Skip to content

डोळे बोलतात, आपण त्या जाणायच्या असतात!

डोळे बोलतात, आपण त्या जाणायच्या असतात!


सौ. माधुरी पळणिटकर


डोळ्यात वाच माझ्या भाषा डोळेही बोलतात फक्त जगण्याची आस लागते पूर आसवांचा डोळ्यात येतो तेव्हा आपल्या माणसांचीच साथ असते त्यागालाच जीवन मानले तर जीवन जगण्याची सार्थकता असते दानातच पुण्य असते पाप-पुण्याची संकल्पना प्रत्येकाची वेगळी असते.

काही भाषा डोळे बोलतात आपण त्या जाणायच्या असतात. अश्रूंच्या वाहणार्‍या धारा पुढे होऊन पुसायच्या असतात कधी हास्याच्या, कधी दु:खाच्या कधी करुणेच्या, कधी श्‍वासाच्या कधी रागाच्या, कधी आनंदाच्या असंख्य भावना डोळे बोलतात कळायच्या असतील तर त्या दृष्टीनेच वाचायच्या असतात.

खरंच डोळे म्हणजे शरीराचा अविभाज्य, अत्यावश्यक घटक. डोळ्यांशिवाय आयुष्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. जीवन जगण्याचा आधार म्हणजे डोळे.

तोे शरीरातील अत्यंत नाजूक घटक असल्यामुळे प्रत्येक जण त्याची काळजी घेत असतो. तुमचा चेहरा क्रिया-प्रतिक्रिया सांगतो तसेच सर्वप्रथम तुमचे डोळे सांगतात आणि ही क्रिया इतकी जलद गतीने होते की कधीकधी तुम्ही त्यांना प्रतिबंधही घालू शकत नाही.

डोळ्यांचे आकार वेगळे, रंगही वेगळे. भाषा फक्त बोलण्यानेच व्यक्त होते का? नाही. खूप गोष्टी डोळ्यांनी पण बोलता येतात. लहान बाळाला जेव्हा संवाद साधता येत नसतो, तेव्हा तो त्याची प्रतिक्रिया चेहर्‍यांवरच्या भावांनी डोळ्यांच्या भाषांनी तर व्यक्त करत असतो आणि आईला त्याचा प्रत्येक शब्द न बोलताही कळत असतो.

म्हणूनच दृष्टीला जीवनात विशेष महत्व आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा चेहरा असतोच पण त्यातील सर्वात महत्वाचा घटक डोळे. मग ही दृष्टी चांगली किंवा वाईट वर्गीकरणात विभागली जाते. परिस्थिती सापेक्ष आपल्याशी संपर्कात येणार्‍या लोकांना आपण कोणत्या दृष्टीने बघतो त्यावर त्यांचं आपल्या मनातील स्थान ठरत असतं.

तुम्हाला जर चांगले अनुभव व्यक्तींकडून आले तर आपोआपच तुम्ही त्यांच्याकडे चांगल्या दृष्टीनेच बघता. पण आपली विशेषता जर अशी असेल तर वाईट व्यक्तींशीही आपण चांगल्याच दृष्टीकोनाने बघू शकतो का?

आपल्याला येणार्‍या कडू-गोड अनुभवांवरून आपण मत बनवतो आणि त्या दृष्टीकोनातून त्या व्यक्तीकडे बघतो. मग दृष्टीकोन घडतो. तुमचे आचरण, तुमचा स्वभाव याचे दर्शन तुमच्या व्यक्तीमत्वात घडते.

संवादाची सुरवात हसून गोड बोलण्याने होते तसेच तुमच्या आनंदित दृष्टीनेही होते. कारण प्रथम तुमचे डोळे, तुमची दृष्टी समोरची व्यक्ती हेरते आणि त्यानुसार प्रतिक्रिया व्यक्त करते. म्हणून संवाद कौशल्य आत्मसात करताना सकारात्मक दृष्टीकोन महत्वाचा भाग ठरतो.

कारण तोच समोरच्यावर तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पाडत असतो. दृष्टीचे वेगळे पैलू, डोळ्यांमध्येही भावनांचे अनेक तरंग. कधी आनंद, कधी दु:ख, कधी समाधान, कधी निरागस, कधी नकार, कधी होकार! दोनंच डोळे भाषा व्यक्त करण्याचे साधन जणू! कधी कधी भावना व्यक्त करताना शब्दही मूक होऊन जातात आणि अशा वेळेस डोळेच खूप काही मूकपणे बोलून जातात. या अनुभवाची प्रचिती प्रत्येकालाच आपल्या जीवनात येत असते.

जग सुंदर आहे, जग वाईटही आहे. अगदी तशीच दृष्टी चांगलीही आहे, वाईटही आहे. पण त्या मागचा दृष्टीकोन महत्वाचा आहे. म्हणूनच जीवनात दृष्टी जितकी महत्वाची तसाच दृष्टीकोनही महत्वाचा ठरतो. माणसांची पारख त्याच्या दृष्टीवरुनच होते. पवित्र भावना तुम्हाला कायम पवित्र दृष्टी प्रदान करते.

