हा लेख वाचा आणि नैराश्यातून स्वतःला पुन्हा कमबॅक करा.
काव्या धनंजय गगनग्रास
(एम.ए. समुपदेशन मानसशास्त्र)
प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार असतात. निसर्ग जसा कधी पाऊस आणून थंडावा देतो आणि ऊन आणून चटके तसच आपलं आयुष्य आपल्याला हा ऊन सावलीचा खेळ दाखवत असत. आपण त्यात कस तग धरून राहतो यावर आपलं जगणं अवलंबून असत. आणि हेच सर्वांना जमत अस नाही. वैयक्तिक जीवनात येणारे अडथळे, कामाच्या ठिकाणी होणारा त्रास असेल, आरोग्याच्या तक्रारी यासारख्या अनेक गोष्टी असतात ज्या माणसाला निराश, हताश करतात. आपण सतत प्रयत्न करूनदेखील आपल्याला हवं तसं यश मिळत नाही तेव्हा एका वेळेला नैराश्य येऊ लागतं. तसच माणसाला आपल्या प्रयत्नांबरोबरच आपल्याला आपल्या जवळच्या लोकांची किंवा इतरांची साथ मिळावी असं देखील वाटत असत जी अनेकदा मिळत नाही.
जेव्हा आपण प्रयत्न करून थकतो, परिस्थिती पण आपल्याला मनासारखी नसते आणि जेव्हा एकटेपणाची भावना मनात घर करते तेव्हा व्यक्तीला नैराश्य जाणवत. या भावनेमध्ये व्यक्ती स्वतः ला, इतरांना तसेच भविष्य/परिस्थितीला नकारात्मक नजरेने पाहू लागतो. म्हणजेच काय तर मला काही जमणार नाही, इतर लोक मला मदत करू शकत नाहीत आणि भविष्यातही काही चांगलं होणार नाही.
आयुष्य जगायला जो एक आशेचा किरण मग तो छोटा का असेना गरजेचा असतो तोच यात नष्ट होतो. कारण तशी जागाच कुठे ठेवली जात नाही. ज्या गोष्टी आधी आनंद देत असतात त्यातही आनंद मिळत नाही. सर्व उदासीन वाटू लागत. आता हे उदासीन वाटण सर्वांच्या बाबतीत कधी ना कधी होतच. त्या त्या प्रसंगातील ती प्रतिक्रिया असते. पण समस्या ती नाही. इतरवेळी आपला हा उदास पणा टिकून राहत नाही. काही वेळाने तो कमी होतो आणि आपण सुद्धा नॉर्मल होतो. पण नैराश्यात असलेल्या व्यक्तीचा बाबतीत अस होत नाही. आपल्यावर ओढवलेली ही परिस्थिती कधीच नीट होणार नाही अस वाटत. अस overgeneralization केलं जातं. हा वाईट काळ असाच राहणार आणि म्हणून तो उदासीन पणा राहतो.
नैराश्यात असलेली व्यक्ती सर्वामध्ये असूनही एकटी असते. तिचा तिचा आतला संघर्ष चालू असतो जो जेव्हा एका मर्यादे नंतर करता येत नाही तेव्हा व्यक्ती टोकाचं पाऊल उचलते.
अनेक व्यक्ती ज्या आत्महत्या करतात त्याच्या मुळाशी नैराश्य दिसून येत. आपल्या जेव्हा कोणाकडून कसल्याच काहीही आशा राहत नाही तेव्हाच जीव संपवावा अस वाटत. म्हणून नैराश्यातून वेळेवर बाहेर येऊन आयुष्याची नवी सुरुवात करणं खूप गरजेचं आहे.
यासाठी सर्वात आधी कोणती गोष्ट करायची तर ती स्वतःवर , स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. आता आपल्याकडून काही चुका झाल्या ही असतील पण आपण अनेक गोष्टी नीट केलेल्या असतात. मग वेगवेगळ्या प्रसंगी आपण आपली निभावलेली जबाबदारी असेल, एक पालक म्हणून, एक मुलगा/मुलगी म्हणून, विद्यार्थी, आपल्या आयुष्यातील आपले जे काही रोल असतील ते आपण नीट निभवलेल असतात. किंबहूना आता ज्या काही चुका झाल्या त्याही कधीकाळी आपण नीट केल्या असतील. तो काळ आठवा. जोपर्यंत आपण आपल्याला स्वीकारत नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाही. म्हणून नैराश्यातुन बाहेर यायचं असेल तर आधी स्वतःला स्वीकारा, आपण काहीतरी करु शकतो हा विश्वास स्वतः ला द्या.
जी गोष्ट स्वतः ला लागू होते ती इतरांनाही लागू होते. एका प्रसंगावरून आपण इतरांकडून कोणतीही आशा न बाळगण हे लॉजिकल नाही. अस अनेकदा झालेले असत की आपल्याला लोकांची मदत मिळते. ती आताही मिळू शकते. नक्की मिळू शकते. त्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. कारण दर वेळी आपण एकटे आपली समस्या सोडवू शकतो अस नाही. आपल्याही काही मर्यादा आहेत. मी एकटाच बरा होऊ शकतो हा अट्टाहास न करता, वेळेवर आपल्याला जो काही त्रास जाणवतो त्याबद्द्ल चांगला समुपदेशक किंवा थेरपिस्ट शी बोला. योग्य ती मदत घ्या. तसेच स्वतःला एकट न पाडता घरातल्या व्यक्तिसोबत, मित्र मैत्रिणी यांसोबत वेळ घालवा, गोष्टी शेअर करा.
पूर्वीच्या काळी आपल्या इथे मानसिक त्रासच प्रमाण कमी होत. जरी तस काही जाणवलं तरी घरात अनेक लोक होती ज्यांच्याशी हे सर्व बोलता येत होत. मोकळा संवाद होता. आता अशी कुटुंब व्यवस्था राहिलेली नाही. संवाद कुठेतरी संपत चालला आहे जो खूप गरजेचा आहे. आपण एकटे नाही आपल्यासोबत कोणतरी आहे ही भावना आपल्याला खूप काही देऊन जात असते.
सर्वात महत्त्वाचं कोणतीही परिस्थिती चिरकाल टिकत नाही. सूर्यास्त आहे तसा सूर्योदयही आहे. हे आपण स्वतःला सांगितलं पाहिजे. आणि नव्याने सुरुवात केली पाहिजे. मग त्यासाठी रोज व्यायाम करण, मोकळ्या हवेत फिरणं, आपल्या विचारांना योग्य वळण लावणे, छंद लावून घेणं या सर्व गोष्टी कराव्या लागतील.
आणि आपल्याला काय मिळवायचं आहे हे ठेवून त्या दिशेने वाटचाल करावी लागेल. आयुष्य आपल्याला खूप संधी देत असत. आपण त्या निवडत पुढे जायचं असतं.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

अप्रतिम !