Skip to content

घडलेल्या प्रसंगाबद्दल पश्चात्ताप, घुटमळ आणि प्रचंड मानसिक अज्ञान व्यक्तीला आनंदी जीवन जगू देत नाही.

घडलेल्या प्रसंगाबद्दल पश्चात्ताप, घुटमळ आणि प्रचंड मानसिक अज्ञान व्यक्तीला आनंदी जीवन जगू देत नाही.


हर्षदा पिंपळे


एका मनुष्याच्या आयुष्यात वारंवार काही वाईट प्रसंग घडत होते.कधी कुणी फसवत होतं तर कधी त्याचे निर्णय चुकत होते.काही गोष्टींचा नंतर त्याला प्रचंड पश्चाताप झाला.तो घडलेल्या गोष्टींवर सतत विचार करत राहिला. एकाच गोष्टीभोवती घुटमळत राहिला.त्याला काही मानसिक गोष्टींबद्दल कळत नव्हतं. आणि कळून सुद्धा तो न कळल्यासारखं वागत होता.आणि वर पुन्हा “आयुष्यात सगळं वाईट घडतय,आनंदाने थोडंफार जगताही येत नाहीये.” असं बोलत होता.त्याला काही चांगल्या लोकांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने ते काही मान्य केलं नाही.”मला पश्चाताप होतोय,मला आता पश्चातापाशिवाय दुसरं काहीही सुचत नाही.” इतकच तो बोलत होता. स्वतःला काय आणि किती त्रास होत होता याकडे त्याचं लक्षच नव्हतं.

आपल्या मानसिकतेवर याचा अधिकाधिक परिणाम झाल्यावर काय होऊ शकतं याचीही त्याला जाणीव नव्हती. शेवटी जे व्हायचं तेच झालं.कालांतराने तो अधिकाधिक खचत गेला.शरीरातील त्राण नाहीसे झाले.मन दुबळं झालं.जीवन निरस झालं.उरलेलं आयुष्य दुःखाला कुरवाळत घालवलं.

पहा,इथे थोडा जर वेगळा विचार करून पाहिला असता तर नक्कीच काहीतरी चांगलं झालं असतं.

तर…..हे एक उदाहरण म्हणून आहे. परंतु अशा उदाहरणांची अवतीभवती कमतरता नाही.

मला सांगा,आयुष्य जगण्याचा तुमचा मोटो काय आहे?
आनंदी-यशस्वी – समाधानी राहणं की सतत स्वतःला त्रास करून घेऊन दुःखी राहणं ?

हं! कित्येकांना आयुष्य जगण्याचा मोटोच माहीत नसावा.कदाचित! केवळ जगायच म्हणून एखादा माणूस नावापुरता आयुष्य जगत असावा.पण अनुभव घेऊनही जगणं म्हणजे काय?याची व्याख्या त्याला खऱ्या अर्थाने कळली नसावी.कारण आयुष्य हे सुखदुःखानी भरलेलं आहे. आणि आयुष्यात कधी सुखाची बरसात तर कधी दुःखाची बरसात होत असते.चांगले-वाईट प्रसंग आयुष्यात येतच राहतात. कधी कामात,करिअरमध्ये यश मिळत नाही.कधी कुणी आपल्याला भयंकर दुःखावतो तर कधी कुणी आपल्याला फसवतो.तर कधी आपलेच निर्णय चुकतात आणि त्याचा भयंकर त्रास होतो.आणि त्या त्रासामुळे आपण काही स्वस्थ बसत नाही.असे प्रसंग घडल्यानंतर आपलं मन थाऱ्यावर नसतं.

आपण जगायचय म्हणून जगत राहतो.एक एक दिवस असाच पुढे ढकलत राहतो.खाण्यात लक्ष नसतं का गाण्यात लक्ष नसतं.सातत्याने घडलेल्या गोष्टींचा विचार करण्यात आपण गर्क झालेले असतो.कधी पश्चात्ताप होतो तर कधी त्याच घटनांमुळे आपण अक्षरशः ताळमेळ नसलेलं काहीही घेरून बसतो.काहीही बोलत राहतो.पण मित्रांनो, या सगळ्यामुळे आपण उरलेलं आयुष्य हे वाया घालवत असतो.आयुष्यात एक एक क्षण महत्त्वाचा आहे हे आपण अशावेळेस नेमके विसरतो. आपण असे वागतो जसं काही आपल्याला या आयुष्याशी काहीच देणंघेणं नाही.या प्रसंगामुळे पश्चाताप करून स्वतःला त्रास करून घेण्यात काहीच अर्थ नसतो.

आपण तसाच तोच तोच विचार करत राहतो आणि एकीकडे जगण्यातील आनंदच हरवलाय असही बोलून जातो.पण मग याला जबाबदार कोण? तर आपणच!आपणच या परिस्थितीला जबाबदार आहोत.आपण स्वतःहून आपला आनंद हरवत असतो.मित्रांनो,घडलेल्या प्रसंगाबद्दल सतत पश्चात्ताप करणं खरं तर चांगलं नाही.मनात,डोक्यात तेच तेच घुटमळणं चांगलं नाही.आणि बऱ्याचदा आपल्याला मानसिक ज्ञान नसतच.किंवा मग असूनही ते आपण वापरत नाही.पण मित्रांनो या गोष्टी कधीच माणसाला आनंदी जीवन जगू देत नाही.

आता तुम्हीच सांगा,सतत रडणं,एखाद्या गोष्टीबद्दल पश्चाताप करणं,घडलेल्या प्रसंगावर विचार करत राहणं, आणि प्रचंड मानसिक अज्ञान माणसाला आनंदी जीवन कसं बरं जगू देईल?

नाहीच देणार.कारण या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा आपल्या मनावर होत असतो.आणि मनच जर सुदृढ नसेल तर आपण आनंदी जीवन जगूच शकत नाही. केवळ शरीराने जिवंत असणं , वरवर हसत राहणं म्हणजे आनंदी जगणं नसतं.आनंदी जगण्यासाठी आत्मिक समाधान, आत्मिक शांती तितकीच महत्वाची असते.आपल्या अशा वागण्याने आपल्या आणि दुसऱ्याच्या मनावरही कोणते परिणाम होऊ शकतात याचा आपल्याला बऱ्याचदा अंदाजही नसतो.

मानसिकता,मानसिक संतुलन बिघडलं तर सगळच बिघडू शकतं.कोणत्या गोष्टींचा कितपत विचार करणं योग्य आहे ,कितीकाळ पश्चात्ताप करणं योग्य आहे याचा प्राथमिक विचार प्रत्येकाने करायला हवा. त्या गोष्टींची त्याला कल्पना असायलाच हवी. अन्यथा आयुष्यातील उरलेला प्रत्येक क्षण रडतकुढत जगण्यातच जाईल यात शंका नाही.मग प्रत्येकाने आता ठरवायला हवं काय करायचं आणि काय नाही…?

काय मग…तुम्हाला आनंदी जीवन जगायच असेल तर वेळीच घडलेल्या प्रसंगावर अतिविचार करणं थांबवा.एकाच गोष्टीभोवती वारंवार घुटमळणं बंद करा.काही गोष्टींच मानसिक ज्ञान समजून घ्या.

आयुष्य सुंदर आहे.आणि ते तसच जगायला हवं.अगदी हसतखेळत !


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!