Skip to content

पुढे चालायचं असेल तर त्यांना विसरण्याचा प्रयत्न करा, जे तुम्हाला विसरलेत…

पुढे चालायचं असेल तर त्यांना विसरण्याचा प्रयत्न करा, जे तुम्हाला विसरलेत…


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


माणसाचा स्वभाव पण किती अजब आहे नाही का? आयुष्यात अश्या अनेक गोष्टी घडत असतात ज्या आपण विसरून जातो, ज्या खरतर महत्त्वाच्या असतात. पण आपल्या ते अनेकदा लक्षातच राहत नाही. पण जे विसरायला पाहिजे, सोडून द्यायला पाहिजे ते मात्र परत परत आपल्या डोळ्यांसमोर येत.

त्या आठवणी, ती माणसं आपल्या डोक्यातून कधी जात नाहीत. प्रत्यक्ष नसल तरी या सर्व गोष्टीतून आपल्याला त्रास देतच राहतात. जुई च्या बाबतीत तेच झालं. जुईचा स्वभाव पहिल्यापासून सर्वांना मदत करण्याचा. तिला माणसं जोडायला, त्यांना तिच्याकडून जितकं होईल तितक द्यायला आवडत असे.

तिच्या घरातले तिला नेहमी समजावत, अग तू अजून लहान आहेस, तू मदत करतेस ती खरच चांगली गोष्ट आहे पण माणसं पण ओळखायला शिक. अस काही करू नको की समोरचा तुझा फायदा घेईल. तेव्हा ती म्हणायची, बाबा अस काही होणार नाही. एखाद्याला गरज असल्यावर त्याला मदत करणं हे तुम्हीच मला शिकवलय.

तुम्ही अजिबात काळजी करू नका. तिच्या अश्या बोलण्यावर घरातले तरी काय बोलणार. सर्वांना माहीत झाल होत ती काही बदलणार नाही आणि ती काही चुकीचं पण करत नव्हती. त्यामुळे रागवण्याचा काही प्रश्न नव्हता. जुईच कॉलेज सुरू झालं. नवीन मुलं एडमिशन घेऊन आली होती. बरीच मुलं बाहेरगावची होती. त्यांना कॉलेजच वातावरण, तिथला कॅम्पस, एडमिशन प्रोसेस सर्वच नवीन होत.

कोणाची ना कोणाची मदत घेऊन ते सर्व समजून घेत होते. यातच जुईला एक मुलगी दिसली ती म्हणजे सावनी. सावनी दुसरीकडून आली होती. गाव लांब असल्याने सोबत अस कोणी नव्हत. तिची तिचं आली होती. पण सर्वच नवीन असल्याने ती काहीशी गांगरली होती.

जुईने तिला पाहिलं व तिच्याकडून जाऊन चौकशी केली. इतका वेळ एकटीच असलेली सावनी तिच्या विचारपूस करण्याने जरा सुखावली. तिचा गांगरलेपणा कमी झाला. जुई ने तिला सर्व एडमिशन प्रोसेस मध्ये मदत केली. कॉलेज दाखवले. शिक्षकांशी ओळखी करून दिल्या.

चार दिवसांत तिला ज्या पद्धतीची मदत हवी होती ती सर्व जुई ने केली. तसच तिचा नंबर देऊन ठेवला. कॉलेज सुरू झालं. सावनी बाहेरची असल्याने तिला सुरुवातीला स्टँड वरून आणायला सोडायला पण जुई जायची. दोघांची चांगली मैत्री झाली होती.

सावनी म्हणायची देखील, “जुई तू नसतीस तर माझं काही खर नव्हत. मी काय करणार होते या नवीन शहरात. तुझी खूप मदत झाली मला.” यावर जुई हसून म्हणायची, “अग मदत कसली, उलट चांगलच झालं. नाहीतर तुझ्यासारखी मैत्रीण मला मिळाली नसती.” बघता बघता एक वर्ष पूर्ण झालं.

सुट्ट्या सुरू झालेल्या. त्यामुळे सावनीच येणं पण कमी झालं. तसच जुई पण सुट्टी म्हणून फिरायला गेली. पण ती जाईल तिथे आठवणीने सावनीसाठी काहीतरी घेऊन यायची. सुट्ट्या पण आता संपत आल्या होत्या. कॉलेज सुरू होणार म्हणून जुई ने तिला फोन लावला. पण तिने काही उचलला नाही. ती कामात असेल थेट कॉलेज मध्ये भेटू असा विचार करून जुई ने परत कॉल केला नाही.

