Skip to content

वेळेची एक चांगली सवय आहे, कशी का असेना निघून जाते…

वेळेची एक चांगली सवय आहे, कशी का असेना निघून जाते…


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


विराज स्वतःच्या परिस्थितीला कंटाळला होता. तो काय स्वप्न घेऊन मुंबईत आला होता आणि आता त्याच्यावर अशी वेळ होती की रोजचा खर्च भागवण्यासाठी देखील वण वण भटकावं लागत होत. तो मेहनती होता, हुशार होता त्याची काम करायची तयारी देखील होती. पण या शहरात येताना त्याने जे काही ठरवलं होत त्यांच्या उलट सर्व घडत गेलं. ज्यांचा विश्वासावर तो आला ती माणसं ऐनवेळी फिरली, वण वण करूनही मनासारखं काम त्याला मिळालं नाही.

पहावं तिथे स्पर्धा. कुठे काम करण्यासाठी मेहनत कमी आणि ओळख पाहिली जाई. त्याला मागे जाण्यासारखे पण नव्हते. त्यामुळे त्याने शेवटी एका हॉटेल मध्ये delivery boy ची नोकरी पत्करली. आता जरी तो काम करत असला तरी त्याला त्यात समाधान मिळत नव्हत. आपल्यावर ही वेळ आपण स्वतः ओढवून घेतली आहे अस वाटून तो हतबल झाला होता. मुंबईत येऊन पण त्याला खूप काळ झाला होता. तरी अजून त्याची प्रगती नव्हती. त्यामुळे त्याला आता आपली ही परिस्थिती आपली ही वेळ अशीच राहणार अस कुठेतरी वाटू लागलं. आपलं अख्खं आयुष्यच अस जाणार, आपली वेळ कधी बदलणार नाही अस वाटून तो अजूनच निराश होऊ लागला.

असाच एकदा तो डिलिव्हरी पोहचवून समुद्रकिनारी येऊन बसला होता. हल्ली हा किनाराच त्याच आवडत ठिकाण झालं होत. रोजच्या गजबजाटातून बाजूला, या ठिकाणी त्याला शांत वाटे. पुढे काय करायचं, आपल्यात काही प्रगती होईल का, अजून किती दिवस आपण अस फिरायच असे विचार त्याच्या मनात येऊ लागले तसा तो अधिकच अस्वस्थ झाला. तो तिथे बसलेला होता त्यावेळी निपुण तिथून जात होता. निपुण विराज चा मित्र.

विराज कॉलेज मध्ये असताना नाटक बसवायचा त्यात भाग घ्यायचा अश्याच एका नाटक स्पर्धेच्या वेळी त्यांची ओळख झाली व चांगली मैत्री देखील झाली. मध्यंतरीच्या काळात म्हणजे जेव्हा विराज मुंबईत आला तेव्हा मात्र त्यांचा संपर्क म्हणावा तसा राहिला नाही. तरी निपुण विराजला विसरला मात्र नव्हता. म्हणूनच आज इतक्या वर्षांनी विराजला पाहून निपुण ला आनंद झाला. तो त्याच्याकडे हळूच जाऊन बसला व पाठीवर थाप मारली. तेव्हा अचानक कोणाची थाप बसली म्हणून विराज ने पाहिले तर निपुण. त्याला पण खूप आनंद झाला. त्याने निपुणला मिठीच मारली. दोघांनी बोलायला सुरुवात केली.

विराज ने निपुणला त्याच्या कामाविषयी विचारले तसच सध्या कुठे असतो हे सर्व ते बोलत होते. पण निपुणला मात्र विराज मध्ये खूप फरक जाणवत होता. चेहरा उदासवाणा, शरीर वयाच्या मानाने थकेलेले वाटत होते. त्याने याचे कारण देखील विचारले त्यावर विराज आधी काही बोलला नाही. कामाचा लोड असतो म्हणून अस तो बोलला. पण निपुण ने पुन्हा पुन्हा विचारल्यावर मात्र त्याने आतापर्यंतची सर्व परिस्थती, त्याची मनस्थिती सांगितली. हे सर्व सांगताना देखील त्याचे डोळे पाणावले होते. निपुणला पण ऐकून वाईट वाटले. त्याने त्याला सावरलं, धीर दिला व म्हणाला, मित्रा तुझी परिस्थिती मी समजू शकतो. पण तुला आठवत नाटक बसवताना तू आम्हाला किती नवनवीन गोष्टी सांगायचास, तसच मीदेखील तुला आज एक गोष्ट सांगेन.

