यावर समजलं त्यांना कणकण जाणवत होती. बाबांचे कष्टही तेवढेच होते म्हणा. खूप लहान असल्यापासून ते काम करत होते आणि आता तो थकवा त्यांच्या चेहेऱ्यावर दिसून येत होता.
आमचं शेत असलं तरी कामगार जास्त असे कोण नव्हते. जे काय करायचो ते आम्हीच. आता बाबांची तब्येत बिघडली त्यामुळे त्यांना पाठवण शक्य नव्हत. शेतावर कोणतरी एक माणूस असायला पाहिजे. म्हणून मी काही दिवस घरी थांबायचं ठरवलं आणि आई शेतात जाऊ लागली. माझा अखा दिवस घरातली काम करण्यात, भावंडाना आवरण्यात आणि बाबांची काळजी घेण्यात जाऊ लागला. यात अभ्यास आणि शाळा राहिला तो राहिलाच. मी आता घरीच राहू लागले. बाबांना फार काम करायला लावायच नाही असं मी ठरवलं आणि मीच सर्व पाहू लागले.
आज खूप दिवसांनी बाबांच्या चेहऱ्यावर जरा तजेला दिसत होता. मी त्यांच्याजवळ बसले होते तेव्हा ते मला म्हणाले, “रजू मी खरच नशीबवान आहे की मला तुझ्यासारखी मुलगी मिळाली. इतक्या कमी वयात पण तू हे सर्व सांभाळते हे पाहून मनाला फार समाधान वाटत. तू जिथे कुठे जाशील त्याचा संसार सुखाचा करशील. माझ्या तब्येतीच मला काही खरं वाटत नाही. तुझ्या मागे तुझी दोन भावंड आहेत. त्यांचं पण सर्व व्ह्यायच आहे. तू त्यांना सांभाळशील याची मला खात्री आहे.
पण मला माझी खात्री नाही. मला वाटत की निदान तुझ लग्न तरी मी माझ्या डोळ्यांनी पहायच आहे.” बाबांची खालावलेली अवस्था मी गेली दोन तीन वर्ष पाहत होते. त्यांची काळजी, तळमळ मला समजत होती. मला शिक्षणाची खर तर खूप आवड होती. भावंड जरा मोठी झाली की मी परत शिकायचं ठरवलं होत. पण बाबांचा शब्द मी मोडू शकत नव्हते.
म्हणून मी लग्न करायचं ठरवलं. या आशेने की निदान तिथे गेल्यावर तरी मी माझ शिक्षण पूर्ण करू शकेन. काही दिवसांनी माझ्या लग्नाची तयारी सुरू झाली. जवळच्याच एका गावात मला देण्यात आलं. मुलगा कचेरीत कामाला होता. शेतीवाडी, घर सर्व होत. बाबांची इच्छा होती तसं त्यांच्या डोळ्यादेखत माझं लग्न झाल. खूप आनंदात होते ते. मलाही त्यांना आनंदी पाहून बरं वाटलं. माझ्या लग्नाच्या काही दिवसातच बाबा आम्हाला सोडून गेले.
त्यामुळे त्यांचा जो एक आधार वाटत होतं तोही आता कमी झाला. इथे नवीन संसारात हळू हळू मी रुळत होते. लग्नाची जी काही स्वप्न मी पाहिली होती ती हळु हळू साकार होतील अस वाटू लागलं. सुरुवातीचा काही काळ चांगला गेला. सासू, सासरा, प्रेमाने वागायचे. मी घरा सोबतच माझ्या आई आणि भावंडांची पण काळजी घेत होते. त्यांना काही मदत लागली तर करत होते. नवऱ्याचा पण आधी याला पाठिंबा होता. पण जसे दिवस जाऊ लागले या गोष्टीची नाराजी त्या सर्वांच्या चेहऱ्यावर दिसू लागली.
आपण इतकं कष्ट करून मिळवायचं आणि तू. ते तुझ्या माहेरी देणार हे आम्हाला आवडत नाही. खर तर बाबा नंतर माझाच त्यांना आधार होता. मी ही गोष्ट माझ्या सासू सासऱ्यांना नवऱ्याला समजावली. पण त्यांना ते पटल नाही. आईला जेव्हा हे समजलं तेव्हा तिला पण वाटलं मी माझा संसार जास्त महत्त्वाचा आहे. आमच्यामुळे तुझ्या संसारात ताण नको. म्हणून तिने यापुढे कोणताही मदत न घेण्याच ठरवलं. मी तरी आणि काय करू शकणार होते. मला कितीही वाटलं तरी मी हतबल होते.
कारण स्वतःहून कमवायला माझ्याकडे तेवढ शिक्षणही नव्हत. आता लग्नाला दोन वर्ष होऊन गेली. मला मुलगा झाला होता. त्याला सांभाळण्यात माझा अख्खा दिवस जाऊ लागला. त्याच्यासोबत वेळ कसा जाई समजत नसे. तिकडे माहेरी पण आता जरा स्थिर स्थावर झालं होत. भावंड मोठी झाली होती. सर्व नीट करत होती. त्यामुळे मी पूर्ण वेळ आता या संसारात रमले. बघता बघता माझा मुलगा मोठा झाला. शाळेत जाऊ लागला. घरी मी त्याची आई असले तरी त्यांच्या शिक्षणाचे निर्णय, त्याला कोणत्या शाळेत घालायचं हे सर्व त्याचे बाबा एकटेच ठरवत होते.
