कितीही ठरवा, मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊच शकत नाही!!
टीम आपलं मानसशास्त्र
पृथ्वीतलावरची प्रत्येक व्यक्ती ही आशा, आकांशा आणि इच्छा पूर्ण होण्यासाठीच जगत असते. इच्छा पूर्ण करणे आणि त्याचा आस्वाद घेणे ही क्रिया निसर्गानुसार कार्य करत असते. यामध्ये काही मूलभूत गरजांच्या स्वरूपात इच्छा पूर्ण केल्या जातात.
मूलभूत गरजा म्हणजे, दोन वेळचे अन्न, घालायला कपडे, जवळच्या व्यक्तींची सोबती आणि थोडंफार बाहेर फिरणे. हि एक मूलभूत स्वरूपाची इच्छा प्रत्येक व्यक्ती पूर्ण करत आलेली आहे. तसेच यापुढेही ती करत राहणार यामध्ये शंका नाही.
परंतु यामध्ये माणसांच्या या इच्छा एकमेकांना धडकायला लागल्या. त्यातून संघर्ष निर्माण होईल अशी परिस्थिती उत्पन्न व्हायला लागली. किंबहुना संघर्षही निर्माण व्हायला लागला. उत्पन्न होणारी इच्छा ही व्यक्तिगत कमी आणि इतरांसाठी जास्त उद्देशीत असल्याने मान्य-अमान्य असा प्रश्न उद्भवू लागला.
अमुक प्रकारचीच भाजी बनविणे, त्या ठिकाणीच फिरायला जाणे, हाच कार्यक्रम टीव्ही वर पाहणे, एकमेकांना हवा तसा वेळ न देणे इ. गोष्टी इच्छांच्या स्वरूपात वेगळे रूप धारण करू लागले.
तसेच आज अशी स्थित आली आहे कि, इच्छा पूर्ण झाली नाही कि एकमेकांबद्दलची द्वेष वाढत चालला आहे. वैयक्तिक शाब्दिक हल्ले तसेच शारीरिक हल्ले वाढत आहेत. प्रत्येकजण आपली इच्छा पूर्ण झालीच पाहिजे यासाठी लढताना दिसत आहेत.
तसेच एकमेकांची इच्छा एकमेकांवर मोठ्या प्रमाणात लादण्याची क्रिया सुरु झाली आहे. त्या पूर्ण करण्यासाठी घरोघरी राजकारण खेळले जात आहे. इतक्या चपळपणे चेहऱ्यावरचे हावभाव बदलून इच्छा मांडली जाते कि समोरच्याला या कृत्याचा थांगपत्ताही लागत नाही.
इच्छा पूर्ण जरी होत असली तरी शेवटी त्याचा आनंद मात्र अजिबात घेता येत नाही. म्हणजेच व्यक्तीची समाधानी होण्याची भावना विकृत दिशेने वाटचाल करताना आढळत आहे. समाधानी नसणं आणि इतरांनाही समाधानी होताना न पाहता येणं हे एका विकृत व्यक्तिमत्वाचे लक्षणच समजावे.
या विकृत परिस्थितीच्या बाहेर असणारी बरीच सामान्य माणसे अजूनही स्वतःच्या इच्छेबद्दल कोठेही उघडपणे बोलताना दिसत नाहीत. काय हवे आणि काय नको याबद्दल ते स्वतःहून कधीही पुढाकार घेताना दिसत नाही.
म्हणजेच एकीकडे माझीच इच्छा पूर्ण व्हायला हवी आणि दुसरीकडे स्वतःच्या इच्छेबद्दल कोठेही न बोलणे अशा या दोन व्यक्तींमध्ये मानसिक संघर्ष निर्माण झालेला आहे.
म्हणून चारचौघात वावरताना आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याकडे जोर देण्यापेक्षा किंवा संघर्ष निर्माण करून घेण्यापेक्षा इतरांच्याही इच्छेला प्राधान्य द्यायला हवं.


