‘अभिव्यक्ती’.. उत्तमरीतीने स्वतःला इतरांसमोर प्रस्तुत कसे करता येईल ??
दिपाली मुळे,
औरंगाबाद.
प्रत्येक माणसास आपण उत्तम रीतीने इतरांसमोर प्रस्तुत व्हावे असे वाटत असते. ही नैसर्गिक भावना आहे .ज्याप्रमाणे “व्यक्ती तितक्या प्रकृती “त्याच प्रमाणे “व्यक्ती तितक्या अभिव्यक्ती “असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही .प्रत्येक जणांचे आपापले भावविश्व असते ,अनुभवाचे जग असते ,विचार प्रक्रिया असते व स्वभावही असतो .त्या सर्व गोष्टींचा परिणाम त्याच्या अभिव्यक्तीवर होत असतो.
अभिव्यक्ती म्हणजे व्यक्त होणे एक्स्प्रेसिंग युवरसेल्फ म्हणजे अभिव्यक्ती. अभिव्यक्ती वरून माणसाच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लावता येऊ शकतो. कोणी गाणं म्हणून व्यक्त होईल ,कोणी रांगोळी चित्रकला द्वारे व्यक्त होईल तर कोणी बोलून नाटक, अभिनयाद्वारे व्यक्त होईल तर कोणी आपल्या कामाद्वारे ….. ही व्यक्त होण्याची ज्याची त्याची पद्धत आहे .
पण विचार केल्यास लक्षात येते की अभिव्यक्ती ही काही एका दिवसात होणारी प्रक्रिया नाही .त्यासाठी भरपूर काळात अपेक्षित आहे. व्यक्तीच्या ग्रहणशक्ती प्रमाणे हा काळ कमी जास्त असू शकतो .काहीवेळा अभिव्यक्ती ही नैसर्गिक देणगी देखील असते .म्हणजे कसं व्यक्त व्हावं एखाद्या व्यक्तीला मिळू शकते .पण तरीही अभिव्यक्ती ही सरावाने कौशल्याने समृद्ध करता येते ही जाणीव मात्र आज आपल्याकडे नाही असे खेदाने म्हणावे लागते.
कारण समाजजीवनातील माणसाची अभिव्यक्ती ही त्याच्या वैयक्तिक जीवनातील अभिव्यक्ती पेक्षा अतिशय वेगळी आणि विरोधाभास दर्शवणारी आहे. असो …. तूर्तास हा आपला विषय नाही .तर मूळ विषय हा आहे की उत्तम अभिव्यक्ती कशी साधावी ?त्यासाठी काय करता येईल ?
आजच्या स्पर्धेच्या काळात फक्त आणि फक्त बुध्यांकाला(IQ) महत्त्व आले आहे. म्हणजे इंटेलिजन्स कोशंट .त्यामुळे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स शिवाय आपण आपली पुढची पिढी जगूच शकत नाही असे वाटते .आर्टिफिशिअल इंटेलिजन्स जर एवढी सवय आपल्याला लागत असेल तर सृजनशिलता ही कालबाह्य होईल. न
वीन विचार कृती करण्याची क्षमता नष्ट होऊन जाईल .माणसाला इतर प्राण्यांपासून जर काही वेगळे करत असेल तर ती त्याची बुद्धी आणि भावना होय .पण माणूसपणाची ही लक्षणे जर नष्ट झाली तर अभिव्यक्ती कशी समृद्ध होणार? हा मोठा गहन प्रश्न आज आपल्यासमोर उभा आहे. जितका आयक्यू म्हणजे बुध्यांक महत्त्वाचा तितकाच इ क्यू म्हणजे भावनांक महत्त्वाचा आहे.
जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांचा आयक्यू अतिशय चांगला होता .तरीही व्यावहारिक जीवनात त्यांचे वागणे म्हणजे अभिव्यक्ती ही विक्षिप्तपणाचीच होती. म्हणजे बुध्यांक थोडाफार कमी असला तरीही चालू शकते पण भावनांक मात्र चांगला हवा. माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा बुद्ध्यांक चांगला होताच पण त्यांचा भावनांक ही चांगला होता त्यामुळे त्यांची अभिव्यक्ती ही समृद्ध होती हे आपण मान्य करतोच नाही का? मग हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा हव्यास का? त्यापेक्षा अंतःप्रेरणेने सृजनशीलता जपणे व वाढवून प्रत्यक्ष जीवनात त्याचा वापर करता येणे श्रेयस्कर ठरणार नाही का?
