हवी तशी स्थिती निर्माण होईल मग निर्णय घेऊ याची वाट पाहाल तर कधीच कृती घडणार नाही.
मेराज बागवान
‘निर्णय’ घेणे ही पण एक कलाच आहे.आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कोणते ना कोणते निर्णय हे घ्यावेच लागतात. मग ते निर्णय कितीही कठोर असले तरी निर्णय घेणे भागच असते. कोणताही निर्णय योग्य किंवा अयोग्य असतो असे नसते पण वेळेवर कोणतातरी एक निर्णय घेणे अत्यंत महत्वाचे असते.
कारण त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. पण कधी कधी आपण असा विचार करतो की , ‘हवी तशी स्थिती निर्माण होईल मग निर्णय घेऊ’. पण या स्थितीची वाट जर आपण पाहत बसलो तर कधीच कृती घडू शकणार नाही.
कित्येकदा काही जण असा विचार करतात , “जरा कामातून मोकळा झाल्यावर कुटुंबियांसोबत बाहेर दूर कुठेतरी काही दिवस फिरायला जाऊ”.पण अशी कृती कधी घडतच नाही.कारण काम हे काम असते.एक काम झाले की दुसरे कायम हजर असते.त्यामुळे ‘ कामातून मोकळे होणे’ ही गोष्ट तशी दुर्मिळच.म्हणूनच , आहे त्या व्यापातूनच आपणच थोडा ‘ब्रेक’ घेऊन ‘सुट्टीवर’ जावे लागते.
अशा प्रकारच्या अनेक गोष्टी घडत असतात.पण आपल्याला जी स्थिती अपेक्षित आहे तोपर्यंत फक्त वाट पाहत राहणे कधीच योग्य नसते.’विश्वास असणे’ वगैरे ह्या सर्व गोष्टी आहेतच पण काळ कुणासाठीच थांबत नाही.आणि त्यामुळे आपण देखील काळाबरोबर पुढे जात राहिले पाहिजे.
काही जण म्हणतात , “मी रिटायर्ड झाल्यानंतर सगळ्या जबाबदाऱ्या मुलांवर सोपवून , पत्नी बरोबर शांत ठिकाणी जाऊन राहणार आहे”. पण हा झाला भविष्यातील विचार.पण वर्तमानात तर ती व्यक्ती आपल्या जबाबदार्यांना इतरांच्या खांद्यावर टाकण्यास तयारच नसते.मग भविष्यात एका दिवसात, हा फरक कसा बरे घडेल? मग जर का रोजच हळूहळू जबाबदारी मुलांवर सोपवायला सुरू केले की मग त्याचे फळ हळू हळू ‘रिटायर्ड’ झाल्यावर परिणाम दिसू लागेल.
आणि मग खऱ्या अर्थाने ‘पत्नी सोबत शांत ठिकाणी राहता येईल’.
म्हणूच, आपल्याला जी कृती घडावी असे वाटते ना,त्यासाठी पटकन निर्णय घेता आले पाहिजे.वेळीच निर्णय घेतल्याने आणि त्यानुसार कृती केल्याने आयुष्य सुरळीत होऊ शकते.
कोणी एक तरुण, ज्याला मोठया पगाराची नोकरी आहे.तो देखील बरयाच वेळा असे म्हणतो.अजून दोन वर्षे थांबतो, चांगले ‘प्रोमोशन’ मिळवतो आणि मगच ‘लग्न’ करतो.त्याशिवाय मी लग्नच करणार नाही.पण ह्या विचारामुळे , वर्षे उलटून जातात, लग्नाचे वय देखील होते आणि मग निर्णय आणि कोणतीच कृती घडत नाही.म्हणूनच आहे तो क्षण जगता आला पाहिजे.
गृहिणी तर कायम इतरांसाठी जगत असतात.त्या देखील बऱ्याच वेळा म्हणतात, “मुलं मोठी झाली, मार्गी लागली की मी स्वतःचे छंद जपेन.” पण तिचे बिचारीचे आयुष्य मात्र सर्वांचे करण्यातच जाते.कारण आहे त्या स्थितीत ती तिला जे वाटते आहे ते करीत नाही.काळ निघून जातो आणि कृती मात्र कोणतीच होत नाही.
