गोतावळ्यात राहूनही आपण एकटे असतो त्यापेक्षा थोडंसं ह्या सगळ्यांपासून लांब जाऊन बघावं.
हर्षदा पिंपळे
“अगं इतक्या गर्दीतही मला खायला उठलं गं.खूप एकटं एकटं वाटत होतं.कळतच नव्हतं नेमकं काय करावं ते.मित्रमैत्रिणींना भेटायला म्हणून गेले.पण सगळा मूड स्विंग झाला गं.म्हणजे एकीकडे छान वाटत होतं आणि एकीकडे मनात वेगळच काहीतरी चालू होतं.खरचं कळत नव्हतं इतक्या गर्दीतही एकटं का वाटत होतं..?”
स्नेहा गीतांजलीला म्हणाली.
“अगं,इतक्या गर्दीत कसं काय तुला एकटं वाटत होतं गं ?आणि मित्रमैत्रिणी तर होते नं सोबत मग काय झालं..?अचानक असा एकटेपणा कुठून आला गं ?”गीतांजली म्हणाली.
“अगं,मलाच कळत नाहीये, म्हणून तर तुला सांगतेय नं ?आणि तुच मला विचारतेस,कमाल आहे गं तुझी !जाऊदे तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही.मी निघते.मला इथेही एकटेपणा जाणवतोय. मन स्थिर वाटत नाहीये.” असं म्हणून स्नेहा तिथून निघून गेली.
घरी गेल्यावरही ती तशीच होती.तिच्या चेहऱ्यावर असणारा हास्याचा रंग पार फिका पडला होता. घरातील लोकांनी तर तिला प्रश्न विचारून विचारून हैराण करून सोडलं होतं.शेवटी ती चिडली,तिने धोपटं घेतलं आणि एकटीच बाहेर निघून गेली.चालताना ती फक्त चालत होती.तिच्या मनात कोणतेही विचार नव्हते. नंतर पुढे जाऊन ती एका जवळच असणाऱ्या तलावाशी जाऊन थांबली. काही काळ तिने तिथेच घालवला.तसं तलावाजवळ काही गर्दी नव्हती. जेमतेम बोटावर मोजण्याइतकी तिथे माणसं होती.आजूबाजूला छान निसर्ग होता.मांजर ससा असे पाळीव प्राणीही तिथे होते. स्नेहाला तिथे गेल्यावर बरच बरं वाटलं.तिचा एकटेपणा हळुहळू कमी होत होता.मनाला शांत वाटत होतं. थोडक्यात सांगायचं झालं तर तिला मोकळं वाटत होतं.एकटेपणाची भावना दूर कुठेतरी निघून गेली होती.
दोन-चार तास तिने तिथेच घालवले. नंतर मात्र ती घरी गेली. पण घरी गेल्यावरही ती तितकीच प्रसन्न होती.शेवटी तिलाही कळालं गर्दीपासून थोडं लांब गेल्यावर मनाला एक वेगळी शांतता मिळते.लांब जाणं कधी कधी आवश्यक आहे. स्वतःसाठी !
आणि आपण आणि स्नेहा काही वेगळे नाही. आपली अवस्था कधी कधी स्नेहासारखी होतेच.आपणही गर्दीमध्ये सिक्युर फिल करत नाही. आपली घुसमट होते.आपल्याला एकटं एकटं वाटत राहतं.
मित्रांनो, आता गोतावळा म्हणजे काय तर आपलीच माणसं.आपल्या अवतीभवती असणारी जुनी-नवी सगळीच माणसं.मग त्यामध्ये आपले मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, शेजारी, किंवा अवतीभवती असणाऱ्या सगळ्यांचाच समावेश होतो. म्हणजे इतकी गर्दी आपल्या अवतीभवती असते.परंतु अनेकदा या गर्दीमध्ये आपल्याला खूप एकटेपणा जाणवतो.एवढ्या गर्दीतही आपल्याला आपण एकटेच भासतो.सतत वाटत राहतं सगळं असूनही काहीच नाहीये.पण मग अशावेळेस काय करायचं तेही सुचत नाही. आणि कधी कधी काहीच करावसंही वाटत नाही. पण मित्रांनो असं करून कसं बरं चालेल? यावर काहीतरी मार्ग काढायला हवा नं ?या एकटेपणावर काहीतरी सोल्युशन काढायलाच हवं.गर्दीत राहून जर का एकटेपणा जाणवत असेल तर थोडं याच गर्दीपासून लांब गेलो तर ?
विचार करून पहायला काही हरकत नाही.अशाच गर्दीतून आपण कधीतरी थोडं लांब जायला हवं.रोजच्या गर्दीपासून दूर कुठेतरी जायला हवं.तेवढाच मनाला निवांतपणा मिळेल.अवतीभवतीच्या शांत वातावरणामुळे मनालाही शांती, समाधान मिळतं.प्रसन्न वातावरणात मन एकाग्र, स्वस्थ राहतं.आनंदी राहतं.त्यामुळे सहसा एकटेपणा हा जाणवत नाही. म्हणून गर्दीपासून जरा अलिप्त व्हायला शिका.कारण कधी कधी एकटेपणा हा एकांतातच लवकर दूर होतो.
मित्रांनो, प्रत्येक वेळी ही गर्दीच तुमच्या एकटेपणाचं कारण नसते.मनातील गर्दीही याला तितकीच कारणीभूत ठरते. नाहीतर आपल्याच माणसांमध्ये एकटं वाटण्याचं काय कारण ?
आधी मनातील कोलाहल शांत करण्याचा प्रयत्न करा.मनच थाऱ्यावर नसेल तर कसं होणार ?प्रसंग कुठलाही असो,मनाला शांत,सकारात्मक ठेवण्यासाठी प्रयत्न करा.कारण हे मनच एकटेपणावर मात करू शकतं.पण त्यासाठी मनाला जरा वेगळ्या वातावरणात फिरायला नेणं गरजेचं आहे.
सो…गर्दीतून बाहेर पडा.या गोतावळ्यात जास्त काळ रमू नका.माणसं जरी आपलीच असली तरी त्यांच्यापासून काही काळ थोडं लांब जाऊन या. वातावरणात वेळ घालवा.नवा अध्याय सुरू करा.एकटेपणावर सहज मात करणं शक्य होईल.आयुष्याचा मार्ग नक्की सुखकर होईल.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
