Skip to content

‘इज्जत आणि संपत्ती’.. बापाने कमावलेली वाढवायची असते, विकायची नसते.

‘इज्जत आणि संपत्ती’.. बापाने कमावलेली वाढवायची असते, विकायची नसते.


गीतांजली जगदाळे

(मानसशास्त्र विद्यार्थिनी)


‘इज्जत आणि संपत्ती’… ही बापाने कमावलेली असते, ती वाढवायची असते विकायची नसते. याचाच अर्थ आई-वडिलांनी केलेल्या कष्टांची किंमत आणि जाणीव ठेवा. जेव्हा या गोष्टींची जाणीव मनात असते तेव्हा त्यांची इज्जत आपोआपच राखली जाते. मग आईवडिलांची संपत्तीचं काय तर त्यांच्या प्रत्येक गोष्टीची जाणीव ठेवून त्या गोष्टी जपल्या जातात.

आईची महती खूप थोर-महान व्यक्तींनी त्यांच्या कविता किंवा कथांमधून गायली आहे. पण वडील म्हणजे कठोर असल्याने त्यांच्या प्रेमाबद्दल फारच कमी बोललं जातं. प्रत्येकाचे आईवडील हे वेगवेगळ्या स्वरूपात आपापल्या परिस्थितीनुसार आपल्या मुलांना जितकं देता येईल तितकं देत असतात. प्रसंगी स्वतःच्या कितीतरी गरजांचा त्याग करून आपल्या मुलांची हौस पुरवत असतात.

कित्तेक मुलांना मोठं झाल्यावर याची जाणीव असते, पण बरेच असेही असतात जी याची जाणीव न ठेवता, “त्यांनी काही उपकार नाही केले”, अशी भावना मनात ठेवून असतात. आपले पालक आपल्यासाठी ज्या खचता खातात ते आपल्यावरच प्रेम असल्यामुळे नाकी त्यांचं कर्तव्य असल्या कारणाने. आपण त्यांची मुलं असल्याने त्यांची ती कर्तव्य असतातच, नाही असं नाही. पण बऱ्याच गोष्टी कर्तव्याने पूर्ण होत नसतात, त्याला माया आणि प्रेमाची जोड असावी लागते.

आपल्याला जन्म देण्यापासून, आपल्यासाठी ज्या-ज्या हालअपेष्टा सहन करत त्यांनी आपल्याला वाढवलं त्यासाठी आपल्याला नेहमी कृतज्ञता वाटली पाहिजे. आजकाल कितीतरी मुलं आईवडील वयस्कर झाल्यावर त्यांना घरातली अडगळ समजत असतात. पण याच अडगळीने आपल्याला जन्म दिला होता याचा मात्र त्यांना विसर पडलेला असतो.

वडिलांनी आत्तापर्यंत जी इज्जत कमावलेली असते तिच्यामुळे लोक आपल्याला ओळखत असतात आणि त्यामुळेच समाजात आपल्याला एकप्रकारचं स्थान, आणि आदर मिळत असतो. अमक्या- तमक्याचा मुलगा म्हणून का होईना आपल्याला अस्तित्व मिळालेलं असत, त्यानंतर जे काय तुम्ही ओळख निर्माण करता भले मग ती तुमच्या वागणुकीने, कर्तृत्वाने का असेना, पण सुरुवात मात्र वडिलांमुळे झालेली असते.

जेव्हा आईवडिलांची गरज संपते तेव्हा ते नकोसे होतात. पण त्यांची संपत्ती मात्र कधीच नको असते, असं होत नाही. त्यासाठी कितीतरी मूर्ख माणसे आईवडील मारायची सुद्धा वाट पाहत असतात, का तर त्यांची प्रॉपर्टी ते जिवंत असताना विकणं अवघड असत.

पण अशा मुलांनी हा विचार करायला हवा , की तीच संपत्ती कमवायला त्या वडिलांना किती कष्ट घ्यावे लागले असतील, त्यांची कितीतरी हौसमौस करायची राहून गेलेली असणार आणि कितीतरी वेळ त्यांनी यासाठी गुंतवलेला असणार. आणि अशी प्रॉपर्टी आपण विकायला निघत असतो, ज्यात फक्त आपण ती वस्तू,जमीन जे काही का असेना , तेवढंच विकत नसून, कुठेतरी त्यांची भावनिक गुंतवणूक, त्यांचे कष्ट, वेळ सगळंच विकायला निघालेलो असतो.

मी असं म्हणत नाहीए की हे प्रॉपर्टी विकणं पूर्णपणे चूक आहे. पण गरज आणि पैशांची हाव यातला फरक लक्षात घेतला असता तुमच्या लक्षात येईल की सेम प्रॉपर्टी विकणं कधी योग्य ठरू शकत आणि कधी अयोग्य. प्रॅक्टिकल लाईफ जगताना इतके ही दगड बनू नका, की ज्यांनी हे तुमच्यासाठी उभारून ठेवलंय त्यांनाच तुम्ही दुखावताल.

प्रॉपर्टी, संपत्ती या गोष्टींपेक्षा जेव्हा तुम्ही तुमच्या आईवडिलांना महत्व देताल तेव्हा आपोमतःच तुम्ही त्यांची इज्जत आणि त्यांच्या संपत्तीमागच्या भावना आणि कष्ट समजून त्यांचा योग्य तो आदर करू शकाल. जी गोष्ट आपल्याला टिकवता येत नसेल किंवा वाढवता येत नसेल, ती गोष्ट नष्ट करण्याचा देखील आपल्याला काही एक अधिकार नसतो.

जस आपल्याला वाढवणं, आपलं शिक्षण आणि बाकी गरजा पूर्ण करणं त्यांचं कर्तव्य असत, त्याचप्रमाणे त्यांच्या गरजा, त्यांची इज्जत, त्यांचा आदर या गोष्टींची जबाबदारी आणि कर्तव्य आपलं आहे. त्यामुळे जशी त्यांची कर्तव्य आहेत, उपकार केले नाहीत अशा भावना मनात येतात, त्याचप्रमाणे तुम्ही देखील तुमचं कर्तव्य पार पाडत असून उपकार करत नाही आहात याची जाणीव मनात बाळगा.

शेवटी आपल्यालाही कधीतरी म्हातारं व्हायचंच आहे! तेव्हा आपली इज्जत आणि आपली संपत्ती ज्यापद्धतीने हाताळली जावी असं आपल्याला वाटत, त्याचप्रमाणे आपण ही आपल्या आईवडिलांसोबत वागायला हवं.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!