मी कधी काही सांगायचा प्रयत्न केला काही सुचवायचे प्रयत्न केला तरी त्यांना पटत नसे. तुझ कितीचा शिक्षण झाले मला सुचवायला. असं मला ऐकून घ्यावं लागे. मुलाच्या शिक्षणाच्या बाबतीतच नाही तर घरातील काही महत्त्वाचे निर्णय घेताना मला कधी कोणी फारसे विचारात घेतले नाही. बायको सून आई म्हणून माझं कर्तव्य मी चांगल्या पद्धतीने पार पडत असले तरी त्या दृष्टीने घेतले जाणारे निर्णय यात माझा सहभाग विचारात घेतला जात नव्हता. पण तरीही मला कुठेतरी आशेचा किरण दिसत होता.
अगदी लहान असल्यापासूनच चांगल्या पद्धतीने आपण शिक्षण घेऊ, बाबा कधीतरी बरे होतील आणि आपण शाळेत जाऊ शकू याची वाट पाहण्यात दिवस गेले. लग्न झाल्यानंतर नवरा आपल्याला सन्मान देईल, आदराने वागवेल सासू-सासरे आई-बाबांच्या मनाने माया करतील अशी वाट पाहण्यात दिवस गेले. पण तसं कधी फारसं घडलं अाठवत नाही. माझी भूमिका ही फक्त आपलं कर्तव्य निभावणे इतकीच राहिली. यात माझी स्वप्न, शिकायची आवड मागेच पडल. अजूनही तो प्रसंग आठवतो, मुलगा आता ७वर्षाचा झाला होता. स्वतःचा स्वतः करू शकत होता.
म्हणून मी सहज नवऱ्याकडे विषय काढला. “अहो आपला सतीश आता मोठा झाला. माझ्याशिवाय तो दिवसभर राहू शकतो. शाळेतही जातो त्यामुळे त्याची आता चिंता नाही. मला खूप दिवसापासून परत माझा शिक्षण चालू करायची इच्छा होती. निदान माझी दहावी तरी पूर्ण झाली तर मी काहीतरी छोटं मोठं काम करू शकेल घरात अजून हातभार लावू शकेन.” हे ऐकताच नवऱ्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.
कपाळावर आठ्या आणून ते म्हणाले, “मुलगा मोठा झालेला असताना आता या वयात तुला काय हे शिक्षणाचे वेड लागले आहे. हे तुझ वय तरी आहे का शिक्षण घ्यायचं आणि तुझ्या शिक्षणामुळे आपल्या घरात कोणीच काही अडले नाही. तू फक्त घर आणि आपल्या मुलाला सांभाळ तेवढं पुरेसं आहे.” त्यांच्या या बोलण्याने किती दुःख झाल म्हणून सांगू.
पण मी काही करू शकत नव्हते. फक्त वाट पाहणं माझ्या हातात होत. मला समजून चुकलं होत की शिक्षण घेण्याचे हे स्वप्न कधी पूर्ण होणार नाही. पण तरी मी निराश झाले नाही. कारण मी कुठेतरी वाचलं होत की चार भिंतीतल शिक्षण हेच फक्त शिक्षण नसतं. आपले अनुभव त्यातून घेतलेले बोध हेही एक प्रकारच शिक्षणच आहे. आता मी उरलेला वेळ माझ्या जुन्या आवडी निवडी पूर्ण करण्यात घालवू लागले. लहानपणी पुस्तक वाचायला मला फार नाद होता. तेच मी आता जोपायसायच ठरवलं. सोबत लेखन करू लागले.
माझे अपुरे राहिलेले स्वप्न, आतापर्यंतचा अनुभव, ज्या काही गोष्टी मी घरातून सोबत मोकळेपणाने बोलू शकत नव्हते ते सर्व मी लिहू लागले. या सर्व गोष्टींना आता खूप वर्ष होऊन गेली. माझा मुलगा आता मोठा झाला, आम्ही शहरात येऊन राहू लागलो. पण अजूनही मी कधी माझ्या शिक्षणाचा विषय काढला तरी त्यावर सगळे हसतात. तरीही मी दुःखी होत नाही. वय वाढलं असेल माझं तरी अजून मनात कुठेतरी ती ७वी मधील रजनी जिवंत आहे. जिला खूप खूप शिकायच आहे, भाऊ बहीण आईला सांभाळायचा आहे. जिला वाटत की तिचं लग्न झाल्यावर तिच्या सासरची लोक तिला तेव्हढ्याच आदर आणि सन्मान देतील आणि तीच हे स्वप्न ती कधी ना कधी जरूर पूर्ण करणार, होणार. कितीही विचित्र, निराशाजनक प्रसंग आले तरी.
कारण ही वाट पाहायची सवय मला खूप आधीपासूनच लागली आहे. आज खूप मोकळं वाटतं आहे स्वतःच्या मनातलं मोकळं करून. मला ठाऊक आहे माझ्या आयुष्यात पण चांगले दिवस येतील. सुरेश भटांची कविता कालच वाचली,
विझलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही…..
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही…ll
छाटले जरी पंख माझे,
पुन्हा उडेन मी.
अडवू शकेल मला,
अजुन अशी भिंत नाही ..
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Kharach khup chan ahe ha लेख
Apratim
Khup chaan
Chan
Khupach vhan
Khoopch sunder