प्रत्येक प्रयत्नात यश मिळत नाही, पण प्रत्येक यशाचं कारण हे प्रयत्नच असतात.
सोनाली जे.
प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे..ही खूप प्रसिद्ध म्हण आहे. उसाचा रस काढताना पहिल्या दोन वेळा पटकन रस निघतो. पण म्हणून लगेच तो चोथा म्हणून रस काढणारा ते टाकून देत नाही. पुढच्यावेळी थोडी शक्ती जास्त लावावी लागते. आणि जो चोथा वाटत असतो त्यातून ही भरपूर रस मिळतो. त्याने पहिल्या दोन प्रयत्नानंतर चोथा म्हणून टाकून दिले. प्रयत्न थांबविले तर त्याचेच नुकसान होईल. आणि उसांतला बराच रस ही वाया जाईल.
कधीतरी मागे वळून पाहताना असं अनेकदा वाटतं की छोट्या, छोट्या इच्छा ज्या त्या त्या वेळी पूर्ण करणं शक्य असूनही आपण केल्या नाहीत त्या आज “एक खंत” म्हणून मनात राहील्या आहेत. काळ सरतो तशी वेळही चकवा देऊन निसटून जाते. नंतर करू म्हणता म्हणता आशेच्या हिंदोळ्याची डोरच तुटून जाते…
कारण तिथे आपण प्रयत्न करणे सोडून दिले असते. आणि आपल्याला काही काळानंतर प्रकर्षाने जाणवू लागते की तेव्हा प्रयत्न करायला पाहिजे होते. आपल्या इच्छा पूर्ण करणे त्याकरिता परत परत प्रयत्न करणे गरजेचे होते.
आपल्या जन्मापासून आपण प्रयत्न करतच असतो. बाळ असताना भूक लागली हे आईला समजावे याकरिता बाळ रडत असते. ते रडणे म्हणजे काय तर आईला भूक लागली हे सांगण्याचा प्रयत्न च ना !!
बाळ .मान धरायला , उभे राहायला , चालायला शिकते , ते पहिल्या प्रयत्नात कधीच यश मिळत नाही त्याला. त्यासाठी उठणार ,एक पावूल टाकणार , balance , तोल जावून पडणार परत प्रयत्न करणार अशा अनेक प्रयत्नातून balance करत चालण्याचे यश मिळवीत असते. बोलायला शिकते तेव्हा ही सुरुवातीला एक एक शब्द मग ते बोबडे असतात. समजत नाहीत पण तेव्हा तेही ऐकायला छान वाटतात. कौतुक करत असतात मोठे . त्या वयात ही काही तरी वेगळे पण आनंद देणारे घडत असतें. आणि मग एक एक पूर्ण वाक्य .अनेक वाक्ये बोलू लागते.
अंतराळातील पहिली मोहीम असो, चंद्रवरची पहिली मोहीम किंवा अताची प्रत्येक मोहीम अगदी एव्हरेस्ट शिखर सर करणे असो. ते पहिल्या प्रयत्नात कधीच यशस्वी झाले नाहीत. आणि होत ही नाहीत. त्याकरिता सतत प्रयत्न करावे लागतात. सातत्य ठेवावे लागते. नवीन गोष्टी शिकणे गरजेचे असते.
डॉक्टर , engineer , IIT मध्ये असेल किंवा इंटरव्ह्यू असतील , सैन्यात भरती होण्याकरिता अनेक प्रयत्न करावे लागतात. मग स्पर्धा परीक्षा असतील तर अनेक कठीण अडथळ्यांच्या परीक्षा द्याव्या लागतात. त्यात कधी अपयश येते परंतु खचून न जाता परत प्रयत्न करावे लागतात. त्यात पूर्वी झालेल्या चुका सुधारण्याची संधी मिळते.
पूर्वीचा अनुभव असल्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. आणि आपल्याला तेच काम पहिल्या वेळेस अवघड वाटत असते. पण पुढच्या वेळी सोपे जाते. कारण साधारण काय आहे , कसे आहे , स्वरूप काय याची माहिती झालेली असते. त्यामुळे प्रत्येक प्रयत्नात यश मिळत नाही, पण प्रत्येक यशाचं कारण हे प्रयत्नच असतात.
