Skip to content

एकतर्फी प्रेम आयुष्याची योग्य दिशा दाखवून, वास्तव स्वीकारायला शिकविते.

एकतर्फी प्रेम आयुष्याची योग्य दिशा दाखवून, वास्तव स्वीकारायला शिकविते.


मेराज बागवान


प्रेम’ ज्यावर आजपर्यंत अनेक सिनेमे झाले.आजही अनेक कविता, गोष्टी ,लेख प्रेम ह्या विषयावर रचले जातात. वास्तवातील अनेक प्रेम कथा आजही अजरामर आहेत.पण प्रेमाची पण अनेक रूपे आहेत, रंग आहेत.अनेकांनी त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी प्रेम अनुभवलेले असते.कधी हे प्रेम, दोन्ही बाजूंनी असते.मग हे प्रेम खूपच रंजक बनते.एकमेकांसाठी जणू जगणे सुरू झालेले असते.मग भविष्य रंगवले जाते.अनेक स्वप्ने एकत्र पहिली जातात.हे प्रेम तर आपण समजू शकतो.पण तेव्हा काय होते जेव्हा प्रेम हे एकतर्फी असते, म्हणजेच दोघांपैकी फक्त एका कोणाच्यातरी मनात समोरच्याविषयी ही प्रेमाची भावना असते,पण तशीच भावना दुसऱ्याच्या मनात अजिबात नसते.

‘तन्वी’ खूप हुशार, ऍक्टिव्ह अशी मुलगी.शिक्षण संपल्यानंतर नोकरीस लागलेली.तसे तिला फार मित्र मैत्रीण नव्हते.पण जितके होते ते तिच्यासाठी खूप जिवलग होते.तन्वी चा स्वभाव अंतर्मुख होता.ती पटकन कोणाच्यात मिसळत नसे.पण तरी देखील तिचा स्वभाव खूप सहकार्याची भावना ठेवणारा होता.सर्वांना ती खूप मदत करीत असे.

एकदा असेच ऑफिस क्लाइन्ट च्या कामानिमित्त तिची ओळख ‘कबीर’ शी झाली.कबीर, त्याचा स्वतःचा व्यवसाय होता.खूप मेहनती आणि बोलका असा तो मुलगा होता.मग हळूहळू कबीर-तन्वी ची मैत्री छान जमली.कधीही पटकन कोणाशी न बोलणारी तन्वी आज कबीर शी फोनवर , मेसेज वर तासंतास बोलू लागली. आणि कबीर तिला मैत्रीच्या नात्यापेक्षा जास्त आवडायला लागला.आणि ती त्याच्या प्रेमात पडली.कबीर देखील तिच्याशी खूप छान बोलायचा, वागायचा.

काही महिन्यांनंतर मग एकेदिवशी तन्वी ने कबीर ला तिच्या मनातील भावना बोलून दाखविल्या.’कबीर, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.मला तू आवडतोस.मला तुझ्याशी लग्न करायचे आहे’.यावर कबीर फक्त अलगदपणे हसला.त्याने उत्तर काही दिले नाही.पण तरी देखील तो तिच्याशी इतर गप्पा मारू लागला.तन्वी ने देखील उत्तराचा अट्टाहास केला नाही आणि थोड्या वेळानंतर ते दोघे आपापल्या दिशेने निघून गेले.

तन्वी विचार करू लागली ,’थोडा काळ लोटू दे , तो स्वतःच याचे उत्तर देईल’.बरेच महिने उलटले.तन्वी कबीर बरोबर बोलत असताना, अनेकवेळा तिचे प्रेम व्यक्त करीत असे.पण कबीर काही प्रतिसाद देत नसे.पण एकदा तन्वी जरा जास्तच भावनिक झाली आणि तिचे तिच्या भावनांवर नियंत्रण राहिले नाही.आणि पुन्हा पुन्हा ती कबीर कडे उत्तर मागू लागली.