एकदा एका राजाने त्याच्या सल्लागारांना बोलावले आणि विचारले, “असा काही सल्ला किंवा मंत्र आहे जो कुठल्याही प्रसंगी, कुठल्याही वेळी, कुठल्याही जागी उपयोगात येऊ शकेल? जेव्हा तुमच्यापैकी कोणीही मला सल्ला द्यायला नसेल तेव्हा मदत होईल असा काही मंत्र तुम्ही सांगु शकाल का?” सगळे सल्लागार विचारात पडले. सगळ्या प्रश्नांचे एकच उत्तर? सगळीकडे अंमलात येऊ शकेल असा मंत्र? जो दु:खातही मार्गदर्शन करेल आणि सुखातही, पराजयात आणि विजयातही? असा काही मंत्र असु शकेल काय? खुप खल केल्यावर एका वयोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध सल्लागाराने एक मंत्र सुचवला. सगळ्यांना तो लगेच पटला. त्यांनी तो लिहुन काढला आणि कागद राजाला दिला. अर्थात सोबत एक अट होतीच. राजाने मंत्र लगेच वाचायचा नाही तर जेव्हा गरज पडेल तेव्हाच तो मंत्र वाचायचा. गरजही अशी की जेव्हा सगळे मार्ग खुंटले असतील, प्राणांशी गाठ पडतेय की काय असे वाटेल तेव्हाच, फक्त तेव्हाच तो कागद उघडायचा आणि बघायचे काय आहे तो मंत्र. राजाने बोटातल्या हि-याच्या अंगठीत कागद ठेऊन दिला.

काही दिवसांनी राजाच्या राज्यावर हल्ला झाला. राजाच्या शत्रूंनी एकत्र येऊन अचानक जोरदार हल्ला केला होता. राजाने सर्व सैन्यानिशी जोरदार मुकाबला केला, पण त्याला यश आले नाही. रणांगणावरुन जीव वाचवुन त्याला पळून जावे लागले. घोडा राजाला घेऊन खुप खोल जंगलात गेला. मागुन शत्रूसेना पाठलाग करत होतीच. दुरवर घोड्यांच्या टापांचे आवाज दुमदुमत होते. अचानक राजाचा घोडा एका कड्याच्या टोकाशी पोचला. राजाने पाहिले, पुढे खोल दरी होती, मागे फिरावे तर टापांचे आवाज जवळ आल्यासारखे वाटत होते. काय करावे? राजाला काहीच सुचेना. अंत जवळ आलाय असे वाटु लागले.

तोच त्याच्या बोटातली अंगठी सुर्यप्रकाशात चमकली. त्याला एकदम सगळे आठवले. त्याने अंगठीतुन कागद काढला आणि वाचला.
‘हेही दिवस जातील….’ कागदावर लिहिले होते. राजाने परत परत वाचले आणि अचानक त्याला सगळा अर्थबोध झाला. ‘हो, हेही दिवस जातील! काही दिवसांपुर्वी माझे राज्य होते, मी सार्वभौम राजा होतो, आणि आज.. आज माझे राज्य, सगळे सुखोपभोग, सगळे नाहीसे झालेत. राज्यहीन असा मी, ह्या जंगलात शत्रूंपासुन स्वतःला लपवत फिरतोय. जर ते राज्य, सुख कायम टिकले नाही, तर मग हे दु:ख, हा अपमान तरी कसा कायम टिकेल? हेही दिवस निश्चितच जातील.’