कोणी मुलगी म्हणते, ” माझ्या भावंडांचा सांभाळ करायला कोणी नाही.त्यांचे सर्व स्थिरस्थावर झाल्यानंतरच मी माझ्या आयुष्याचा विचार करेन आणि मगच जोडीदार वगैरे निवडेल.मान्य आहे, घरात इतर कोणी कर्ता व्यक्ती नसल्यामुळे ती असा विचार करत असेल.पण प्रत्येकाचे एक आयुष्य असते.
आणि प्रत्येकाला ते आयुष्य जगण्याचा हक्क असतो आणि तिचे तिचे आयुष्य सुरू झाले म्हणून ती थोडेच भावंडांकडे दुर्लक्ष करणार आहे? थोडेच तिचे त्यांच्या प्रतीचे प्रेम कमी होणार आहे ? त्यामुळे तिने तिचे आयुष्य थांबविणे चुकीचे आहे.
एवढा मोठे ‘कोरोना’ चे संकट येऊन गेले.पण थोडा काळ ‘लोकडाऊन’ मध्ये राहिल्यानंतर , पुन्हा सर्व व्यवहार, कामे सुरूच करावी लागली ना.कारण ‘कोरोना कायम राहणार आहे’ हे वास्तव आपण स्वीकारले आणि त्यानुसार पुढील वाटचाल आपण सुरू ठेवली आणि आज आपण पाहू शकतो की, कोरोनासह आपण जगायला शिकलो आहोत.म्हणूनच आहे त्या स्थिती निर्णय घेऊन वाटचाल करता आली पाहिजे.
वरती उल्लेख केलेल्या अशा विविध प्रकारच्या गोष्टी आपल्या सर्वांसोबतच घडत असतात. प्रश्न उरतो तो, निर्णय आणि त्यानुसार कृतीचा. कोणतीच स्थिती कायम नसते.एकदम छान स्थिती किंवा एकदम वाईट स्थिती असे ही काही नसते.
आयुष्यात टप्प्याटप्प्यावर निरनिराळी स्थिती आपल्यासमोर येते.आणि प्रत्येक गोष्टीला सामोरे जावे लागते आणि त्या त्या स्थितीत जे जे निर्णय गरजेचे असतात ते ते निर्णय घेऊन कृती करणे देखील गरजेचे असते. आपण त्या त्या वेळीच जर असे करत गेलो तर आणि तरच आपल्याला जी गोष्ट अपेक्षित आहे ती होऊ शकते.आणि हे सगळे होणे, हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते. यासाठी कोणी इतर व्यक्ती कधीच जबाबदार नसते.
स्वतःचे आयुष्य ही देखील प्रत्येकावर असणारी खूप मोठी जबाबदारी आहे. आपण कित्येकदा इतरांसाठी जगत असतो.कारण त्यांची जबाबदारी आपल्यावर आहे हे आपण जाणून असतो. पण ह्या सगळ्यात आपले स्वतःचे देखील एक आयुष्य असते. आणि ते देखील जगणे गरजेचे असते.पण आपण अनेक जण कुटुंबियानसाठी सतत त्याग , संघर्ष करीत असतो.पण कुठे ना कुठे , कधी ना कधी मनाच्या एका कोपऱ्यात आपण आपले स्वतःचे असे एक आयुष्य कायम बंद करून ठेवलेले असते.
आणि हा आयुष्याचा बंद कप्पा च खरे तर आपले आयुष्य ‘बदलवणारा’ असतो.पण आपण हा कप्पा उघडायला कायम घाबरत असतो किंवा त्या कप्प्याविषयीचा आत्मविश्वास च आपण हरवून गेलेलो असतो.
म्हणूनच इतरांसाठी जगता जगता स्वतःसाठी देखील काही क्षण जगले पाहिजे, तेही आहे त्या परिस्थितीतच.कारण हवी तशी स्थिती कधी आयुष्यात येतच नसते.त्यामुळे आहे त्या प्रत्येक स्थितीत कधी कठोर बनून , कणखर बनून , आत्मविश्वासाने निर्णय घेऊन कृती करणे फार महत्वाचे आहे.
काही नाही, पण काळजी घ्या स्वतःची. कारण प्रत्येक व्यक्ती ‘एकमेव आणि अद्वितीय’ आहे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

संघर्षातून जात असताना, वेळेचं नियोजन अती महत्त्वाचे,आपली ताबडतोब कृती ही स्टेप स्तुत्य/प्रशंसनीय उक्रांती घडवणारी 🎆
Chan ,👌👌👌
Very Nice