वेळेनुसार सर्वच काही उध्वस्त होत नाही, तर काही नवीन गोष्टींचीही सुरुवात होते.
मेराज बागवान
‘वेळ’ जी सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. आपण अनेकदा म्हणतो, “वेळच सर्व काही ठीक करेल. वेळेबरोबर सर्व गोष्टी सुरळीत होतील”.वेळेमध्ये खूप ताकद आहे.वेळ कोणासाठी थांबत नाही.काळ पुढे पुढे जात राहतो.फरक असतो तो फक्त आपल्या दृष्टिकोनात.वेळेनुसार अनेक बदल घडतात.काही गोष्टी उध्वस्त देखील होतात.पण याचबरोबर दुसरीकडे काही नवीन मार्ग सापडतात ज्यामुळे आयुष्यात नवीन गोष्टींची सुरवात होते.
आपल्या जवळची कोणी व्यक्ती दुर्धर आजाराने ग्रासलेली असते. वेळ तर जात असते पण तिची प्रकृती काही केल्या सुधारलेली दिसत नाही.जणू काही ती व्यक्ती आता शेवटच्या घटका मोजत आहे असे कुटुंबियांना वाटते.पण असे वाटत असतानाच जणू काही चमत्कार होतो आणि ती व्यक्ती आजारातुन हळू हळू उठू लागते.आणि मग पुन्हा एकदा त्या व्यक्तीच्या आयुष्याची नव्याने सुरवात होते.
‘नाती’ जी की खूप मौल्यवान असतात.ही नाती आहेत म्हणून तर जगण्याला अर्थ प्राप्त झाला आहे. नाते कोणतेही असो, वैयक्तिक अथवा व्यावसायिक जीवनातील, ते महत्वाचेच असते.पण कधी कधी वेळेनुसार नाती दुरावतात देखील.कधी जाणून बुजून तर कधी काळाच्या ओघात हीच नाती अगदी दिसेनाशी होतात.
मग पुन्हा ही उध्वस्त झालेली नातीच आपल्याला खूप काही शिकवून जातात.जसे की ,’विश्वास कोणावर आणि किती ठेवावा, एकतर्फी नाते म्हणजे काय, आदर आणि स्वतःची किंमत किती महत्वाची आहे’. म्हणून वेळेनुसार काही उध्वस्त जरी होत असले तरी अशाप्रकारे दुसरीकडे आयुष्याची पुन्हा नव्याने सुरवात होत असते.
काही जणांना आर्थिक फटका बसतो.अचानक उद्योग बंद पडतो अथवा नोकरी जाते.आणि यामुळे घरच जणू उध्वस्त होते.पण ह्या सगळ्याला बाहेरील परिस्थिती जितकी कारणीभूत असते तितकेच आपण स्वतः सुद्धा कारणीभूत असतो.
पण आपल्याला हे तेव्हा लक्षात येते जेव्हा सर्व काही उध्वस्त झालेले असते.आणि मग त्याक्षणी आपण विचार करू लागतो, ‘अरे मी त्यावेळी थोडे धाडस दाखविले असते तर आज मी माझा उद्योग वाचवू शकलो असतो.थोडा संयम दाखविल असता, थोडे का होईना झुकते घेतले असते तर परिस्थती हाताबाहेर गेली नसती.मग अशाचप्रकारे वेळेनुसार उध्वस्त झालेली परिस्थितीच आपल्याला नवीन गोष्टींची सुरवात करायला भाग पाडते.
‘प्रेम’ ,ज्याला कोणतीच अशी व्याख्या नाही ते म्हणजे प्रेम.जगभरातील अनेक प्रेम कहाण्या आपल्याला माहीत आहेत.ज्यातील खूप कमी यशस्वी झाल्या आहेत.
पण यशस्वी जरी झाल्या नसल्या तरी जगाला मात्र एक चांगला संदेश त्या देऊन गेलेल्या आहेत आणि म्हणूनच आजही आपण त्या कहाण्या आठवितो. दोन जीवांचे प्रेम जरी पूर्ण नाही म्हणजे ते उध्वस्तच झाले असेही नाही.जेव्हा प्रेम कहाणी संपते तेव्हा दुसरीकडे अनेक नवीन गोष्टींची सुरुवात होते.जसे की माणूस संयम शिकू लागतो, समजूतदारपणा वाढीस लागते आणि ‘भावना’, ‘अपेक्षा’ म्हणजे काय हे जाणवू लागते.