आता तुम्ही म्हणाल की अंत: प्रेरणेचा आणि अभिव्यक्ती चा काय संबंध? तर खूप जवळचा संबंध आहे .आधी अंतःप्रेरणा ची ओळख करून घेऊया ….. बोली भाषेत याला सिक्स्थ सेन्स असे म्हणले जाते. कोणी कोणी त्याला गट फिलिंग, इनर व्हॉइस असेही म्हणतात. मनाच्या संपूर्ण विकसित अवस्थेतील येणारी ही प्रेरणा म्हणजे अंत:प्रेरणा होय. मुलींना या अंतःप्रेरणेचे वरदान निसर्गत: मिळालेले असते पण मुलांना ही अंतःप्रेरणा समजून घेऊन जाणीवपूर्वक वाढवावी लागते .
माणसाला अंत: प्रेरणा समजून घेण्यासाठी स्वतःला पूर्णपणे ओळखायला शिकावे लागते. त्यानंतर स्वतःचे गुणदोष जाणून घेऊन दोष घालवून गुण वाढवावे लागतात .शरीर ,मन बुद्धी यांचा ताळमेळ साधायचा कसा शिकावे लागते. त्याच बरोबर स्वभाव घडवावा लागतो. स्वशोधाचा प्रवास धीराने संयमाने पूर्ण करावा लागतो . तो पूर्ण झाल्यावर मग वळावे लागते ते स्वबोधाकडे …….. म्हणजे आपल्याला आपली बलस्थाने व उणिवा कळाल्या हा झाला स्व शोध ,पण त्या उणिवा कशा घालवायच्या व बलस्थाने कशी वाढवायची याची प्रत्यक्ष कृती म्हणजे स्वबोध ….
बोध हा वारंवार करून घेतला तरच तो अमृताचे काम करतो .म्हणजे अंत:प्रेरणा जागृत होऊन त्याप्रमाणे माणूस काम करू लागतो इतरांनाही प्रेरणा देऊ लागतो ,थोडक्यात काय तर त्याची अभिव्यक्ती समृद्ध होते. म्हणूनच अंतःप्रेरणा म्हणजे इंट्युशन ही एक शक्ती आहे जी माणसाला समृद्ध करते प्रत्येक स्तरावर .
अशावेळी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स चा वापर करण्यापेक्षा इंट्युशनल सायन्स चा वापर आपण सर्वजण शिकलो तर आपली सर्वांची अभिव्यक्ती ही समृद्ध होईलच पण विरोधाभास नसणारी ही नसेल. परिणामी थोर व्यक्तिमत्व घडण्यास मदत होईल कारण चारित्र्यवंताशिवाय राष्ट्र पोरके ठरते. चरित्र घडवण्यात अभिव्यक्ति समृद्ध असणे अपरिहार्य आहे. हीच आजच्या काळाची खरी गरज आहे नाही का?
नैसर्गिक अभिव्यक्ती सोबत अंतःप्रेरणा याची जोड असेल तर अभिव्यक्ती समृद्ध होते .उदाहरण पाहूया डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची आर्थिक परिस्थिती शास्त्रज्ञ होण्यासारखी नव्हती. परंतु शास्त्रज्ञ होण्याची त्यांची अंत:प्रेरणा होती व त्याप्रमाणे अभिव्यक्ती देखील असल्याने ते प्रसिद्ध शास्त्रज्ञ झाले त्याचबरोबर देशासाठी भरीव कार्य ते करू शकले.
