Skip to content

“प्रत्येक वळणावर भेटणाऱ्या व्यक्तीला चांगलं समजणं सोडून द्या.”

प्रत्येक वळणावर भेटणाऱ्या व्यक्तीला चांगलं समजणं सोडून द्या. “


मधुश्री देशपांडे गानू


“भले बुरे जे घडून गेले,

विसरून जाऊ सारे क्षणभर..

जरा विसावू या वळणावर.. या वळणावर”

आपल्या जीवनप्रवासाशी निगडीत सुंदर आणि अगदी खरं असलेलं हे गाणं. जीवनाच्या प्रवासात प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या व्यक्ती भेटतात. काही क्षणभर, तर काही ठराविक काळासाठी, तर काही आयुष्यभरासाठी आपली सोबत करतात. जन्मापासून आपल्याला मिळालेली नाती ही तर आपण निवडू शकत नाही. आणि तरीही कुटुंब हे आपले प्रथम प्राधान्य असले पाहिजे.

म्हणजे या आपल्या रक्ताच्या, प्राथमिक नात्यांचा मनापासून स्वीकार हवाच. हल्ली तर हीच नाती प्रचंड विस्कळीत झालेली दिसत आहेत. आई-वडील, बहिण-भाऊ, मुलं, नातलग यांच्यामध्ये एक विचित्र दरी निर्माण झालेली सहज दिसून येते. सामाजिक, आर्थिक, भावनिक, ईर्षा, असूया, स्पर्धा कारणं काहीही असतील.

या आपल्या हक्काच्या जवळच्या नात्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा बाहेर आभासी जगात माणसे विश्वासाची नाती शोधताना दिसतात. पटकन कोणावरही विश्वास ठेवतात. आणि मग शारीरिक, भावनिक, मानसिक, आर्थिक फसवणूक झाली की जागे होतात. आपल्या आयुष्यात प्रत्येक वळणावर भेटणारी व्यक्ती चांगलीच असते हा फार मोठा गैरसमज आहे. याने तुमचं फक्त नुकसान होऊ शकतं.  वाईट अनुभव आला तरीही त्यातून आपण काय शिकतो आणि पुन्हा ती चूक करत नाही हे महत्वाचं आहे.

आजही माणसातील माणुसकी जिवंत आहे म्हणून ही जगरहाटी सुरू आहे. आजही तुमच्या आयुष्यात मोजकीच का होईना पण जीवाला जीव देणारी माणसं मग ते तुमचे कुटुंबीय असतील, तुमचे मित्र असतील असे असतीलच. माझी खात्री आहे. तरीही तुमच्या संपर्कात आलेली प्रत्येक व्यक्ती चांगलीच आहे असं समजणं सोडून द्यायला हवं.

कारण स्पर्धेच्या जीवघेण्या युगात आणि पैसा सर्वस्व असण्याच्या गतिमान जगात तुम्हीं आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सावध असणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या सरळ साध्या स्वभावाचा गैरफायदा घ्यायला लोक टपलेलेच आहेत.

अगदी तुमच्या जवळचे म्हणवणारे तथाकथित मित्र-मैत्रिणीही तुमचा प्रचंड मत्सर, असूया, द्वेष करू शकतात. तुमच्याविरुद्ध कट कारस्थान करून तुमचं नुकसान करू शकतात. तुम्हीं जर कोणत्याही बाबतीत उजवे असाल तर हे सहज घडू शकतं. सौंदर्य, तुमचे गुण, श्रीमंती, खानदानीपणा, उच्च अभिरुची, भौतिक सुख साधने कशाचाही मत्सर वाटू शकतो. तुमच्या मागे गाॅसिप करणारेही याच प्रकारात मोडतात..

आज सोशल मीडियाच्या आभासी जगात कोणीही स्वतःला तुमचा मित्र, मैत्रीण म्हणवू शकतो. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तुमचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो.

प्रेम ही तर आज सवंग, स्वस्त भावना झाली आहे. कोणीही कोणाच्याही प्रेमात (??) पडू शकतो. एकाच वेळी अनेक प्रेम प्रकरणं लीलया हाताळणारे महाभाग येथे आहेत. फक्त वासनापूर्ति, आर्थिक उपयोग एवढाच त्यांचा हेतू असतो. आणि बाहेर विश्वासाचा आसरा शोधणारे याला बळी पडतात. रोज नित्य नवी उदाहरणे आपण पाहत आहोतच.

याचा अर्थ असा अजिबातच नाही की नवीन व्यक्ती आयुष्यात येऊच नये. नवे मित्र-मैत्रिणी, नवी नाती जरूर जोडावी. या जीवन प्रवासात ते अत्यंत महत्त्वाचे आहे. पण कोणतेही नातं पूर्ण विकसित, आपलं होईपर्यंत निदान सावध असावे. आपली वैयक्तिक, आर्थिक माहिती चटकन कोणालाही देऊ नये. नवीन नात्यातील आपल्या इतकीच समोरच्याचीही गुंतवणूक असावी.

कोणतंही नातं फक्त एकानेच निभावून चालत नाही. समान पातळीवर दोन्हींकडून प्रयत्न हवेत. आणि जर असं होत नसेल, अनेक संधी देऊनही नात्यात कोरडेपणा येत असेल तर शांतपणे त्या नात्यातून बाहेर पडावे. स्वत:चा आत्मसन्मान जपणं हे प्रत्येकाचं प्राथमिक कर्तव्य आहे. कोणीही आपली कोणत्याही प्रकारची फसवणूक करणार नाही इतकं सजग प्रत्येकाने राहायची आज नितांत गरज आहे. तुमच्याशी हस्तांदोलन करणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्याबद्दल चांगला विचार करणारी असतेच असे नाही.

खरं म्हणजे ध्यानधारणा, तुमचं ऊर्जा नियोजन, तुमचा Aura या अशा काही गोष्टी आहेत, ज्यामुळे तुम्हीं सहज अधिक सजग होता. पण हा वेगळा, गंभीर आणि खोल विषय आहे.

सामान्य माणसांनी रोजचे जीवन जगताना फक्त आपलं मन, आपली बुद्धी सावध ठेवली तरीही आपण चांगल्या माणसांची पारख करू शकतो. हा जीवन प्रवास रमणीय, आनंदी, सौख्याचा होण्यासाठी अशी चांगली माणसं आपल्याबरोबर हवीतच. यासाठी आधी आपण चांगली व्यक्ती असणे जास्त महत्त्वाचं आहे आणि सजगही….. हो ना!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

4 thoughts on ““प्रत्येक वळणावर भेटणाऱ्या व्यक्तीला चांगलं समजणं सोडून द्या.””

  1. Nilima Nandurkar

    खूप सुंदर लिहिलेय.. आपण भेटणाऱ्या लोकांना नेहमी छानचं समजतं जातो, आणि इथेच चुकतो

  2. खूप सुंदर. सत्य परिस्थिती आहे.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!