तेव्हा कबीर शांतपणे बोलू लागला. “तन्वी , ऐक, तू एक सुशिक्षित मुलगी आहेस. तुझ्या पायावर उभी आहेस.स्वतंत्र आहेस. तुला तुझे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. तुझ्या भावना देखील मला प्रत्येकवेळी समजल्या होत्या.तू खूप सुंदर, समजूतदार मुलगी आहेस.एक माणूस म्हणून मला तुझा नेहमी आदर असेन.पण तुला सांगू का तन्वी, माझ्या मनात तुझ्याबद्दल आदर आहे, पण त्या भावना नाहीत, ज्या तू नकळत माझ्याकडून अपेक्षित आहेस.तू अनेकवेळा तुझ्या भावना बोलून दाखविल्या, मी काहि बोललो नाही, कारण मला तुला दुखवायचे नव्हते आणि गमावयचे तर मुळीच नव्हते.कारण तू मला कायम माझ्या आयुष्यात हवी आहेस. माफ कर तन्वी मला, पण तुझ्या मनात जे आहे ते माझ्या मनात नाही.तू मला माझ्या कित्येक अडी-अडचणीत मदत केलीस, मी तर त्याची परतफेड सुद्धा कधी करू शकलो नाही.तुझ्या भावना चुकीच्या आहेत असे मी बिलकुल म्हणत नाही, पण याचा त्रास तुलाच होणार आहे. तुझी कायम घुसमट होईल.जी मागच्या काही दिवसात मी तुझ्यात पाहतो आहे.सो प्लिज काळजी घे स्वतःची आणि जास्त विचार करू नकोस.तुझ्यासाठी नक्कीच कोणीतरी छान देव नक्की पाठवून देईल”.

तन्वीने शांतपणे कबीर चे म्हणणे ऐकून घेतले.आणि मग तिने देखील कबीर वर कोणतीही जबरदस्ती केली नाही.तिच्या डोळ्यात अश्रू तरळत होते.पण एकही अश्रू न ढाळता तिने कबीर चा निरोप घेतला.मात्र घरी अआल्यानंतर त्या दिवशी तन्वी खुप रडली.तिला तिची स्वप्ने आठवत राहिली.कबीर ला जणू ती आपला आयुष्याचा जोडीदार मनात होती.संसाराची देखील स्वप्ने तिने पहिली होती.तिचे मनापासून आणि अगदी खरेखुरे प्रेम कबीर वर होते.या आधी तिला कोणावर प्रेम झाले नव्हते, किंवा तिला देखील कोणी तसे विचारले नव्हते.तिचे हे पहिलेच प्रेम होते.त्यामुळे तिला खूप मानसिक त्रास होत होता.

ती विचार करू लागली, “अरे माझे हे पहिलेच प्रेम, पण यशस्वी नाही झाले.मी माझे सर्वस्व दिले पण तरीही देवाने मला माझे प्रेम नाही दिले.काय चूक झाली माझ्याकडून”.असे म्हणत म्हणत ती खूप रडू लागली.ती खूप भावनिक झाली होती आणि त्यामुळे जास्त दुखावली गेली होती.