राजाला या विचाराने खुप हुशारी वाटली. तो घोड्यावरुन खाली उतरला. आजुबाजूला पाहिले. अतिशय सुंदर असा निसर्ग चहुबाजूने खुणावत होता. आपल्या राज्यात अशी सुंदर जागा आहे हे त्याला माहितही नव्हते. कागदावरील मंत्र वाचुन त्याच्या चित्तवृत्ती ब-याच शांत झाल्या होत्या. निसर्गाने त्याचे मन अजुन शांत केले. थोड्या वेळाकरता तो समोर उभे असलेले संकटही विसरला. आजुबाजुचा निसर्ग तो पाहात राहिला.थोड्या वेळाने त्याच्या लक्षात आले की घोड्यांच्या टापांचा आवाज हळुहळू कमी होत होता. शत्रुसेना बहुतेक दुसरीकडे वळत होती. राजा खुप शुर होताच. काही दिवसातच त्याने आपले सैन्य जमवले आणि शत्रुशी जोरदार लढाई करुन राज्य परत मिळवले.

विजयी राजा जेव्हा नगरात परतला तेव्हा त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. नागरिकांनी गुढ्या तोरणे उभारली. राजाच्या रथावर जागोजागी पुष्पवृष्टी होत होती. प्रजानन गात नाचत राजाचे गुणगाण करत होते. राजाचा उर अभिमानाने आणि गर्वाने भरुन आला. ‘मी सर्वशक्तिमान असा शूर आणि अजिंक्य राजा आहे. मला हरवणे आता कोणालाच शक्य नाही’ त्याचे मन आनंदले. ‘असे स्वागत केवळ माझ्यासारख्या महाप्रतापी राजाचेच होऊ शकते.

दुस-या कोणाचाही हक्क असू शकत नाही यावर’.अचानक सुर्यप्रकाशात अंगठीतील हिरा लखलखला आणि राजाला तो मंत्र आठवला. त्याने परत कागद उघडुन वाचला. ‘हेही दिवस जातील!’ राजा एकदम विरक्त झाला. ‘जर हेही एक दिवस संपणार असेल तर मग हे माझे कसे? हे माझे नाहीच. पराभवही माझा नव्हता आणि आताचा विजयही माझा नाहीय. मी आपोआप पुढे जातोय, प्रवाहाला गती देणारा मी नाही, त्याला स्वतःची गती आहे.’ कालातीत असा तो मंत्र क्षणभरही न विसरता राजाने त्यानंतर अनेक वर्षे न्यायाने राज्य केले आणि प्रजेला सुखात ठेवले.

विराज ला या गोष्टीतून त्याच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर मिळाली. निपुणला त्याच्या डोळ्यात पूर्वीची ती चमक येताना दिसली. तो म्हणाला, मित्रा ही गोष्ट आपल्याला बरेच काही सांगून जाते. मान्य आहे की आता तुझी वेळ चांगली चालली नाही. पण हीच तर खरी गंमत आहे वेळेची. ही चांगली असो वा वाईट कधीही टिकत नाही. कायमस्वरूपी राहत नाही. त्यामुळे तू हताश, निराश होऊ नको. अजूनही बराच काळ आहे. तुझी मेहनत चालू ठेव आणि स्वतःला फक्त इतकेच सांग ली हे ही दिवस निघून जातील. आता जरी वेळ वाईट असली तरी की तत्कालिक आहे. एक ना एक दिवस असा नक्की येईल जेव्हा तुझी वेळ चांगली असेल. तू फक्त धीर ठेव आणि स्वतःवर विश्वास ठेव आणि पुढे जात रहा.
निपुणच्या या भेटीने खरच विराजच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणला. ही फक्त एक साधी भेट नव्हती तर एक नवीन दृष्टिकोन होता जो विराज ला पुढे घेऊन जाणार होता.

विराज प्रमाणे आपल्याही आयुष्यात चढ उतार येतात, वाईट वेळ येते, परिस्थिती येते आणि आपल्याला वाटू लागत की आपण यातून बाहेरच पडू शकत नाही. हे असच राहणार. पण अस होत नाही. वेळ कशीही असुदे ती कधी कायम आहे तशी राहत नाही. कोणासाठी थांबत देखील नाही. म्हणून तर आपण वेळेला इतकं महत्त्व देतो. त्यामुळे चांगल्या वेळी हुरळून पण जाऊ नये आणि वाईट वेळ आल्यावर हताश पण होऊ नये. कारण वेळ ही सारखी बदलत राहते, निघून जाते.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “वेळेची एक चांगली सवय आहे, कशी का असेना निघून जाते…”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!