प्रयत्न हे यश मिळविण्यासाठी पहिली पायरी म्हणले तरी चालेल. पण ती प्रत्येक पहिली पायरी यशस्वी असते असे नाही. तर अपयशातून यश मिळविण्याकरिता प्रेरणा मिळत असते. चुका हेच प्रयत्न असतात आणि आपल्याला पुढे यश मिळविण्यासाठी मार्गदर्शक ठरत असतात.
काही वेळेस नाती ही अशीच होतात. किरकोळ कारणे असतात पण त्यात उगीचच दुरावा येतो. अशा वेळी पहिल्या प्रयत्नात नसेल पण एक दोन वेळा संवाद साधण्याचा प्रयत्न केला , भेटून , बोलून , मनमोकळे करून पुढे जाण्याचे ठरविले तर हे प्रयत्न नक्कीच यशस्वी होतात. पण पहिल्याच प्रयत्नात नाती पूर्वी सारखी छान होतील असे नाही. त्याकरिता एकमेकांनी समजून घेणे , वेळ देणे , संवाद साधणे ही तेवढेच गरजेचे असते. तर ती नाती परत प्रयत्नपूर्वक यशस्वी रित्या फुलतात. मोहरतात. आणि बहरतात ही.
निवडणुकीला उभे राहणारे प्रत्येक नेते हे पहिल्या प्रयत्नात निवडून येतात असे काही नाही. तर त्याकरिता सतत प्रयत्न हे करावे लागतात. जन संपर्क वाढवावा लागतो. लोकांच्या पर्यंत जास्तीत जास्त आपले कार्य पोहचवावे लागते. लोकांना खात्री पटली की हे आपल्या करिता चांगले कार्य करत आहेत तर पुढच्यावेळी लोक नक्की निवडून देतात.
तसेच आहे संगीतकार , गायक, यांना पहिल्या गाण्यात प्रसिध्दी मिळतेच असे नाही. खेळाडू यांना पहिल्या प्रयत्नात यश मिळते असे नाही. त्याकरिता सतत सराव , प्रयत्न , करावे लागतात. आणि आज यश मिळाले म्हणजे संपले असे नसते. तर प्रत्येकवेळी तसाच चांगला performance देवून प्रयत्न करणे गरजेचे असते. तर तुमच्या यशाची कमान चढती कमान ठेवता येते.
प्रसिद्ध उद्योगपती अगदी टाटा बिर्ला , अंबानी असतील तरी त्यांना ही अथक परिश्रम करावे लागलें . काही तरी मिळवायचे तर त्याकरिता सतत प्रयत्न करावे लागलेच की. आज टाटा यांची नॅनो कार एवढी खपली नाही मात्र त्यांनी दुसऱ्या गाड्या मध्ये यशस्वी वाटचाल केलीच की. एक प्रॉडक्ट खपले नाही म्हणजे सगळे संपले असे न करता वेगवेगळी products तयार करण्याचे प्रयत्न , आधीच्या products मध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न , लोकांची गरज , आवड या गोष्टी लक्षात घेवून तसे प्रॉडक्ट तयार करण्याचे प्रयत्न हे सगळे उद्योगपती करत असतात.
बरं आज हे प्रॉडक्ट खूप खपले तर उद्याही खपेल असे नाही ना .. सतत मार्केट resarch , लोकांची गरज , आवड लक्षात घेवून त्यात नावीन्य द्यावे लागते .ते प्रयत्न करावे लागतात.
प्रत्येक प्रयत्नात यश मिळत नाही, पण प्रत्येक यशाचं कारण हे प्रयत्नच असतात. निराश न होता , प्रयत्न करणे, आशावादी राहणे , सतत नाविन्याचा शोध घेणे , आणि मोठी ध्येय ठेवणे ही गरजेचे असते. जिद्द ही सगळ्यात महत्वाची गोष्ट.
या दुनिये मध्ये थांबायला वेळ कोणाला? हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला.
तसे प्रयत्न करून अपयश आले तरी थांबु नका. थांबला तर पुढचा चांस ही गेला. प्रयत्न करत रहा. कारण प्रत्येक यशाचं कारण हे प्रयत्नच असतात.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