तुमचं व्यक्तिमत्व आनंदित, पारदर्शी बनवते आणि हेच तुमच्या यशाचे रहस्य असते. कधी कधी जीवनात असाही प्रत्यय येतो, जेव्हा तुमचे डोळे वेगळीच भाषा बोलत असतात आणि तुम्ही वेगळीच भाषा बोलत असता. त्यामुळेच जे तुमच्या मनात, हृदयात असते तेच तुमची दृष्टी व्यक्त करत असते. नजरेला नजर देऊन संवाद व्यक्त करण्यात, त्या व्यक्तिमत्वाच्या खरेपणाची पावती असते.

खूप वेळा दुसर्‍या व्यक्तीला फसवताना सदसदविवेकबुध्दीच्या दडपणाखाली त्याच्या नजरेला नजर देण्याचे टाळले जाते. लहान, निरागस मुलाच्या नजरेमध्ये खट्याळपणाचा भाव असतो तर आईच्या डोळ्यात कायम करुणेचा, मायेचा वर्षाव असतो. मुलांनी सहस्त्र अपराध केले तरी आईची दृष्टी ही करूणेची व मायेची पखरण करणारीच असते.

म्हणूनच स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी या उक्तीची जाणीव जीवनात पदोपदी होत असते. मनुष्य जन्म लाभल्यावर आपण किती जगलो, आपले स्थान इतरांच्या दृष्टीने कसे ठरले हेही महत्वाचे ठरते. इतरांच्या दृष्टीत कायम आदरणीय स्थान मिळवण्यासाठी कर्तृत्वाची जाण असावी लागते.

आपण खूप भाग्यवान आहोत. जगाची अनुभूती घेण्यासाठी आपल्याला दृष्टी आहे पण अशी कितीतरी जण अंधारमय आयुष्य जगात आहेत ज्यांच्याकडे दृष्टीची ज्योतच नाही. अंधार त्यांच्या डोळ्यातही आणि आयुष्यातही! फक्त कल्पनेच्या भोवतीच त्यांचं जग आधारित असतं. अशांना आपणही नेत्रदान करून त्यांचं जग सुंदर करू शकतो.

याहून जगात कुठले पुण्य कर्म असेल. दानाची महतीच एवढी आहे की तुमचे पुण्याचे पारडे जडच होत असते. मरणोत्तर नेत्रदान करून एखाद्याच्या जीवनात तुमच्या डोळ्यांनी त्याचे आयुष्य प्रकाशमय होणार असेल तर सर्वांनीच ते करायला काय हरकत आहे?

आयुष्य जगतानाही आणि आयुष्यातून जातानाही परमात्मा तुम्हाला पुण्य करण्याच्या अनेक संधी देतो त्या संधीचा आपण दुसर्‍यांकरिता उपयोग केला तर किती चांगले होईल. समाधानाने तृप्त केलेल्या आत्म्याचे आशीर्वाद स्वत:च्या दृष्टीलाही समाधान व आनंद देतात.

जगात दृष्टीपथातच जेवढे समोर आहे त्यापलिकडेही सुख-दु:ख आहे. कदाचित ते आपल्या कल्पनेपलिकडे आहे. सहज रस्त्याने जातानाही ते लक्षात येते. फक्त गरज असते तिकडे आपली दृष्टी जाण्याची.

दृष्टीपलिकडच्या जगाला जाणून घेण्याची. लहानपणी आई दृष्ट लागू नये म्हणून दृष्ट काढायची तेव्हा मी विचारायचे आई खरंच दृष्ट लागते का? आणि तू दृष्ट काढलीस की खरंच दृष्ट निघाली असं कशावरून होत असेल? तेव्हा आइं म्हणायची हा थोडा विश्‍वासाचा प्रश्‍न आहे.

पण वाईट नजरेची दृष्ट लागली की मुलं आजारी पडतात. सर्वांचीच नजर चांगली असेलच असे नाही. दुर्दैवाने समाजात कुणाचे तरी चांगले झाले की न बघवणारेच पुष्कळ असतात. अशी दृष्टी कुणाच्याच नजरेत नसावी असे प्रकर्षाने वाटते.

आज लहान मुलींवर बलात्कार होतात तेव्हाही हेच जाणवते इकती नीच, वाईट दृष्टी या नराधमांच्या नजरेतच का उत्पन्न होती? कारण यांना दृष्टी मिळण्याचा अधिकारच नाही. याउलट जे अंध लोक अंधाराशी झगडतायत त्यांनाही दृष्टी मिळावी व त्यांच्या जीवनात प्रकाश यावा. अंतरंगातल्या भावनांचे दर्शन म्हणजे दृष्टी.

मुलांचे यश बघून अभिमानाचा वर्षाव, तर कधी आपल्याच माणसांना होणार्‍या यातना बघून ती घेते मनाचा ठाव. अशी जादू या दृष्टीत असते. भावना डोळ्यात असतात पण त्यासाठी डोळे आधी वाचावे लागतात.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!