जुई कॉलेज मध्ये आली.आल्या आल्या तिला सावनी येताना दिसली. पण ती चालत नाही तर गाडीवर होती. तिने नवीन गाडी विकत घेतली होती. तिला पाहून जुईला खूप आनंद झाला. ती तिला हाक मारून पुढे जाणार तोच सावनी तिथून निघून गेली. जुई ला समजलं नाही तिने अस का केलं. तरी गाडीवरून लक्ष गेलं नसेल अशी समजून घालून ती आत आली.

पण वर्गाकडे जातानाही सावनीने जुई ला ओळख दाखवली नाही. जुई जेव्हा जेव्हा तिच्याशी बोलायचं प्रयत्न करायची तेव्हा तेव्हा ती तिथून निघून जायची. त्यांची काही ओळख आहे असं ती दाखवती नव्हती. ती जवळपास जुई ला विसरली होती.

जुईला याचं खूप वाईट वाटलं. ती घरी येऊन रडू लागली. तिला दुःख याचा नव्हत की तिने मदत करून सावनी अशी वागली. पण जीला ती इतकी चांगली मैत्रीण मानत होती तीच तिला विसरून गेली होती. ती घरात अशीच रडत बसलेली होती. तेव्हा तिचे बाबा खोलीत आले. त्यांनी तिला रडायचं कारण विचारल्यावर जुई ने सर्व हकीकत त्यांना सांगितली.

त्यांनी तिला आधी शांत केलं व म्हणाले, “जुई बाळा, या जगात सर्व प्रकारची माणसं असतात. काही जण केलेल्या गोष्टींची जाण ठेवतात, काहींची त्यांची कारण असतात अस वागण्याची, तर काही जण विसरूनच जातात.

पण म्हणून आपण वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. तू तुझ्या पद्धतीने तिच्याशी चांगल वागलीस, मैत्रीण झालीस. इतकं करूनही जर ती तुला विसरली असेल तर तो तुझा दोष नाही आणि जी व्यक्ती आपल्याला विसरली आहे तिला आपण लक्षात ठेवून तरी काय फायदा होणार? तू यातच अडकून राहिली तर बाकीच्या गोष्टींवर कसं लक्ष देशील?

आपल्याला निसर्गाने जरी लक्षात ठेवण्याची शक्ती दिली असली तरी ज्या गोष्टी त्रासदायक आहेत त्यांना त्या त्या वेळीच सोडून दिलेले बर नाही का? याच अनुभवनांतून पुढे जायचं असतं बाळा. यातूनच आपण माणसं ओळखायला शिकतो. त्यामुळे तूही आता ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नको.

एक अनुभव म्हणून जप पण अश्या माणसाला लक्षात ठेवू नको जी तुला विसरली आहे. कृष्णाने सांगितलं तस आपण कर्म करत राहायचं, फळाची अपेक्षा ठेवायची नाही. तू जशी आहेस तशी राहा, या अनुभवांना तुझा गुरु बनव आणि कोणाला किती महत्त्व द्यायचं हे शिकून पुढे जा.” जुईला बाबांचं बोलण पटलं व त्यातून तिने धडा घेऊन नवीन सगळ्याची सुरुवात केली. तर ही होती जुई ची कथा.

असच आपल्या सर्वांच्या बाबतीत कधी ना कधी होत. आपण एखाद्याला मदत करतो, जीव लावतो आणि काही काळाने ती माणसं आपल्याला विसरुन जातात. त्याची कारण काहीही असू शकतील पण त्या माणसांनी आपल्याला विसरुन पण आपण त्यांना विसरत नाही. पुन्हा पुन्हा त्या आठवणी काढून स्वतः ला मात्र त्यात अडकवून ठेवतो. ज्याने आपलं नुकसान होत.

म्हणून गोष्टी वेळेवर सोडून देता आल्या पाहिजेत. भलेही आपल्या आयुष्यात कमी लोक असतील पण ती आपली जाण ठेवणारी असावीत. जी लोकं आपल्याला महत्त्व देत नाहीत त्यांना आपण लक्षात ठेवून वेळ खरच करण्यात काही अर्थ नाही. म्हणून त्यांना आपण पण विसरुन पुढे जायला पाहिजे.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


 “आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

4 thoughts on “पुढे चालायचं असेल तर त्यांना विसरण्याचा प्रयत्न करा, जे तुम्हाला विसरलेत…”

  1. खूप सुंदर लेख आहे, माझा स्वभाव पण असाच आहे

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!