तुम्ही एखाद्या व्यक्तीला मदत करता .ती खूप अडचणीत असते .आणि त्याच क्षणी तुम्ही त्या व्यक्तीला हवी ती मदत करता.आणि कधी कधी तुमच्या त्या मदतीमुळे त्या व्यक्तीचे आयुष्य पुन्हा उभारी घेते. तसेच तुम्हाला देखील तुमच्या अत्यंत अडचणीच्या वेळी कोणीतरी खूप मदत करते आणि त्यामुळे तुम्ही त्या अडचणीतून लवकर बाहेर पडता. आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा वाटते, आता ही वेळ सर्व काही उध्वस्तच करायला आलेली आहे. पण दुसरीकडे कुणीतरी भेटते आणि चांगल्या गोष्टी घडू लागतात.
‘वेळ’ खूप महत्त्वाची आहेच.पण आपला दृष्टिकोन देखील.आपण प्रतिकूल परिस्थतीत अनेकदा नकारात्मक विचार करतो.जणू आता आपला शेवटच होणार आहे, असेच वाटत राहते. पण त्या प्रतिकूल परिस्थिती देखील थोडे शांत आणि सकारात्मक राहिल्यास उशिरा का होईना कोणता ना कोणता मार्ग सापडतोच.कारण ‘कोणताच तोडगा नाही’ असे कधीच नसते.जिथे समस्या आहे तिथे तोडगा हा हमकास असतोच.फक्त तो कसा, कुठून शोधायचा हे मात्र आपल्या हातात असते. म्हणून लक्षात असू द्या, “वेळेनुसार जर काही उध्वस्त होत असेल तर दुसरीकडे त्यातूनच चांगल्या गोष्टींची सुरवात होत असते”.
म्हणून तर म्हणतात ना ,”जे होते ते चांगल्यासाठीच”. जर का नेहमी ‘ तक्रार करण्याचा दृष्टिकोन’ ठेवला तर मात्र तुम्हाला नेहमीच सर्व काही उध्वस्त होताना दिसेल.म्हणून दृष्टिकोनच असा ठेवावा की उध्वस्त परिस्थतीत देखील तुमच्याकडून ‘इतिहास’ च घडला पाहिजे.पण हे सगळं करत असताना मात्र कमालीचा ‘संयम’ तुमच्याकडे असला पाहिजे.स्वतःवर , स्वतःच्या रागावर, भावनांवर नियंत्रण ठेवता आले पाहिजे.आणि एकदा का तुम्ही स्वतःवर विजय मिळवला की बाकी सर्व काही शक्य आहे.
मुख्य म्हणजे ‘बदल’ स्वीकारता आला पाहिजे.कित्येकदा असे होते की , जो बदल घडतो त्याला स्वीकारण्याऐवजी विरोध च जास्त होताना दिसतो. ‘स्वीकारण्यात’ जी ताकद आहे ती इतर कुठल्याच गोष्टीत नाही.म्हणून फक्त आणि फक्त वर्तमानात जगायला शिकले पाहिजे. “आता , आज , ह्या परिस्थितीत मी काय केले पाहिजे” हेच फक्त मनाला सांगितले पाहिजे आणि तशी कृती देखील केली पाहिजे.
चांगल्या गोष्टींची सुरुवात झालेली पाहायची असेल तर, ‘पूर्णपणे वर्तमानात जगा. बदल स्वीकारा. वागण्या-बोलण्यात सकारात्मकता आणा. विश्वास ठेवा. आयुष्याचे आभार मानायला शिका.तुम्ही एकटे नाहीत हे स्वतःला सांगा.विधात्याने तुमची निर्मिती उगाच नाही केलेली , म्हणून नेहमी वेगळे काहीतरी करण्याचा प्रयत्न करा.फक्त स्वतः एकटे पुढे जाण्याऐवजी अनेकांना घेऊन पुढे वाटचाल करा आणि आयुष्य यशस्वी करा’.
परमेश्वराने तुमच्यावर आयुष्य जगण्याची फार मोठी जबाबदारी दिली आहे.ते असे जगा की , “किती जरी गोष्टी तुमचे आयुष्य उध्वस्त करू पाहत असतील तरी तुम्ही त्यातून नवीन दुसऱ्या चांगल्या गोष्टींची सुरुवात करायला थांबू नका”.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

तुमचे प्रत्येक लेख खुप अप्रतिम असतात .. नवीन वाटचाल मिळते यशस्वी आयुष्यासाठी … आभार शब्द सुद्धा कमी आहे तुमच्या लेखनाला.🙏
खरंच खूप म्हणजे खूप छान वाटला माझ्या पडलेल्या प्रश्नांना उत्तरे मिळाली thank you so much
👌