असेच दिवसामागून दिवस जात होते.कबीर ने तिच्याशी संपर्क तोडला नव्हता.पण आता तन्वीच त्याच्यापासून हळूहळू दूर होत होती.त्याला ती किंचित देखील विसरलेली नव्हती.पण तिने कबीर ची बाजू समजून घेतली होती.तिने विचार केला ,”अरे हे प्रेम आहे खरे, पण कबीर च्या मनात असे काहीच नाही.तो जरी बोलत होता माझ्याशी, तरी याचा अर्थ त्याचे माझ्यावर प्रेम आहे असा होत नाही.जे होते ते फक्त माझ्या मनात.यालाच तर एकतर्फी प्रेम म्हणतात.कबीर मनाने खूप चांगला आहे. मुख्य म्हणजे माझा तो खूप आदर करतो.पण तरी देखील मी त्याच्यावर जबरदस्ती करणे अत्यंत चुकीचे आहे.म्हणूनच मी ठरविले आहे. आता पुन्हा कधीच कबीर ला भेटायचे नाही.आणि त्याच्या आयुष्यात मी कोणतीच ढवळाढवळ करणार नाही.त्याची काळजी आहे मला, देवा प्लिज त्याला सुखात, आनंदात ठेव आणि त्याच्या सर्व अडी-अडचणी दूर कर, बाकी मला तुझ्याकडे आणि त्याच्याकडे कोणतीच तक्रार नाही,अपेक्षा नाही.”

अनेक महिने गेले.आज तन्वी खूप आत्मविश्वास असणारी मुलगी झाली आहे.पूर्वीपेक्षा जास्त यशस्वी होत आहे. पण कबीर ची आठवण कायम तिच्या मनात आहे. कित्येकदा आयुष्याच्या आनंदाच्या प्रसंगी ती कबीर ला खूप आठवते.त्याच्याशी भरभरून बोलावे असे आजही तिला वाटते. पण ती आजही त्याच्यापासून लांब आहे. आणि फक्त त्याच्या चांगल्या आयुष्यासाठी प्रार्थना करीत आहे. ती आयुष्यात पुढे गेली आहे. समाजात स्वतःचे असे वेगळे स्थान तिने निर्माण केले आहे.तिने वास्तव स्वीकारले आहे आणि तिच्या ह्या दृष्टिकोनानेच तिला आयुष्याची नवी दिशा मिळाली आहे.तन्वी मानातुन कायम खुश असते.अजूनही तिला तिच्या आयुष्याचा जोडीदार मिळालेला नाही.पण ती दुःखी मात्र अजिबात नाही.ती तिचे प्रेम मनापासून जपत आहे आणि ते प्रेम तिने तिच्या मनाच्या एका कप्प्यात अलगद हळुवारपणे बंद करून ठेवलेले आहे.

दुसरीकडे कबीर,जो की , भावनांवर अत्यंत योग्यरीत्या नियंत्रण ठेवून तन्वी ला समजावून सांगतो.कदाचित त्याच्या काही वैयक्तिक, घरगुती समस्या देखील असतील. पण आपल्यामुळे अजून कोणाला त्रास नको म्हणून त्याने तन्वी ला त्या बद्दल काही संगीतले नाही.कदाचित त्याच्या जबाबदाऱ्यांमुळे त्याच्याकडे प्रेम ह्या विषयासाठी जागा नसेल.पण तरी देखील त्याने तन्वी ला समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला.दोघेही आपापल्या जागी पूर्ण बरोबर आहेत. पण एका कोणाची मते ,भावना दुसऱ्यावर लादली तर नाही ना जाऊ शकत.म्हणूनच ही कहाणी पुढे जाऊ शकली नाही.कारण हे प्रेम दूतर्फी कधीच नव्हते.

आज एकतर्फी प्रेमातून अनेक वाईट घटना जसे की , खून, बलात्कार, जोर-जबरदस्ती , समाजात बदनामी करणे, चुकीचे आरोप करणे ,अशा घटना घडताना दिसतात.जे की अत्यंत चुकीचे आहे.प्रेम ही खूप निरागस भावना आहे.जी कायम मनात जपली पाहिजे.
आजची तरुणाई एकतर्फी प्रेमातून भरकटलेली दिसते.नैराश्यातून व्यसनांच्या आहारी गेलेली दिसते.अशा तरुणाईने ‘तन्वी’ सारख्या मुलींचा आदर्श घेणे आज काळाची गरज आहे.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “एकतर्फी प्रेम आयुष्याची योग्य दिशा दाखवून, वास्तव स्वीकारायला शिकविते.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!