या अभिव्यक्तीसाठी प्रथमतः कुटुंबाचा पाठिंबा त्यांना मिळाला व त्यानंतर सर्व देशवासीयांचा पाठिंबा मिळाला. प्रसिद्ध हिंदी कवी हरिवंशराय बच्चन आपल्या कवितेत म्हणतात “मन का हो तो अच्छा और ना हो तो और भी अच्छा” म्हणजे आपल्या मनाप्रमाणे घडले तर चांगलेच पण नाही घडले तर अजूनच चांगले कारण ते ईश्वराच्या मनाप्रमाणे असते. आणि हेच ईश्वराच्या मनाप्रमाणे घडणे म्हणजे आपल्यासाठी अंतःप्रेरणा होय .
चित्त चतुष्टय म्हणजे मन, बुद्धी, अहंकार, चित्त, या प्रवासात चित्ता पर्यंत पोहोचल्यास अंतःप्रेरणा प्राप्त होते. अंत:प्रेरणा आणि जीवन विकासाची कौशल्ये यांची जोड बनल्यास अभिव्यक्ती समृद्ध होते. जीवन विकासाची कौशल्य म्हणजे श्रवण, वाचन, लेखन, संभाषण, संघटन, विचार प्रक्रिया, सृजनात्मकता, अंतरज्ञान शक्ती, व्यवस्थापन, सादरीकरण कौशल्य सोबतच कलात्मकता या सर्वांचा ताळमेळ उत्कृष्ट झाला तर उत्तम अभिव्यक्ती असणारे व्यक्तिमत्त्व घडतील.
आज अभिव्यक्तीला विकृत स्वरूप आलेले दिसते. त्यामुळे आपले म्हणणे मांडण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्ती चा आधार घेतला जातोय .वरवर इतरांशी चांगले वागणारे मनातून त्यांच्याबद्दल द्वेष, ईर्ष्या, मत्सर बाळगून असतात .कटकारस्थाने गुन्हे यात प्रवृत्तीतून बराच वेळा घडतांना दिसतात .योग्य वयात योग्य अभिव्यक्ती न झाल्याने बरेच व्यक्तिमत्व विकृत मानसिक तिकडेच झुकताना दिसतात.
जर आपल्याला सुदृढ ,सशक्त ,खंबीर आणि निरोगी समाज निर्माण करायचा असेल तर या सर्व मुद्द्यांकडे आपण गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे .अभिव्यक्तीची समृद्धी यासाठी आवश्यक आहे यशात हुरळून न जाणे व अपयशाने खचून न जाणे अशी अभिव्यक्ती असल्यास निरोगी समाज निर्माण होऊ शकतो. अभिव्यक्तीची समृद्धी किंवा अभिव्यक्ती ही व्यक्तीचा स्वभाव, अनुभव, भावविश्वावर बऱ्याचदा अवलंबून असते पण आजूबाजूच्या वातावरणावर घडामोडींवर हे अवलंबून असते.
त्यामुळे या सर्व बाबींचा अभ्यास करणे त्यासाठी आवश्यक आहे. सोबत सराव व कौशल्यांचा प्रत्यक्ष वापर करणे अपरिहार्य आहे .शेवटी प्रत्येकाचे जीवन अभिव्यक्ती शिवाय अपूर्ण आहे. प्रत्येकाला जीवनात सुख, समाधान, शांती, यश हवे असते…. यासाठी योग्य वयापासून योग्य अभिव्यक्ती असणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच समृद्ध अभिव्यक्तीसाठी प्रयत्नरत राहावे हाच युगधर्म आहे आणि काळाची गरज देखील…….
आता निर्णय तुमचा आहे की अंतःप्रेरणा ,कौशल्ये यांचा प्रत्यक्ष जीवनात वापर, स्वशोध व स्वबोध यांच्या सहाय्याने अभिव्यक्ती समृद्ध करून निरोगी समाज निर्माण करायचा आहे की तसेच चालू द्यायचे ! निर्णय सर्वस्वी तुमचा आहे…….. धन्यवाद!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Khupach Sundar ritine Ani paripurn lihile ahe , lekh manala sparsh karun gela, ani vichar karayala bhag padale.
Aprateem.
स्वशोध व स्वबोध यातून अभिव्यक्तीकडे नेणारा अप्रतिम लेख!
Very useful writeup
खूपच छान