घट्ट बनवायचं स्वतःला आता… बाकी त्रास होतंच राहतो.
मेराज बागवान
त्रास कोणाला चुकला आहे ? अडचणी कोणाच्या आयुष्यात नाहीत? ताणापासून कोणाची सुटका नाही.आणि हा सगळा त्रासाचा प्रवास शेवटच्या श्वासापर्यंत चालणार आहे.म्हणजेच त्रासाला अंत नाही.आयुष्यात घडणाऱ्या विविध घटना आपल्या आयुष्यात नकारात्मकता आणण्याचा प्रयत्न करीत असतात. पण आपण एक कायम, शेवटच्या श्वासापर्यंत करू शकतो ते म्हणजे,’स्वतःला घट्ट बनवायचं’.बाकी त्रास होतच राहतो.
वैयक्तिक , सामाजिक, व्यावसायिक जीवनात घडणाऱ्या अनेक उलढालींमुळे मन अस्वस्थ होते.नैराश्य पदरी येते.काहीच करावेसे नको वाटते.कशात मन रमत नाही.पण अशा परिस्थितीत आपण कसे वागतो, आपला दृष्टिकोन कसा असतो आणि संपूर्णपणे आपण ह्या सगळ्या गोष्टींचे व्यवस्थापन कसे करतो हे फार महत्वाचे ठरते.म्हणून स्वतःला घट्ट बनवायला शिका.
मानसिकरित्या खंबीर राहिले म्हणजे किती जरी त्रास झाला तरी त्यावर मात करता येते.भावनिक समतोल साधावा.अति भावनिकता देखील जगणे मुश्किल करते.म्हणून भावनांवर योग्य नियंत्रण हवे.कोणताही त्रास झाला तरी त्यातून सकारात्मक विचारच घेता आला पाहिजे.उगाच कोणाला दोष देऊन त्रास कमी होत नाही किंवा त्यावर मार्ग देखील निघत नाही.जे काही करायचे ते आपण स्वतः.
जेव्हा कठीण परिस्थिती असते तेव्हा आपसूकच डोळे भरून येतात.खूप खूप राडावेसे वाटते.अशा वेळी खुशाल मोकळेपणाने रडून घ्यावे.एकांतात तर एकांतात, रडणे गरजेचे आहे.त्याशिवाय माणूस मोकळा होत नाही.जेव्हा जेव्हा त्रास होतो तेव्हा तेव्हा व्यक्त झाले पहिजे.कोणा व्यक्तींजवळ जर व्यक्त होता येत नसेल तर , स्वतः लिहून, स्वसंवाद साधून मोकळे व्हायला शिका, पण मोकळे व्हा.यामुळे माणूस कमकुवत नाही तर कणखर बनतो.
स्वतःला घट्ट बनवायचं म्हणजे काय, तर कायम संयम बाळगून ठेवायचा.त्रास, परिस्थिती कितीही बिकट असली तरी ती बदलणार हे नक्की असते. म्हणून , थोडा काळ लोटू द्या, सर्व काही मार्गी लागते.थोडा वेळ थांबा, डोके शांत ठेवा, सारासार विवेकबुद्धी जागृत ठेवा.थंड डोक्याने विचार केला, सर्व बाबी लक्षात घेतल्या की अपोआप मन शांती होते आणि मग आपण घट्ट बनत जातो.आणि असं घट्ट बनेपर्यंत कायम बाळगावा लागतो तो म्हणजे ‘संयम’.
नेहमी स्वतःशी सकारात्मक बोला, ‘मी हे करू शकते/शकतो, मी कणखर आहे, मी भावनिकरित्या मजबूत आहे, मी सर्व गोष्टींचे व्यवस्थापन करू शकते/शकतो’ असे दिवसाची सुरुवात करताना स्वतःशी बोलले पाहिजे.थोडी ध्यानधारणा, स्वतःला वेळ दिला पाहिजे.स्वसंवाद कायम चालू ठेवायला हवा.यामुळे स्वतःची स्वतःशी ओळख होते आणि आपण बळकट बनत जातो.
काही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात आणि नेमक्या त्याच त्या गोष्टींचा पुन्हा पुन्हा विचार माणूस करीत राहतो.कोणीतरी आपल्याशी अबोला धरतो, न सांगता दूर निघून जातो आणि मग आपण त्या व्यक्तीचाच शोध घेत सदैव राहतो.पण असे करून ती व्यक्ती आणखीन दूर जाते आणि मग आपण पुन्हा भटकत राहतो.पण अशा वेळी, अंगी हवा विश्वास, ज्या व्यक्तीला तुम्ही हवे आहात ती तुमच्याकडे कधी ना कधी येणारच आहे.पण तोपर्यंत तुम्ही तटस्थ असणे गरजेचे असते.उगाच खूप विचार करून काहीच उपयोग होत नाही.आपण फक्त वास्तव स्वीकारायच आणि पुढे जात राहायचं.
स्वतःला इतके घट्ट बनवा की इतरांना त्यातून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रेरणा मिळाली पाहिजे.नेहमी आपल्यापेक्षा जास्त समस्या ज्यांना आहेत त्यांच्याकडे पाहा, आयुष्याचा खरा अर्थ उमजेल.आयुष्यात कोणतीही परिस्थिती आली तरी त्याला निधड्या छातीने मी सामोरे जाईन हा विश्वास नेहमी हवा.आणि हा विश्वास असेल तर प्रत्यक्षपणे देखील तसाच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही.
जेव्हा तुम्हाला वाटते , की खूपच त्रास आहे, त्यावेळी त्या निसर्गाकडे पाहा, त्या विधात्याला आठवा.तो निसर्ग, तो विधाता आपली अनेकप्रकारे अप्रत्यक्षपणे मदत करीत असतो. कधी माणसांच्या रुपात तर कधी परिस्थिती च्या रुपात. फक्त ते पाहण्याची नजर हवी.आणि एकदा का तुम्ही तो दृष्टिकोन स्वतःमध्ये आणला तर संबंध सृष्टी तुमच्यासोबत आहे याचा अनुभव येईल.कारण समस्या एकटी येत नाही, त्यावर मार्ग हा असतोच,फक्त तो शोधता आला पाहिजे आणि त्यासाठी स्वतःला घट्ट बनवायला हवे.आणि ह्यासाठी थोडी स्वतःची पावले उचलावी लागतील.
ह्या जगात तुम्ही जरी स्वतःला एकटे समजत असलात तरी तो विधाता तुम्हाला कधीच एकटे पडू देत नाही.एक गोष्ट दूर झाली की त्याजागी दुसरी कोणती ना कोणती गोष्ट पुन्हा तुमच्याकडे येतेच.फक्त विचार तसे हवेत , दृष्टिकोन तसा हवा, समजूतपणा हवा. आणि एवढं तर आपण स्वतःसाठी करूच शकतो….नाही का…??
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

खुप छान
आपलं मानसशास्त्र हा लेख खूप आवडला.
Khup chhan